कोण आहे तुझा मी?

==========================

मनाशी  पुन्हा  प्रश्न  आला  जुना- 'कोण  आहे  तुझा  मी'
मला  तू  तरी  एकदा  सांग ना, कोण  आहे  तुझा  मी?

तुला  मी  कितीदा तरी  बोललो  कोण  आहेस  माझी
मलाही  कळू दे  तुझ्या  भावना, कोण  आहे  तुझा  मी!

तुला  लाज  माझ्यामुळे  वाटते  की  तुला  गर्व  आहे?
तुझे  व्यंग  किंवा  तुझा  दागिना... कोण  आहे  तुझा  मी?

जगाने  किती  तर्क  केले, किती  मांडले  ठोकताळे..
कुणालाच  आली  कुठे  कल्पना- कोण  आहे  तुझा  मी!

तुझी  एवढी  काय  माझ्यावरी  मालकी  चालते  रे?
मला  एकदा  सांग  माझ्या  मना, कोण  आहे  तुझा  मी..

खुशालीप्रमाणे  तरी  एकदा  तू  लिही  पत्र  साधे...
बघू  देत  पत्रातला  मायना.. कोण  आहे  तुझा  मी

"तुझ्या  वर्तमानास  व्यापून  आहे, तुझा  श्वास  आहे"
फुकाचेच  दावे..खुळ्या वल्गना.. कोण  आहे  तुझा  मी?

तुझ्या  जाणिवांच्या  परीघात  माझे  जिणे  का  फिरावे?
मला  का  कळाव्या  तुझ्या  वेदना?कोण  आहे  तुझा  मी?

 कुणी  वेगळा  'मी' जणू  राहतो  या  शरीरात  माझ्या..
 स्वतःचा  स्वतःशी  सुरू  सामना- कोण  आहे  तुझा  मी?

जरासेच  नि:संग  होताच  पायात  घोटाळशी  तू
किती  रे  लळा  लावशी  जीवना! कोण  आहे  तुझा  मी..?

 

 

-ज्ञानेश.
============================

(अलामतीत  सूट  घेतली  आहे.)

गझल: 

प्रतिसाद

गझल आवडली.

सलाम साहेब...
सगळी गझल आवडली..... सगळीच्या सगळी....

तुझी  एवढी  काय  माझ्यावरी  मालकी  चालते  रे?
मला  एकदा  सांग  माझ्या  मना, कोण  आहे  तुझा  मी..
वावाव्व्व...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

कुणालाच  आली  कुठे  कल्पना- कोण  आहे  तुझा  मी!
क्या बात है....!
हे असंच होतं नेहमी... :-)
 
सुंदर गझल आहे!!!!!

वाह..! गझल आवडली नेहमीप्रमाणेच.

भावना, कल्पना :), वेदना, वल्गना हे शेर खास.

तुझ्या  जाणिवांच्या  परीघात  माझे  जिणे  का  फिरावे?
मला  का  कळाव्या  तुझ्या  वेदना?कोण  आहे  तुझा  मी?

वाह..!!

तुला  मी  कितीदा तरी  बोललो  कोण  आहेस  माझी
मलाही  कळू दे  तुझ्या  भावना, कोण  आहे  तुझा  मी!
हा साधेपणा, भोळेपणा फार आवडला. 'व्यंग्य की दागिना' व 'कल्पना'ही.

सर्वोत्तम वाटले. शुभेच्छा!
- चक्रपाणि जीवन चिटणीस

छान गझल
मना, कल्पना आवडले

क्या बात है !! इतका मोठा रदीफ सांभाळणं किती सहजतेनं केलंय !! सगळीच गझल आवडेश :)

सोनाली, आनंदयात्री, मधुघट, निशा, चित्त, चक्रपाणि, मिल्या, जयश्रीताई  आणि  इतर  सर्वांचे  आभार.

लाजवाब गझल! खूप खूप आवडली.
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

खुशालीप्रमाणे  तरी  एकदा  तू  लिही  पत्र  साधे...
बघू  देत  पत्रातला  मायना.. कोण  आहे  तुझा  मी  - साधीसुधी भाषा ... छान.
स्वतःचा  स्वतःशी  सुरू  सामना - हे आवडले.
कलोअ चूभूद्याघ्या

खुप आवडली. दागिना आवडले,

सगळी गझल आवडली.....