रिवाज पाळू...

======================

रिवाज  पाळू , जरी  शहारा  कुठेच  नाही..
तुझ्या  न  माझ्याकडे.. बिचारा  कुठेच  नाही !

बरेच  काही  जुनेपुराणे  पडून  आहे..
मनात  आहे  तसा  पसारा  कुठेच  नाही !

दिशा  तुला  पाखरा  कशी  सापडेल  आता?
नभातला  तो  प्रकाशतारा  कुठेच  नाही..

निबंध  माझा  अशामुळे  वाटतो  अधूरा,
लहानसा  तो  तुझा  उतारा  कुठेच  नाही..

पुन्हा  असे  तू  नकोनकोसे  नकोच  बोलू ,
मला  हवे  तेच  बोलणारा  कुठेच  नाही

तुझ्याच  डोळ्यात  राहतो  मी, कुठे  न  जातो
हवाहवासा  असा  पहारा  कुठेच  नाही..

पुन्हा  जरासे  कुशीत  आता  मला  शिरूदे,
जगात  सार्‍या  असा  निवारा  कुठेच  नाही..

तुला  पटो  ना  पटो, तरी  हे  असेच  आहे
तसा  किनारा..पहाटवारा...  कुठेच  नाही !

बघून  माझी  तहान  वेडी, सुखावली  ती..
सुरा  म्हणाली- "असा  पिणारा  कुठेच  नाही..!"

फुला, तुला  स्पर्शल्यावरी  एवढे  कळाले -
"कुठेच  नाही ! असा  निखारा  कुठेच  नाही.."

 

-ज्ञानेश.

========================

गझल: 

प्रतिसाद

ज्ञानेश,
निखारा हा शेर अत्यंत सुंदर! हे वृत्तही अतिशय नाजूक वाटते ऐकताना किंवा वाचताना. आपली वृत्ताची हाताळणी अतिशय सहज होते. त्यामुळे शेर बरेच दिवस लक्षातही राहतात.
जसा हा शेर लक्षात राहिला.
जाहला बराच वेळ हात आपले अता सुटायला हवे
दु:ख थांबले असेल एकटे घरी मला निघायला हवे
अल्पावधीतच आपण उत्कृष्ट गझलकार होत आहात हे पाहून अतिशय आनंद झाला.

फुला, तुला  स्पर्शल्यावरी  एवढे  कळाले -
"कुठेच  नाही ! असा  निखारा  कुठेच  नाही.."
क्या बात है! हासिल-ए-गझल शेर.
निबंध  माझा  अशामुळे  वाटतो  अधूरा,
लहानसा  तो  तुझा  उतारा  कुठेच  नाही.. वाह!
एकूनच गझलची गेयता उत्तमच आहे आणि अर्थही.
१. सुरा म्हणजे सुरईच ना?
२. मतल्याच्या अर्थाच्या shades वर प्रकाश टाकावा ही विनन्ती.

रिवाज  पाळू , जरी  शहारा  कुठेच  नाही..
तुझ्या  न  माझ्याकडे.. बिचारा  कुठेच  नाही !

लगालगागा लगालगागा लगालगागा ! एक चांगले वृत्त! कवी केदारने पण हे वृत्त चांगले निभावले होते. शब्दसंख्या पुरेशी नसल्यास हे वृत्त घेऊ नये. कवी ज्ञानेशनेपण ते चांगले निभावले आहे. मतल्याच्या पहिल्या ओळीतच गझलेने इतकी बेसुमार उंची गाठलीय की प्रश्न पडावा की ही उंची सांभाळणे जमेल की नाही? तुझे अन माझे आता 'ते' प्रेम तर काही उरले नाही. पण एकेकाळी प्रेम होते, शपथा घेतल्या होत्या, म्हणुन का होईना निदान भेटत तर राहू? भेटण्याचे रिवाज पाळत राहू.  कवी चित्तरंजनच्या गाजलेल्या गझलचा मतला पण असाच होता. 'राहिले माझेतुझे नाते घसार्‍यासाखे, भेटतो भेटावयाला पण चुकार्‍यासारखे'! पण कवी चित्तरंजनच्या गझलच्या मतल्याच्या दुसर्‍या ओळीच्या जवळ मात्र कवी ज्ञानेशची ओळ गेलेली नाही. तुझ्या न माझ्याकडे बिचारा कुठेच नाही. इथे एक घोटाळा होत आहे. इथे 'शहार्‍या'ला 'बिचारा' म्हंतले गेले आहे. शहारा बिचारा असण्याचे काहीही कारणच नाही. घोळ होत आहे. बिचारा प्रियकर किंवा प्रेयसी किंवा दोघेही असू शकतात, शहारा असू शकत नाही. घाई!

