भटसाहेब ३

मला आठवतंय, भटसाहेब त्या काळात `मेनका` या मासिकात गझलिस्तान हे नवगझलकारांच्या गझलांचे सदर मोठ्या हिरीरीने चालवीत असत. ती त्यांची एक गझलविषयक लढाईच होती म्हणा ना ! मराठी गझल हे भटसाहेबांचे जीवितध्येय होते. त्यांच्या डोक्यात, मनात गझलेशिवाय दुसरा विचारच बहुधा नसे. अस्सल, खरीखुरी मराठी गझल मराठी मातीत रुजावी, यासाठी त्यांनी हाती घेतलेल्या व्यापक मोहिमेचाच तो एक भाग होता. त्याच काळाच्या आसपास थोर नाट्यसमीक्षक दिवंगत माधव मनोहर यांनी गझलेच्या संदर्भात लिहिलेल्या एका लेखात उल्लेख केला होता की, गझल हा एक अधम काव्यप्रकार आहे. आता हे विधान काही सोम्यागोम्या समीक्षकाने केलेले नव्हते. नाट्यसमीक्षणाच्या क्षेत्रात चांगलाच दबदबा आणि दरारा असलेल्या ख्यातनाम समीक्षकाचे हे मत होते. पण या मताने भटसाहेब अजिबात खचून गेले नाहीत. त्यांनी माधव मनोहर यांच्या त्या विधानाचा एका वाक्यातच समाचार घेतला होता. ते वाक्य होते- मला ज्या विषयता काही समजत नाही, त्या विषयात मी काही बोलत नसतो. आता माधव मनोहर हे काही गझलकारही नव्हेत की कवीही नव्हेत, हे ज्याला ठाऊक आहे, त्याला भटसाहेबांच्या या संयत उत्तरात किती ताकद होती, हे आपसूकच समजून जाईल !
अखंड महाराष्ट्राच्या विषयावर भटसाहेबांइतका पोटतिडकीने बोलणारा, लिहिणारा कवी माझ्या तरी पाहण्यात दुसरा नाही. या प्रश्नासाठी त्यांनी जिवाचे अक्षरशः रान केले होते. वेगळा विदर्भ व्हावा, अशा मताच्या लोकांवर ते अशा काही त्वेषाने सर्वशक्तिनिशी बरसत की, काही विचारू नका. यासंदर्भात त्यांनी केलेला पत्रव्यवहार अक्षरशः अफाट होता. बडी बडी राजकीय मंडळी, बडे बडे साहित्यिक इत्यादींना पत्रे पाठवून त्यांनी वेगळ्या विदर्भवाद्यांना उघडे पाडले होते. अखंड महाराष्ट्राचा ठराव झालाच पाहिजे, असा आग्रह ते प्रत्येक साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांकडे पत्रव्यवहाराद्वारे धरीत असत. त्यांच्याइतके जाज्वल्य महाराष्ट्रप्रेम असणारा साहित्यिक विरळाच !

भटसाहेबांच्या अखेरच्या काळाच्या काही महिने आधी म्हणजे २००२ च्या उत्तरार्धात भटसाहेब पुण्यात आले होते. त्या वेळी जितका जास्तीत जास्त वेळ त्यांना देता येईल, तेवढा मी दिला. तब्येत बिघडल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेत होते ते आणि `सप्तरंग`चे काम तिकडे नागपूरला अखेरच्या टप्प्यात होते. थकलेली गात्रे, शिणलेला देह, पण तितकीच जोरकस वाणी आणि त्याहूनही ऊर्जेचा प्रपाती स्रोत असलेले त्यांचे मन...रुग्णालयातीही ते `सप्तरंग`मधील गझला आर्ततेने म्हणून दाखवीत. रुग्णालयात त्यांनी गप्पांच्या मैफलीत म्हटलेली गझल मला आठवत आहे -

कुठवर माझा जीव असा मी जाळत राहू ?
कुठवर मी फसव्या आशांवर भाळत राहू...?

