भटांशी भेट : केदार पाटणकर

`माझ्याकडे वळून म्हणाले, "आता तू ऐकव". मी सुरूवात केली,"जीवनाला मी कुठे नाकारले?जे जसे आले तसे स्वीकारले....मतला संपतो न संपतो तोच ते म्हणाले,"ते जसे आले तसे स्वीकारले!" केवळ एका अक्षराचा बदल करून त्यांनी मतला एकदम टोकदार केला होता. अवघ्या एका निमिषात. प्रतिभा म्हणजे काय, हे मला झटक्यात समजले.

              गझला लिहू लागल्यानंतर सुरेश भटांविषयी खूप काही कानी येऊ लागले आणि त्यांच्याबद्दलची उत्सुकता मनात दाट दाट होऊ लागली. भट माझ्या खूप खूप आधीचे. माझ्या पिढीतील अगदी थोड्या जणांना त्यांचे नाव माहीत आहे. मला तर वाटले होते, की बाराखडी वाचली जाणे हीच भाग्याची गोष्ट. त्यांच्याशी भेट तर दुर्लभच. 
              पण काही गोष्टी घडायच्या असतातच. गरवारे महाविद्यालयात 'रविश' नावाचा एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात भटांनी उपस्थिती लावली आणि अगदी थकलेले असे भट मी जवळून पाहिले. तत्पूर्वी मी त्यांना ९७ साली भरत नाट्य़ मंदिरात झालेल्या कार्यक्रमात लांबून पाहिले होते. मी प्रेक्षक होतो. गरवारे मधील कार्यक्रम संपला आणि कवी दीपक करंदीकरांनी येऊन सांगितले,"सिंहगड रस्त्यावर एका परिचितांकडे दादा उतरले आहेत". मी लगोलग त्यांच्याकडून पत्ता घेतला.
             मित्र समीर पेशवे याला घेऊन मी त्या घरी पोचलो. आत दबकतच पाऊल टाकले. भट स्वतःच्या नेहमीच्या गर्जना करणा-या आवाजात कोणाशीतरी बोलत होते. आम्हाला पाहताच ते उद्गारले, "तुम्ही कोण?"आम्ही नावे सांगितली. ते स्वगतच पण प्रश्नार्थक मुद्रेने उद्गारले,"पेशवे आडनाव असतं?" त्याही वयात लहान मुलासारखं कुतुहल त्यांच्या चेह-यावर पसरलं होतं. आम्ही आत गेलो. त्यांच्याशी बोलणारी व्यक्ती निघून गेली. आम्ही जुजबी परिचय करून दिला.
             समीरने एक गझल ऐकवली. त्याच्या गझलेत काही सुधारणा त्यांनी सांगितल्या. माझ्याकडे वळून म्हणाले, "आता तू ऐकव". मी सुरूवात केली,"जीवनाला मी कुठे नाकारले?जे जसे आले तसे स्वीकारले....मतला संपतो न संपतो तोच ते म्हणाले,"ते जसे आले तसे स्वीकारले!" केवळ एका अक्षराचा बदल करून त्यांनी मतला एकदम टोकदार केला होता. अवघ्या एका निमिषात. प्रतिभा म्हणजे काय, हे मला झटक्यात समजले. ती गझल मी पूर्ण केली. आणखी एक मतला ऐकवला.त्यालाही त्यांनी दाद दिली. अनेक बारीक बारीक गोष्टी सांगितल्या. म्हणाले, "काफिये सुचले की लिहून ठेवत जा".
            गझलेतून मराठी, मराठीतून महाराष्ट्र असे विषय निघाले. महाराष्ट्र हा तर त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. एका सुप्रसिध्द साहित्यिकाचे नाव घेऊन ते म्हणाले, "यांचं लेखन वगैरे चांगलं आहे पण हा माणूस कधी एकसंध महाराष्ट्राच्या बाजूने बोलला का?" पोटतिडीक अक्षरशः जाणवत होती.
           स्वतःच्या गझला सोडून त्यांनी इतरांच्या आवडलेल्या गझलांचे एक-दोन मतले ऐकवले. बिनीचे गझलकार प्रदीप निफाडकरांचा 'हे तुझे आले फुलांचे शहर बाई, स्वप्नमेण्यातून खाली उतर बाई' हा मतला ऐकवताना तर ते बेहद्द खूष होते. ऐकवताना त्यांचा प्रफुल्लित चेहरा पाहण्यासाऱखा होता.
           कौटुंबिक बाबींची चौकशीही भटांनी मायेने केली. आणखी काही गप्पा झाल्या आणि भट एकदम उठले."ठीक आहे, भेटी होत राहतील"असं काहीसं पुटपुटून काठीच्या आधाराने हळू हळू चालत आत गेले. आम्ही झटकन उठलो, वाकून नमस्कार केला आणि त्यांचा निरोप घेतला.
          केवळ पाऊण तासाच्या त्या भेटीतील लक्षात राहिलेल्या गोष्टी इतक्याच:जिव्हाळ्याचा विषय निघाला की डरकाळी फोडल्यासारखं बोलणं, गझल एक भुवई वर करून ऐकणं, आजारामुळे आलेली असहायता आणि गात्रं थकलेली असूनही तरूण असलेली प्रतिभा. घरी परतताना रात्रीच्या त्या निवांत वातावरणात मनात तीन गोष्टी होत्या: करूणा, प्रेरणा आणि सादर वंदन. 
          जीवनात एकदाच गझलसम्राटांशी भेट झाली. पहिली आणि शेवटची. त्यानंतर वर्षभरातच ती बातमी आली.        
                                                                                                                     - केदार पाटणकर
            
                  


Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

केदार छान लेख आहे. वाचताना खूप मजा आली.
धन्यवाद!