बरेच  काही  जुनेपुराणे  पडून  आहे..
मनात  आहे  तसा  पसारा  कुठेच  नाही !

खरे आहे. मनात जे जे राहते ते व तितके कुठेच राहू शकत नाही. अगदी खरे आहे. गझलेचा शेर! सुंदर शेर!

दिशा  तुला  पाखरा  कशी  सापडेल  आता?
नभातला  तो  प्रकाशतारा  कुठेच  नाही..

संदिग्धता! याच कवीने म्हंटले आहे की शेर संदिग्ध असू नये हे खरे पण एकाच शेरातुन एकापेक्षा जास्त अर्थ निघणे वाईट आहे काय? याचे उत्तर आम्ही आज देतो. कवीला अभिप्रेत असलेला अर्थ कवीने स्पष्टपणे सांगावा. रसिकांना काहीही अर्थ काढू देत. रसिकांनी काढलेल्या अर्थांना वाचून 'अरे हो , मला असेच म्हणायचे होते असे आता वाटतेय' असे म्हणणे चूक आहे. आकाशात सूर्य नाही त्यामुळे हे पक्ष्या तुला दिशा कशी सापडणार? असा या शेराचा 'शब्दार्थ' निघतो. पण गर्भितार्थ काय? १. कवी स्वतःला पक्षी मानत आहे जेथे प्रेयसी ही प्रकाशतारा आहे. २. कवी हे एका कुठल्याही आयुष्याची दिशा चुकलेल्या माणसाला सांगत आहे. ३. कवी हे प्रेयसीला सांगत आहे की बाईगं ( यातला गं हा दळण या गझलेतला गं आहे ) आता मीच नाही तिथे तुला काय दिशा सापडणार? पण यातल्या कुठल्याही शेराचा अर्थ अजिबात विशेष नाही. पण हे वाचून लगेच कवीने या साईटचा राजीनामा वगैरे देऊ नये. मागे एकदा तो प्रयत्न झालेला होता. एवढेच मानावे की हा शेर संदिग्ध आहे. 

निबंध  माझा  अशामुळे  वाटतो  अधूरा,
लहानसा  तो  तुझा  उतारा  कुठेच  नाही..

गंमत आहे! याच कवीने 'जाहला बराच वेळ', 'गोष्टी', 'तुझ्या-माझ्यात झालेले', 'जुने विसरून गेलेले', 'भेट चोरटी - २ ' या गझला रचल्या आहेत. हाच कवी असेही शेर रचतो.

पुन्हा  असे  तू  नकोनकोसे  नकोच  बोलू ,
मला  हवे  तेच  बोलणारा  कुठेच  नाही

ही पण गंमत आहे.

तुझ्याच  डोळ्यात  राहतो  मी, कुठे  न  जातो
हवाहवासा  असा  पहारा  कुठेच  नाही..

गंमत!

पुन्हा  जरासे  कुशीत  आता  मला  शिरूदे,
जगात  सार्‍या  असा  निवारा  कुठेच  नाही..

चांगला शेर! अतिशय चांगला शेर! इथे 'कुशीत' हा शब्द 'प्रेयसी', 'आई', 'जीवन', 'दु:ख', 'नशा' यांच्यापैकी कुणालाही उद्देशून असू शकतो. आता प्रश्न असा आहे की कवीने तो कुणाला उद्देशून रचला आहे. हे कवीनेच सांगावे.

तुला  पटो  ना  पटो, तरी  हे  असेच  आहे
तसा  किनारा..पहाटवारा...  कुठेच  नाही !

खरे आहे. हासिल्-ए-गझल शेर! खरच खरे आहे. मित्रांनो, हा शेर अप्रतिम आहे! 'प्रिये, आता तो भूतकाळ आपल्या जीवनात परत येणार नसून आता आपल्याला वास्तवाचा सामना करायचा आहे, हे तुला पटो ना पटो पण सत्य आहे'! अत्यंत अंतर्मुख करणारा शेर!

बघून  माझी  तहान  वेडी, सुखावली  ती..
सुरा  म्हणाली- "असा  पिणारा  कुठेच  नाही..!"

कवी भूषणशी जास्त मैत्री करणे योग्य वाटत नाही.  तो सारखा सारखा दारूवर काहीतरी लिहित असतो. तसेच कवी नीरजने तर 'दारू' या विषयावरच एक रचना 'हझल' म्हणुन प्रकाशित करून घेण्यात अभूतपूर्व यश मिळवले होते.  ( एक आपला विनोद! ) पण हा शेरही एक गंमतच आहे.

