...कवितेने दिले !

...कवितेने दिले !

विस्तवाचे दान कवितेने दिले !
चांदणेही छान कवितेने दिले !

जन्म हा निष्पर्ण झाडासारखा...
एक हिरवे पान कवितेने दिले !

व्यक्त हो चौफेर, डेरेदार तू...
मोकळे हे रान कवितेने दिले !

त्याच त्या गोष्टी जुन्या विसरून जा...
हे नवे आव्हान कवितेने दिले !

वेदना, दुःखे, व्यथा अन् आसवे...
तेच ते सामान कवितेने दिले !

जी नको ती जाण कवितेने दिली...
जे नको ते ज्ञान कवितेने दिले !

मान्य, मी ओसाड वाड्यासारखा...
हे जिणे सुनसान कवितेने दिले !

व्यर्थ ताळेबंद हा ठेवू नये...
मान की अपमान कवितेने दिले !

या तुम्हीही...एकटा घेऊ कसा...?
- जे मला रसपान कवितेने दिले !

या जगी कोण्या कवीला का कधी -
वास्तवाचे भान कवितेने दिले... ?

मौनही येते मला ऐकू तुझे...
मज अनोखे कान कवितेने दिले !

लाभले निर्भेळ काहीही कुठे...?
जे दिले दरम्यान कवितेने दिले !!

कोण मी होतो असा...माझ्याकडे -
एवढे का ध्यान कवितेने दिले ?

- प्रदीप कुलकर्णी

 

गझल: 

प्रतिसाद

व्यक्त हो चौफेर, डेरेदार तू...
मोकळे हे रान कवितेने दिले !
बहोत खूब

क्या बात है! फारच सुंदर ! मोजक्या शब्दांत अवघे मनोविश्व साकारणारी प्रतिभा आपल्या या गझलेत आहे. कवित्वावर प्रेम करावे असे वाटावे इतके ज्ञान देणारी गझल ! एकन् एक शेर सुंदर आहे !!!!
'गान' हाही काफिया वापरावा .
एक अनावश्यक सूचना करूं ?

जी नको ती जाण कवितेने दिली...
जे नको ते ज्ञान कवितेने दिले !
या शेरात दुसर्‍या ओळीत 'जे हवे ते...' म्हटले तर ...? 
 डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

एकूण  मस्त गझल आहे. पहिले ३ शेर, शेवटचा शेर आणि 'कान' फार विशेष.

मौनही येते मला ऐकू तुझे...
मज अनोखे कान कवितेने दिले !
क्या बात है. गझल चांगली आहे पण काही शेर नसते तरी चाल्ले असते.

जन्म हा निष्पर्ण झाडासारखा...
एक हिरवे पान कवितेने दिले !  हा शेर जास्त आवडला.
व्यक्त हो चौफेर, डेरेदार तू...
मोकळे हे रान कवितेने दिले !  मस्त
मान्य, मी ओसाड वाड्यासारखा...
हे जिणे सुनसान कवितेने दिले !.. बहोत खुब
या तुम्हीही...एकटा घेऊ कसा...?
- जे मला रसपान कवितेने दिले !  .. वा

आपणास राग येणार नसेल तर मित्रत्वाच्या नात्याने एक सुचवू का?.. आपल्या गझलेतील आशय चांगलाच असतो..पण शेरांची संख्या जरा कमी करता आल्यास बघणे..जास्त 'वाचनीय' होईल
-मानस६व्यक्त हो चौफेर, डेरेदार तू...
मोकळे हे रान कवितेने दिले !

जी नको ती जाण कवितेने दिली...
जे नको ते ज्ञान कवितेने दिले !

मौनही येते मला ऐकू तुझे...
मज अनोखे कान कवितेने दिले !

लाभले निर्भेळ काहीही कुठे...?
जे दिले दरम्यान कवितेने दिले !!

कोण मी होतो असा...माझ्याकडे -
एवढे का ध्यान कवितेने दिले ?
----वा वा प्रदीप.! परिपूर्ण गझल!तु़झ्याकडे गझलेने विशेष ध्यान दिले आहे हे मात्र खरे!
येऊ द्या..
जयन्ता५२

शेर सुंदर असतील तर शेरांची संख्या गौण मानता येणार नाही का ? या गझलेतील एकही शेर मला तरी  'नाजायज' वा अवाजवी वाटला नाही. प्रत्येक शेर काही तरी सांगून जातो. शेरांची संख्या कमी करा, असे कसे म्हणता येईल ? गझल (वा कोणतीही कविता) अशी लांबी ठरवून थोडीच करता येते ? ज्या वेळी जो शेर सुचला, त्या वेळी तो गझलेत समाविष्ट झाला - असेही होवू शकते. मात्र, कमी असो वा जास्त शेरांची गझल करायची म्हणून कुणीच लिहायला बसू नये. माझे असे मत आहे की, मुळात हे कवी  ठरवू शकत नाहीच. जो ठरवून करतो तो कवी नाहीच. त्यामुळे चांगले शेर असतील, त्यांत सहजता असेल, प्रभावी  (व प्रामाणिक, अस्सल ) आशय असेल,  तर कितीही शेर असोत, स्वीकारले जावेत. कोणता शेर आपल्यालाच आवडेल, लागू पडेल सांगता येत नाही.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

रान, भान, कान आणि ध्यान हे शेर खूप आवडले!!

वा! वा! नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट गझल.
खूप आवडली.

गजलचा अंदाज, आशय खूप आवडले. हिरवे पान, अनोखे कान आणि मतला वि. आवडले.
अजब

कवी  प्रत्तेक शब्द समजून वापरीत असतो.
त्याला 'अमुक असे का लिहिले नाही ','या एवजी  हे लिहीले तर्?'
अश्या सुचना करणे अनावश्यक वटते.प्रदीप सारख्या कविना तरी निदान..
कारण शब्द बदलला की कविला अपेक्षित आशय बदलतो.
 

सर्वस्वात तुझी पुण्याई,
शत्रुसुद्धा तुझे गुण गाई

वाहत्या  पाण्यासारखी  स्वच्छ  सहज सुन्दर  गझल.

वा क्या बात है.......

प्रदीप, पूर्ण गझल फार आवडली.
सोनाली

नितांत सुंदर रचना!
शेरांची संख्या हा मुद्दा का निघावा हे मला कळत नाही. म्हणजे असा मुद्दा उपस्थित करणार्‍यांबद्दल काही म्हणायचे नाही, पण शेरांच्या संख्येमुळे फरक काय पडतो? या ठिकाणी एखाद्या शेराला किंवा एखाद्या रचनेला 'सपाट' किंवा 'किरकोळ' वगैरे म्हणता येतेच! एखादा शेर आवडला नाही तर आवडला नाही असे म्हणता येईल. पण किती शेर असावेत यावर बंधने येऊ नयेत असे मनापासून वाटते.
ध्यान हा शेर अफाट आहे. वादच नाही.