मी माझ्या जगण्यावर शोधू कुठले औषध ?
कुठवर ऐसा रोग इथे मी पाळत राहू ?

कशास मारू गेलेल्या दिवसांना हाका ?
कुठवर मी येथेच खिन्न रेंगाळत राहू....

भटसाहेबांचे आजारी असणे, त्यात त्यांनी निवडलेली ही उदास गझल आणि त्यांचे ते (खासगी बैठकीतीलही) अफलातून, एकमेवाद्वितीय सादरीकरण...ही गझल त्यांच्या तोंडून ऐकताना अंगावर काटाच आला होता माझ्या....! नंतर त्या दिवशी मला खूपच उदास उदास वाटत राहिले...
याशिवाय गझल सादर करण्याची रुग्णायलातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय यांचीही फर्माईश ते आजारपणाच्या तशा अवस्थेतही मोठ्या खुशीने पुरवीत असत. गझलांबरोबरच त्यांनी `रंग माझा वेगळा`मधील ते प्रख्यात गाणे अशा काही समरसतेने आणि आर्ततेने सादर केले होती की काही विचारू नका...
ते गाणे होते -
जय जन्मभू! जय पुण्यभू! जय स्वर्गभू सुखदायिनी !
जय धर्णभू ! जय कर्मभू ! जय वीरभू ! जयशालिनी !
हे गाणे ऐकण्यासाठी काही निवडकच लोक होते...भटसाहेबांचा आवाज या गाण्याच्या वेळी काय लागला होता ! हे गाणे एरवी ते प्रखरतेने सादर करीत असत़; पण त्या दिवशी त्यांचा नूर आणि सूर काही निराळाच होता. त्यांच्या आवाजातील आर्तता त्या दिवशी काळजालाही भेदून पार होत होती...
काही वर्षांपूर्वी - साल नेमके आठवत नाही आता - एल्गार हा कार्यक्रम भरत नाट्य मंदिरात होता. त्या कार्यक्रमात भटसाहेबांनी एक गझल सादर केली होती....
जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही !
ही गझलही त्यांनी इतक्या आर्ततेने सादर केली होती की, अंगावर सर्रकन् काटाच आला होता. तो अनुभव केवळ शब्दातीतच.
काही दिवसांनी भटसाहेब जरा बरे झाले. पुण्यातील मुक्काम हलविण्याची वेळ आली. नागपूरला जाण्याची तयारी सुरू झाली. एव्हाना `सप्तरंग`च्या मोजक्याच प्रती त्यांना पाहण्यासाठी म्हणून प्रकाशकांनी नागपूरहून पाठविलेल्या होत्या. रेल्वेस्थानकावर त्यांना सोडविण्यासाठी मी गेलो होतो. थोड्या गप्पा झाल्या. गाडी सुटायला अजून अवकाश होता.. ते पुन्हा म्हणाले, `झंझावात`ची प्रेस कॉपी तुझ्या हातून झाली...`सप्तरंग`चीही तुझ्याकडूनच करून घ्यायची होती; पण तू इकडे पुण्यात आणि मी तिकडे नागपुरात...दोन ध्रुवांवर दोघे. पण `आता सप्तरंग हा माझा बहुतेक शेवटचाच काव्यसंग्रह बरं का...`! काय बोलावे, मला सुचेना... ते म्हणाले, `तुला कसा वाटला, ते जरूर कळव.`
मी म्हटले, `हो नक्की कळवीन. पुण्यात विक्रीसाठी आला की, मी विकत घेईनच; पण तुमच्या स्वाक्षरीची एक प्रत मला नागपूरहून जरूर पाठवा, अशी आग्रही मागणी मी त्या वेळी त्यांना केली...तर लगेच म्हणाले, `अरे ! तुला मी दिला नाही का `सप्तरंग` ? मी नाही म्हणताच, त्यांनी मला ब्रीफकेस उघडायला सांगितली...मी म्हटले, राहू द्या. सध्या मोजक्याच प्रती दिसताहेत. नंतर पाठवा मला. पण तुमच्या स्वाक्षरीचा माझ्या संग्रही असायला हवा, म्हणून म्हणतोय...पण त्यांनी ऐकले नाही....एक प्रत काढली. थरथरत्या हातांनी तीवर लिहिले...
प्रदीपला सप्रेम भेट !
आणि पुढे एक मुक्तक लिहिले -