फुला, तुला  स्पर्शल्यावरी  एवढे  कळाले -
"कुठेच  नाही ! असा  निखारा  कुठेच  नाही.."

प्रियेच्या नाजुकतेला आग म्हणुन संबोधणे ही फार जुनी बाब आहे. पण कवीने ती ( जरी नावीन्यपुर्वकपणे  नसली तरी ) पटेलशी हाताळली आहे.  आमच्यामते या शेरात 'स्पर्शल्यावरी'च्या ऐवजी एखादा दुसरा शब्द घालावा. जसे 'जाणल्यावरी' वगैरे! म्हणजे त्यातील सवंगतेची पॉसिबिलिटी नष्ट होईल.

हासिल-ए-गझल शे वर दिलाच आहे. गझलेच्या आकर्षणामुळे गझल करणे ही भावना त्यागून याच वृत्तातली याच आशयाची एक गझल 'आम्ही म्हणतो आहोत' म्हणुन प्रकाशित करून घ्यावी अशी इच्छा!

आदरणीय  ज्ञानेश,
दुसरा,पाचवा व सहावा शेर  आवडले.

ज्ञानेश,
बहोत खूब !
गझल नावाची प्रेयसी आपल्याला वश होत आहे...!

भूषणजी, धनंजय बोर्डे, गंभीर समीक्षक, सुनेत्राजी, केदार.. सर्वांचे  आभार.
@धनंजय- 'सुरा' म्हणजे मद्य. मतल्याचा अर्थ समीक्षकांनी स्पष्ट केला आहेच. तुझ्या किंवा माझ्याकडे 'शहारा' नाही, तरी रिवाज पाळावे लागत आहेत. यामुळे  खरं तर  आपण 'बिचारे' आहोत. पण शहार्‍याला 'बिचारा' म्हणण्यात थोडा उपहास आहे, जो जाणवत नसेल तर ते माझे अपयश आहे.
@गं.स.- सविस्तर प्रतिसादाबद्दल आभारी आहे. तुमच्या सुचना पुढील गझललेखनात मार्गदर्शक ठरतील.
काही  गोष्टी- १) कवी भूषण आणि कवी नीरज हे मित्र आहेतच, पण त्यांच्या प्रभावाखाली कुठलाही शेर रचलेला नाहीये. 'मदिरा' हा गझलेचा जुनाच विषय आहे. त्यामुळे या शेराकडे एक स्वतंत्र शेर म्हणूनच पाहिले जावे, ही अपेक्षा.
२)शेवटचा शेर तुम्हाला वाटला तसा रोमँटीक नसून, थोडा नकारात्मक अर्थाने रचला आहे.
३)गझलेच्या आकर्षणामुळे गझल करणे ही भावना त्यागून याच वृत्तातली याच आशयाची एक गझल 'आम्ही म्हणतो आहोत' म्हणुन प्रकाशित करून घ्यावी अशी इच्छा!
यातला 'गझलेच्या आकर्षणामुळे..' हा भाग समजला नाही. बाकी तुमची इच्छा पुर्ण करायचा प्रयत्न करेन.
आभार!

तुझ्याच  डोळ्यात  राहतो  मी, कुठे  न  जातो
हवाहवासा  असा  पहारा  कुठेच  नाही
हासिलेगझल शेर हा आहे. समीक्षकांना तो लक्षात आलेला नाही.
पण....
एकंदर गझल सामान्य आहे!

 ज्ञानेशजी, धन्यवाद!
शहारा कळायला थोडासा वेळ लागला. तो एकदा कळल्यावर, शहार्‍याला 'बिचारा' म्हणण्यातला उपहास नक्कीच ध्यानात येतो.
 
 

श्रीयुत समीक्षक,
माझी एक विनंती आहे की आपण कुठल्याही कवीला त्याने कुणाशी मैत्री करावी अथवा करू नये याचे सल्ले देऊ नयेत, गझलेवर चर्चा झालेली उत्तम वाटेल.

तुझ्याच  डोळ्यात  राहतो  मी, कुठे  न  जातो
हवाहवासा  असा  पहारा  कुठेच  नाही..

कलोअ चूभूद्याघ्या

खुप आवडली. पाखरा आवडले.

तुझ्याच डोळ्यात राहतो मी, कुठे न जातो
हवाहवासा असा पहारा कुठेच नाही..
सर्वात आवडलेला शेर...
संपूर्ण गझल आवडली...
(मतल्याबद्दल गं.स. शी सहमत)

बरेच काही जुनेपुराणे पडून आहे..
मनात आहे तसा पसारा कुठेच नाही !

जास्त भावला.
बाकी पुर्ण गझलच आवडली.