मी कुठे होतो शहाणा ? मी कुठे होतो हिशेबी ?
मी जरी बेरीज केली ती वजाबाकीच होती !
कसा मेळ व्हावा?
------------------------
मला एक छोटा दिवा पाहिजे
तुला चांदण्यांचा थवा पाहिजे
मला ओढ आहे उन्हाची तशी-
तुला पावसाळी हवा पाहिजे
मला मुग्धतेचा लळा लागला..
तुला साजणी मारवा पाहिजे
मला तू हवी रोजच्यासारखी,
तुला रोजचा 'मी' नवा पाहिजे !
कसा मेळ व्हावा सये आपला??
मने जोडणारा 'दुवा' पाहिजे...
-------------------------
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
प्रतिसाद
मला तू हवी रोजच्यासारखी,
तुला रोजचा 'मी' नवा पाहिजे ! हा शेर छान आहे.
एकंदरीत रचना सुबक आहे. मतला विशेष.
दोन सूचना-
१. दुस-या शेरात तशी ऐवजी दुसरा शब्द योजावा किंवा शेराचीच रचना नव्याने करावी.
२. तिस-या शेरात दुस-या ओळीत मारव्याची योजना असेल तर पहिल्या ओळीतही एखाद्या रागाची योजना करावी.
किंवा
मुग्धता पहिल्या ओळीत असेल तर मुग्धतेशी संबंधित प्रतिमा दुस-या शेरात आणावी.
मारवा सोडून सर्व शेर आवडले! "नवा" तर विशेष!!
अलामतीतली सूट मात्र जरा खटकली.
केदार सर,
त्या ओळीत 'भैरवीचा' असा शब्द आधी सुचला होता. पण ती ओढाताण वाटली असती, आणि शेर Predictable झाला असता, असे वाटले.
'मुग्धता' हा शब्द 'मुकेपणा' या अर्थाने वापरला आहे. (मला शांत बसावे वाटत असता, तुला मारवा गावासा वाटतो असे अभिप्रेत आहे.)
@ पुलस्ति,
अलामतीतली गुस्ताखी माफ असावी.
पुलस्ति आणि ज्ञानेश पाटिल :
आपण वाचला नसल्यास गझलेवरचा राऊतांचा पुढील लेख जरूर वाचावा:
http://gazalakar.blogspot.com/
विषेश करून् पान १२ पहावे अलामतीवरचे त्यांचे मत जाणण्यासाठी, जे मला पटते...
परत एकदा...खोल... खोल...खोल...किती ही खोली !
मला ओढ आहे उन्हाची तशी-
तुला पावसाळी हवा पाहिजे
परत एकदा...खोल... खोल...खोल...किती ही खोली !
हां ना राव?
छान सुबोध, सुबक, मोहक गझल आहे. ( जुन्या गझलेला नव्यानेच प्रतिसाद देतो आहे.)