राहिलो एकेकटे दोघे जगत....!

.......................................................
राहिलो एकेकटे दोघे जगत....!
.......................................................


हुरहुरत तूही नि मीही तगमगत...!
राहिलो एकेकटे दोघे जगत...!


जागवत बसलो स्वतःला व्यर्थ मी
मीच माझे ऐकले नाही स्वगत...!


गंध उडतो; रंगही पडतो फिका...
शेवटी सार्‍या फुलांची हीच गत...!!


आणखी, माझ्या जवळ ये, आणखी...
तू जरी आहेस ह्रदयाच्या लगत...!


कोळसा समजून ज्याला फेकले
दूर तेथे राहिला तो झगझगत...!


मी विचारू कोणत्या झाडास हे -
`रोपटे माझेच का नाही तगत...?`


मी दिले सोडून स्वप्ने पाहणे...
आस मी कुठलीच नाही बाळगत...!


संकटांनो, वादळांनो या तुम्ही -
- या तुम्ही...!  नाही अता मी डगमगत...!


संपली राज्ये नि साम्राज्ये किती...
हीच बाबा, हीच आहे, कालगत...!


शांत बाहेरून मी वाटे जरी...
नेहमी आतून असतो धगधगत...!


चीज मी चोरीस गेलेली जणू...!
मज कुणी केलेच नाही हस्तगत...!!


- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

राहिलो एकेकटे दोघे जगत...!  वाव्वा! गझल आवडली.
त्यातही--
गंध उडतो; रंगही पडतो फिका...
शेवटी सार्‍या फुलांची हीच गत...!!

चीज मी चोरीस गेलेली जणू...!
मज कुणी केलेच नाही हस्तगत...!!

हे शेर फारच आवडले.

वा प्रदीपराव,
बर्‍याच दिवसांनी आम्ही येथे आलो आणि आल्याआल्या या ग़ज़लेची मेजवानी मिळाली.
मागील खेपेस अनंत ढवळे यांच्या अशाच एका अप्रतिम ग़ज़लेची मेजवानी मिळाली होती.
आपला,
(तृप्त) धोंडोपंत
या ग़ज़लेबद्दल बोलायचे म्हणजे -
क्या बात है ! सुंदर ग़ज़ल. अगदी नेहमीप्रमाणे सुंदर.
फार सुंदर चालवलाय क़ाफ़िया.  रदीफ़ नसेल तर सर्व भार क़ाफ़ियावर येतो.  तो जर नीट निभावला गेला नाही, तर संपूर्ण ग़ज़ल फसते. 
पण इथे प्रत्येक क़ाफ़िया उत्तमपणे निभावलेला आहे.  अप्रतिम.
प्रत्येक शेर सुंदर आहे.  प्रत्येक शब्दाला योग्य तो न्याय मिळाला आहे.  बहोत ख़ूब.
आपला,
(आस्वादक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

एकदम वेगळी गझल - खूप आवडली.
आणखी, माझ्या जवळ ये, आणखी...
तू जरी आहेस ह्रदयाच्या लगत...!

कोळसा समजून ज्याला फेकले
दूर तेथे राहिला तो झगझगत...!

चीज मी चोरीस गेलेली जणू...!
मज कुणी केलेच नाही हस्तगत...!!

हे विशेषतः जास्त आवडले.

संपूर्ण रचना आवडली...
गंध उडतो; रंगही पडतो फिका...
शेवटी सार्‍या फुलांची हीच गत...!!

आणखी, माझ्या जवळ ये, आणखी...
तू जरी आहेस ह्रदयाच्या लगत...!

कोळसा समजून ज्याला फेकले
दूर तेथे राहिला तो झगझगत...! हे तिन्ही शेर अप्रतिम!अजब

रोपटे आणि हस्तगत हे शेर मला फार आवडले!!

आणखी, माझ्या जवळ ये, आणखी...
तू जरी आहेस ह्रदयाच्या लगत...!


कोळसा समजून ज्याला फेकले
दूर तेथे राहिला तो झगझगत...!
खूपच सुंदर !
जागवत बसलो स्वतःला व्यर्थ मी
मीच माझे ऐकले नाही स्वगत...!
संपली राज्ये नि साम्राज्ये किती...
हीच बाबा, हीच आहे, कालगत...!
हेही आवडले. नाविन्यपूर्ण काफिया.

मी दिले सोडून स्वप्ने पाहणे...
आस मी कुठलीच नाही बाळगत...!


संकटांनो, वादळांनो या तुम्ही -
- या तुम्ही...!  नाही अता मी डगमगत...!


संपली राज्ये नि साम्राज्ये किती...
हीच बाबा, हीच आहे, कालगत
---सुन्दर लय,अतिसुन्दर आशय!
                दिलीप पांढरपट्टे