गात्रांतल्या फुलाफुलांस वर्षवीत ये !
अन् लक्ष दीप अंतरात चेतवीत ये !
केव्हातरी तुला दिशांपल्याड पाहिले...
ते रूप दर्शनाविनाच दाखवीत ये ! --
तो दिवस होता. १२ ऑगस्ट २००२. आणि माझी-त्यांची तीच अखेरची भेट.
पुढे सहा महिन्यांनी कळलेच की, भटसाहेब गेले....
एक योगायोग म्हणा की आणखी काही...मी त्यांना पहिले पत्र पाठवले तेव्हाही ते दोनेक दिवसांत नागपूरहून रेल्वेने पुण्यात यायलाच निघाले होते...त्यांची माझी अखेरची भेट झाली तीही ते पुण्याहून नागपूरला निघालेले असताना...रेल्वेमध्येच ! असो.
मी विचार करतो कधी कधी की भटसाहेब खरेच गेले का ? इतकी वर्षे ज्यांचा सहवास आपल्याला मिळाला, तो कवी आज या जगात नाही ? असाच एकदा विचार करत असताना, अचानकच उचंबळून आले आणि माझे डोळे अचानकच भरून आले. एकटाच होतो त्या क्षणी मी.  असेच माझे डोळे डबडबून य़ेतात एकांतात माझ्या आईच्या आठवणींनी. ती जाऊन आता दीड वर्ष झालं. पण विचार मनात येतो की, खरंच आपली आई गेली का ? आजही ती कुठेतरी आसपासच असावी, असं वाटत राहतं... ! असो...आपण कुणाच्या तरी आयुष्यात जातो....माणसं आपल्या आयुष्यात येतात... जीव लावतात...निघून जातात...!
गेलेल्या माणसांच्या आठवणींचे लक्ष दिवे अंतरात असे तेवतच राहतात...दिशांपलीकडे आपण कुणाला तरी पाहतच असतो...गेलेली माणसं दर्शनाविनाही आपल्याला रोज रोज दिसतच असतात...आपल्या मनात...!
एका साध्याशा पत्रावरून १९८८ साली या थोर कवीशी सुरू झालेला माझा हा ऋणानुबंध संपला तो २००२ ला. ऋणानुबंध संपला म्हणायचे ते केवळ आता ते देहाने या पृथ्वितलावर नाहीत म्हणून...पण कवीशी एकदा जुळलेला ऋणानुबंध असा कधीच संपत नसतो. कवी गेला तरी तो त्याच्या कलेतून आपल्याशी बोलतच राहतो...कवी कधी मरत नसतो !


- प्रदीप कुलकर्णी

प्रतिसाद

प्रदीपराव,

किती छान लेख लिहीला आहे. अक्षरश: भान विसरून वाचला. फार सुरेख.

सहमत आहे. लेख अतिशय आवडला.

आठवणींच्या गप्पांसारखा सहज झाला आहे लेख. सहज आणि उत्कट.

मि. प्रदीप,
फारच सुंदर लेख आहे.  आपण भाग्यवान आहात की आपल्याला त्यांचा इतका निकटचा सहवास लाभला.
 

सुरेश भटांची आज पुन्हा नव्याने ओळख झाली.
आपलेपणाच्या भावनेतून लिहलेला साधासोपा लेख फार आवडला.

-सौरभदा