...का दिसेनात आता कुठे ?

...का दिसेनात आता कुठे ?

ओळखीचे जुने चेहरे का दिसेनात आता कुठे ?
आपल्या माणसांची घरे का दिसेनात आता कुठे ?

सांग, झाली कधीपासुनी ही सुखासीन कांती तुझी ?
सांग ना... बोचकारे, चरे का दिसेनात आता कुठे ?

भेटलो, बोललो, हासलो  काल मी ज्या सुखांच्या सवे...
...काय झाले असावे बरे ? का दिसेनात आता कुठे ?

मीच झालो कशाला इथे एकटा कावरा-बावरा ?
सोबती कावरे-बावरे का दिसेनात आता कुठे ?

कोरडे कोरडे हे जिणे वाहता वाहता थांबते -
- आणि पुसते मला ,`ते झरे का दिसेनात आता कुठे ?`

एकही पान ज्यांच्याविना त्या तरूचे न हलले कधी...
तीच त्याची पिले-पाखरे का दिसेनात आता कुठे ?

आज संबंध माझे-तुझे जीर्ण पत्राप्रमाणेच ना ?
जी हवी ती मला अक्षरे का दिसेनात आता कुठे ?

बोलणे,  ऐकणे, पाहणे यास धरबंद नाही अता...
संयमी ती तिन्ही वानरे का दिसेनात आता कुठे ?

हाल झाले कुणाचे कसे...  त्रास झाला कुणाला किती...
ते बिचारे सगे-सोयरे का दिसेनात आता कुठे ?

सांग, घेऊ कुठे आसरा ? सांग, आता कुठे मी दडू...?
जीवना रे,  तुझे कोपरे का दिसेनात आता कुठे ?

शोधिली मी किती मंदिरी, शोधिली मी उरी-अंतरी...
बा, विठोबा, तुझी लेकरे का दिसेनात आता कुठे ?

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

आज संबंध माझे-तुझे जीर्ण पत्राप्रमाणेच ना ?
जी हवी ती मला अक्षरे का दिसेनात आता कुठे
व्वा !!
तसेच ,
बा, विठोबा, तुझी लेकरे का दिसेनात आता कुठे ?
स्वच्छ ,प्रवाही आणि सुंदर गझल !!

पूर्ण गझल छान आहे.
कोरडे कोरडे हे जिणे वाहता वाहता थांबते -
- आणि पुसते मला ,`ते झरे का दिसेनात आता कुठे ?

आज संबंध माझे-तुझे जीर्ण पत्राप्रमाणेच ना ?
जी हवी ती मला अक्षरे का दिसेनात आता कुठे ?

फार आवडले...

बा विठोबा शब्द्प्रयोग पण खूप आवडला...

बोलणे,  ऐकणे, पाहणे यास धरबंद नाही अता...
संयमी ती तिन्ही वानरे का दिसेनात आता कुठे ?...
हा शेर अतिशय अर्थपूर्ण वाटला... संयमी वानरे...!! वा अतिशय उपहासात्मक..बोलका शब्द-प्रयोग!
-मानस६

अप्रतिम गझल आहे. सगळेच शेर खणखणीत झालेत. मात्र पुढील शेर लाजवाब; सलाम!!! -

सांग, झाली कधीपासुनी ही सुखासीन कांती तुझी ?
सांग ना... बोचकारे, चरे का दिसेनात आता कुठे ?

बोलणे,  ऐकणे, पाहणे यास धरबंद नाही अता...
संयमी ती तिन्ही वानरे का दिसेनात आता कुठे ?

शोधिली मी किती मंदिरी, शोधिली मी उरी-अंतरी...
बा, विठोबा, तुझी लेकरे का दिसेनात आता कुठे ?

- चक्रपाणि जीवन चिटणीस

हे तीन शेर मलाही फार फार आवडले!

गझल अतिशय उत्तम झाली आहे. सगळेच शेर फार आवडले.

त्यातही खालील शेर

ओळखीचे जुने चेहरे का दिसेनात आता कुठे ?
आपल्या माणसांची घरे का दिसेनात आता कुठे ?

मीच झालो कशाला इथे एकटा कावरा-बावरा ?
सोबती कावरे-बावरे का दिसेनात आता कुठे ?

आज संबंध माझे-तुझे जीर्ण पत्राप्रमाणेच ना ?
जी हवी ती मला अक्षरे का दिसेनात आता कुठे ?

शोधिली मी किती मंदिरी, शोधिली मी उरी-अंतरी...
बा, विठोबा, तुझी लेकरे का दिसेनात आता कुठे ?

क्या बात है.

प्रदीपराव,
नेहमीप्रमाणे ही गझलही उत्कृष्ट आहे.
रदीफबाबतची प्रयोगशीलता येथेही आपण जपली आहे.
निरनिराळे काफिये  घेऊऩ त्यांचा रदीफशी अर्थपूर्ण संबंध जोडण्याचे कसब आपल्यासारख्या ज्येष्ठांकडून शिकण्यासारखे आहे.   

ओळखीचे जुने चेहरे का दिसेनात आता कुठे ?
आपल्या माणसांची घरे का दिसेनात आता कुठे ?
भेटलो, बोललो, हासलो  काल मी ज्या सुखांच्या सवे...
...काय झाले असावे बरे ? का दिसेनात आता कुठे ?

आज संबंध माझे-तुझे जीर्ण पत्राप्रमाणेच ना ?
जी हवी ती मला अक्षरे का दिसेनात आता कुठे ?

जी हवीत अगदी तीच अक्षरे लिहिली आहेत...

ओळखीचे जुने चेहरे का दिसेनात आता कुठे ?
आपल्या माणसांची घरे का दिसेनात आता कुठे ?

मीच झालो कशाला इथे एकटा कावरा-बावरा ?
सोबती कावरे-बावरे का दिसेनात आता कुठे ?

आज संबंध माझे-तुझे जीर्ण पत्राप्रमाणेच ना ?
जी हवी ती मला अक्षरे का दिसेनात आता कुठे ?
हे शेर आणि रदीफचे वेगळेपण आवडले.
अजब

प्रदीपराव,
भन्नाट ग़ज़ल. फार सुंदर. बोलायला शब्द नाहीत.
काय भन्नाट वृत्त आहे. अशा वृत्तात लिहीणे म्हणजे ...... साष्टांग दंडवत तुम्हाला.
तुमचे वृत्तावरील असामान्य प्रभुत्व पाहून आम्ही नेहमीच थक्क होतो.
आपला,
(नतमस्तक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

अत्युत्तम गझल. वर उल्लेखिलेले शेर सर्वोत्तम.

सुंदर आणि परिपूर्ण गझल.

वावा
सगळी गझल आवडली

सांग, घेऊ कुठे आसरा ? सांग, आता कुठे मी दडू...?
जीवना रे, तुझे कोपरे का दिसेनात आता कुठे ?

हा शेर खूप आवडला.