तुझ्या - माझ्यात...

========================

किती होते निराळे ते तुझ्या - माझ्यात झालेले
कुणा नाही कळाले ते, तुझ्या - माझ्यात झालेले..

ढगामध्ये, मनामध्ये, कुणाच्या पापण्यामध्ये..
कुठे नाही गळाले ते, तुझ्या - माझ्यात झालेले

असू दे ओल थोडीशी मनाला भूतकाळाची,
नको मोजू उन्हाळे ते, तुझ्या - माझ्यात झालेले..

नव्हाळी ती, जिव्हाळे ते, दिलासे ते, खुलासे ते,
उसासे ते, उमाळे ते... तुझ्या माझ्यात झालेले !

तुला ना आठवे काही, मलाही काळजी नाही
कुणाचेही न झाले ते, तुझ्या - माझ्यात झालेले...

कळेना खून होता की, असावी आत्महत्या ती?
पुलाखाली मिळाले ते, तुझ्या - माझ्यात झालेले..!

========================

गझल: 

प्रतिसाद

प्रिय मित्र ज्ञानेश?
असे करू नये. खून-आत्महत्येचा शेर किती छान केलास? परत परत वाचावासा वाटतो अन वेळ जातो की नाही? असे करू नये.
खुलासे हा शब्द कित्ती सुंदर वापरलास तू?
उन्हाळ्याचा शेर पण छान !
फक्त जरा पापण्या ह्या शब्दावर अनुस्वार दे पाहू.
तुझ्या ह्या वृत्तातल्या गझला एकदम गझला असतात बर का?
म्हणजे चीज चिली टोस्ट मागावा व हॉटेलमधले मशीन पण चालू असावे असा आनंद होतो. हो की नाही?
मी आपला.....तेच नेहमीचे!

असू  दे  ओल  थोडीशी  मनाला  भूतकाळाची,
नको  मोजू  उन्हाळे  ते, तुझ्या - माझ्यात झालेले..
कळेना  खून होता  की, असावी  आत्महत्या  ती?
पुलाखाली  मिळाले  ते, तुझ्या - माझ्यात झालेले..!      छान कल्पना.
कलोअ चूभूद्याघ्या

ज्ञानेश,
उत्तम गझल. मजा आली. आपण साध्या शब्दात फार छान लिहिता.
धन्यवाद!

ज्ञानेश,

आपण उत्तम लिहिता. सर्व शेर छान.

काही मुद्दे
१. ते ही अलामत आहे, असे दिसते. असे असेल तर तंत्र चुकलेले नाही.
     अलामत पाळलेली आहे व अलामतीनंतर रदीफ येत आहे.
२. मतल्यात ळे व ले ही अक्षरे येत आहेत. शंका अशी येत आहे, की ळे किंवा ले पैकी एकच अक्षर आपल्याला संपूर्ण गझलेत ठेवायचे होते पण ते यशस्वी न झाल्यामुळे दोन्ही अक्षरे येत गेली. असे झाल्यामुळे ळे वा ले हीच अलामत आहे की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. निरीक्षणांती हे समजते, की ते हे अक्षर अलामतीचे आहे.   
३. जेव्हा, एकच अक्षर अलामतीचे असते तेव्हा कवी अलामतीच्या नियमातून अलगद सुटतो. ते अक्षर घेणे आणि त्या आधी कोणतीही रचना करणे, हे कवीला सहजशक्य होते.  
    असे झाल्यास तंत्रावर आक्षेपही घेता येत नाही.
   त्यामुळे अशी सवलत देणारी रचना नाइलाज असेल तरच करावी.
४. अशा पध्दतीची  एकाक्षरी अलामत घ्यायची असेल तर जरूर घ्यावी परंतु, जेते, नेते, करावे ते, पसारे ते अशी रचना असावी. अशी रचना केल्यास संशय, शंका व प्रश्नांना जागा रहात नाही आणि अलामतीच्या मागे वैिवध्यही येते.
     
शुभेच्छा.
 
केदार,
या गझलेत 'ते' ही अलामत नाहीये हो?

शेवट्चा शेर .... सगळ्यात कडी .....
अतिशय लयबद्ध आणी सुन्दर...

ते हा रदीफाचाच भाग नाही का?.. तसे असेल तर ह्या गझलेतील काफियांना स्वर-काफिये म्हणावे का?..चू.भू.द्या,घ्या.
-मानस६

अन् व्हेरीफाईड रसिक,
ते ही अलामत नाही. त्यामागची ए ही अलामत आहे.

मला लक्ष वेधायचे होते 'ते' कडे. 

मानस,
आपला मुद्दा रास्त आहे. अगदी बरोबर.

आवडला. बाकी ही रचना गझलेच्या अंगाने जात नसून, कविता असल्यासारखी वाटते . 

असू  दे  ओल  थोडीशी  मनाला  भूतकाळाची,
नको  मोजू  उन्हाळे  ते, तुझ्या - माझ्यात झालेले..
असू  दे  ओल  थोडीशी  मनाला  भूतकाळाची,
नको  मोजू  उन्हाळे  ते, तुझ्या - माझ्यात झालेले..
ज्ञानेशा अप्रतिम शेर!!

प्रिय मित्र ओंकार,
गझलेच्या अंगाने जात नसून कविता वाटते म्हणजे काय ते विस्तॄत स्वरूपात सांगशील का?
नुसतेच तसे म्हणणे म्हणजे भिसीतल्या बायकांनी अनुपस्थित बाईवर केलेल्या टीकेसार्...असो मी गप्प आहे.

भाऊ, आपल्या भात्यात किती तिर आहेत, आम्हाला सांगा तरी....
सर्वांग सुंदर..-

असू दे ओल थोडीशी मनाला भूतकाळाची,
नको मोजू उन्हाळे ते, तुझ्या - माझ्यात झालेले..

अप्र्त

केदार,

आपले खालील म्हणणे मला समजले नाही. कृपया सांगावेत.

१. ते ही अलामत आहे, असे दिसते. असे असेल तर तंत्र चुकलेले नाही.
अलामत पाळलेली आहे व अलामतीनंतर रदीफ येत आहे.
२. मतल्यात ळे व ले ही अक्षरे येत आहेत. शंका अशी येत आहे, की ळे किंवा ले पैकी एकच अक्षर आपल्याला संपूर्ण गझलेत ठेवायचे होते पण ते यशस्वी न झाल्यामुळे दोन्ही अक्षरे येत गेली. असे झाल्यामुळे ळे वा ले हीच अलामत आहे की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. निरीक्षणांती हे समजते, की ते हे अक्षर अलामतीचे आहे.
३. जेव्हा, एकच अक्षर अलामतीचे असते तेव्हा कवी अलामतीच्या नियमातून अलगद सुटतो. ते अक्षर घेणे आणि त्या आधी कोणतीही रचना करणे, हे कवीला सहजशक्य होते.
असे झाल्यास तंत्रावर आक्षेपही घेता येत नाही.
त्यामुळे अशी सवलत देणारी रचना नाइलाज असेल तरच करावी.
४. अशा पध्दतीची एकाक्षरी अलामत घ्यायची असेल तर जरूर घ्यावी परंतु, जेते, नेते, करावे ते, पसारे ते अशी रचना असावी. अशी रचना केल्यास संशय, शंका व प्रश्नांना जागा रहात नाही आणि अलामतीच्या मागे वैिवध्यही येते.

माझ्यामते 'ते' हे अक्षर रदीफचा भाग आहे. ते अलामतीचे अक्षर कसे होईल?