असेच हल्ली मनास होते...

=============
विरंगुळा या मनास नाही
उमेद या जीवनास नाही..

असेच हल्ली मनास होते,
उदास आहे/ उदास नाही..

अजून थोडे चिडून भांडू ,
पुरी निघाली भडास नाही !

छळून गेला सवाल, ज्याला-
कधीच नेले धसास नाही.

चुकून झाले.. चुकून होते..
दुखावण्याचा हव्यास नाही !

कसा सुखाचा फलाट यावा?
तुझ्या दिशेने प्रवास नाही...

"विमा"च घेतो करून, देवा..
तुझा भरोसा अम्हास नाही !!

-ज्ञानेश.
===============

गझल: 

प्रतिसाद

विमा शेर वेगळाच आहे. छान शेर!
आपल्यामधे एक गुण वाढीस लागत आहे असे माझे या गझलेवरून मत झाले आहे.
ते म्हणजे, विचार मांडताना 'स्पेसिफिक' काहीही न म्हणता एखादी भावना किंवा एखादी व्यथा व्यक्त करून मोकळे होणे.याचे उदाहरण खालील शेरामधे आहे.
असेच हल्ली मनास होते,

उदास आहे/ उदास नाही..
अजून थोडे चिडून भांडू ,

पुरी निघाली भडास नाही !
छळून गेला सवाल, ज्याला-

कधीच नेले धसास नाही.
चुकून झाले.. चुकून होते..

दुखावण्याचा हव्यास नाही !काही काही वेळा नुसते 'भावना व्यक्त' होणे चांगले वाटते.
काही काही वेळा स्पेसिफिक सांगणे चांगले वाटते.उदा: विमाच घेतो करून देवा, तुझा भरोसा अम्हास नाही.
मात्र आपल्याकडून हे चुकून वगैरे झाले असेल तर ते अयोग्य ठरावे. मला खात्री आहे की आपण हेतूपुरस्परच असे शेर केले आहेत.आणखीन एकः मतला चांगला वाटला. पण तशी मनस्थिती का असावी याचा स्मेल येत नाही. तो यावा असे माझे वैयक्तिक मत! हे सगळे लिहिताना आपली दोघांची एकमेकांशी व्यवस्थित ओळख आहे व मैत्री आहे या बेसिसवर लिहीत आहे. राग नसावा.
छान.
हव्यास  शब्द बसत नाही.
प्रयास कसा वाटतो ?

केदार,

माझ्यामते हव्यासचा उच्चार 'हव्व्यास' असा नसावा. जोडाक्षराचे फीलिंग येऊ नये असे माझे मत आहे.

भूषण,

बरोबर.

परंतु, शब्द हव्व्यास या रचनेने जो उच्चार होतो, हव्यास असाच लिहिला जातो.

बाकी, मत पटण्यासाऱखेच आहे.

हव्यास (हव्व्यास) वॄत्तात बसत नाही. विचार व्हावा.
विरंगुळा या मनास नाही
उमेद या जीवनास नाही..       का रे बाबा!
मतल्यात नास नाही सामायिक असताना सर्व शेरांमध्ये हवे(च) होते. मतल्यात सूट घेतली नाही. ठीक आहे म्हणा. तुम्ही आशयाच्या दॄष्टीने बदल करू शकत नसाल तर राहू देत. पण तसे टीप म्हणून द्यायला हवे होते असे माझे मत आहे.
फलाट आणि विमा छान.
राग मानू नका, पण गझल खूप धारदार नसेल तर तंत्राच्या बाजू तरी सांभाळणारी हवी.
कलोअ चूभूद्याघ्या

भूषणजी, केदार, जोशी साहेब- प्रतिसादाबद्दल  आभारी  आहे.
@जोशी  साहेब-
" गझल खूप धारदार नसेल तर तंत्राच्या बाजू तरी सांभाळणारी हवी."
हे  अगदी  मंजूर. खरं सांगायचं तर गझल  धारदारही  हवी, आणि  तंत्रशुद्धही.
वस्तुस्थिती  अशी  आहे, की  या  गझलेचे  काही  शेर अनेक  दिवसांपासून  प्रभावी  मतल्याअभावी  पडून  होते. 'मिठीत  आता मिठास  नाही..' असा  एक मिसरा  डोक्यात होता. पण त्याला  योग्य  जोडीदार  मिळाला नाही. सदर  गझलेतला  मतला  हा  गझल  टाईप  करायला  घेतल्यावर 'जसा  जमेल तसा' या भावनेतून उतरवला  आहे. त्याच्याकडे  तांत्रीक वा अन्य  कुठल्याही  बाजूने पाहिलेले  नाहीये.  शक्य असते तर 'मतल्याशिवाय' ही गझल  प्रसिद्ध  करणे आवडले असते मला.
मनस्थितीचा  'स्मेल' येत नाही, हा भूषण  यांचा  आक्षेपही  मान्य आहे.
तुम्ही  कुणीही  चांगला मतला सुचवलात तर बरे  होईल. कारण या गझलेवर  अजून  काम करणे मला जमेलसे वाटत नाही...
अजून एक- माझी  पुढची  गझल (निदान ३-४ शेर तरी) 'धारदार' असतील, असे वचन देतो.
प्रतिसादाबद्दल आणि स्नेहाबद्दल  सगळ्यांचे  पुनश्च  आभार!

प्रवास शेर छान वाटला.

असेच हल्ली मनास होते,

उदास आहे, उदास नाही
फार छान!!! इतर तांत्रिक बाबींची काळजी घ्यालच.

गझल आवडली.
मतल्यातल्या पहिल्या ओळीत आसपास घातल्यास कदाचित शेर सहज वाटेल असे माझे मत आहे.

विमा आणि उदास हे शेर आवडले!

ज्ञानेश,
आपली पुढची गझल निश्चितच धारदार होईल त्यासाठी शुभेच्छा.
तशा कोणाच्याच गझला धारदार किंवा मनाची एकदम पकड घेणार्‍या लगेच होत नाहीत. मीही त्यातलाच आहे. आपण सर्वजण (सर्वजण म्हणतोय मी) गझलेचे प्रवासी आहोत. जेवढे अधिक प्रवास करू तेवढे अधिक माहित होईल.
फक्त काही वेळा प्रश्न हा निर्माण होतो की जेवढे माहित असते तेवढ्या दर्जाचे आपण लिहू शकत नाही. गझल कशी करावी हे माहीत असणे निराळे आणि उत्तम गझल करणे निराळे. मी उत्तम लिहिण्यावर विश्वास ठेवतो. तसाच प्रयत्न करतो. तो यशस्वी होतो असे माझे म्हणणे नाही. पण योग्य दिशेला पुढे नक्की नेतो. हे मी गझलेच्या नाही तर इतर अनुभवांवरून सांगतो आहे.
बोलणारे खूप आहेत. न बोलणारेही आहेत. करण्यावर माझा विश्वास आहे.
आपल्या धारदार गझल प्रवासाला पुनश्च मनापासून शुभेच्छा.
कलोअ चूभूद्याघ्या

देतो

चुकून झाले.. चुकून होते..
दुखावण्याचा हव्यास नाही !
कसा सुखाचा फलाट यावा?
तुझ्या दिशेने प्रवास नाही...
"विमा"च घेतो करून, देवा..
तुझा भरोसा अम्हास नाही !!
हे शेर सर्वात जास्त आवडले.

Last sher has a new and different idea.
कसा सुखाचा फलाट यावा?
तुझ्या दिशेने प्रवास नाही... great sher! ये शेर रूहानी  है.