रात्रभर

रोज बसतो त्याच फुटलेल्या दिव्याशी रात्रभर
तो न जाणे काय बडबडतो नभाशी रात्रभर


ताप प्रश्नांचा असा चढतोच आहे सारखा
एकही उत्तर बसेना का उशाशी...रात्रभर


तो असावा चतुर किंवा गंजला हा आकडा
खेळुनी उंदीर गेला सापळ्याशी रात्रभर


खंगलेल्या चेहर्‍यावर वेडसर झुलते हसू
झुंज घेते स्वप्न त्याच्या वास्तवाशी रात्रभर


एक आठी जागते आहे कपाळावर तिच्या
काय चुकले? उजळणी करतो मनाशी रात्रभर


शेवटी निसटून गेला एक अस्फुट हुंदका
केवढा सांभाळला होता उराशी रात्रभर


जसजसा झालो शहाणा तसतसे झाले कमी -
भांडणे माझ्यातल्या मी माणसाशी रात्रभर

गझल: 

प्रतिसाद


रोज बसतो त्याच फुटलेल्या दिव्याशी रात्रभर
तो न जाणे काय बडबडतो नभाशी रात्रभर
- छान
ताप प्रश्नांचा असा चढतोच आहे सारखा
एकही उत्तर बसेना का उशाशी...रात्रभर
- सुरेख. उत्तम कल्पना.

तो असावा चतुर किंवा गंजला हा आकडा
खेळुनी उंदीर गेला सापळ्याशी रात्रभर
- वा. चमकदार कल्पना.
खंगलेल्या चेहर्‍यावर वेडसर झुलते हसू
झुंज घेते स्वप्न त्याच्या वास्तवाशी रात्रभर
- कल्पना चांगली; पण निवेदन संदिग्ध.

एक आठी जागते आहे कपाळावर तिच्या
काय चुकले? उजळणी करतो मनाशी रात्रभर
- फारच छान. सूक्ष्म शेर !
शेवटी निसटून गेला एक अस्फुट हुंदका
केवढा सांभाळला होता उराशी रात्रभर
- वा...
जसजसा झालो शहाणा तसतसे झाले कमी -
भांडणे माझ्यातल्या मी माणसाशी रात्रभर
- छान.
एकंदर सुरेख गझल. शुभेच्छा.

पुलस्ति, अतिशय सुरेख गझल. प्रश्नांचा ताप आणि आठी जागते तिच्या कपाळावर! हे दोन शेर तर अप्रतिम. पूर्ण गझल आवडली.
सोनाली

पुलस्ति, सुरेख गझल. 

एक आठी जागते आहे कपाळावर तिच्या
काय चुकले? उजळणी करतो मनाशी रात्रभर
वाव्वा! ही द्विपदी तर फारच आवडली.

हुंदका आणि शहाणा हे तर हमखास आवडावा असेच.

नभाशी बडबडणे आणि वेडसर झुलणारे हसू वाचून दोन घरे सोडून राहणाऱ्या एका वेड्याची आठवण जिवंत झाली. फारच छान. कदाचित म्हणून स्वप्न तिथे मला चपखल वाटला नाही.

पुलस्ति,
शेवटी निसटून गेला एक अस्फुट हुंदका
केवढा सांभाळला होता उराशी रात्रभर

ताप प्रश्नांचा असा चढतोच आहे सारखा
एकही उत्तर बसेना का उशाशी...रात्रभर
-सान्जेय

व्वा..छान...
एक आठी जागते आहे कपाळावर तिच्या
काय चुकले? उजळणी करतो मनाशी रात्रभर

मतला, ताप, उंदीर, हुंदका, आठी... सगळेच शेर  जबरदस्त.
गझल खूप आवडली !

प्रदीप कुलकर्णी या॑च्याशी सहमत....

रोज बसतो त्याच फुटलेल्या दिव्याशी रात्रभर...
खेळुनी उंदीर गेला सापळ्याशी रात्रभर...
------या शेरांमुळे ही गझल 'मर्ढेकरी' शैलीतली  वाटते!गझल  अप्रतिम्.जियो!
जयन्ता५२

प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद!

पुलस्तिजी,
खूप छान आहे गजल तुमची. उंदीर, स्वप्न, आठी हे शेर फारच आवडले.
खूप सूक्ष्म आणि सखोल, सेन्सिटिव्ह गजल आहे.
अभिनंदन!
-सतीश

पुलस्ति ;
२५ गझलांबद्दल अभिनंदन :-)
मला तुमची  ही सर्वात जास्त आवडलेली  गझल.

सतीश आणि वैभव - धन्यवाद.
वैभव, अभिनंदनाबद्दल एक्स्ट्रा धन्यवाद :)