...थांब की जरा !

...थांब की जरा !


थांब की जरा तू बाई....थांब की जरा !
एवढी कशाला घाई...थांब की जरा !

मज खुणावते केव्हाची तेथली जुई...
येथली म्हणे ही जाई...`थांब की जरा` !
 
मी पुढे पुढे जाण्याचे योजतो जरी...
सांगते मला सटवाई...थांब की जरा !

राहशील मागे आता तू तरी कसा...?
द्यायची तुला भरपाई...थांब की जरा !

वेदना, व्यथा, दुःखेही पोतडीत या...
पाहण्यास ही नवलाई...थांब की जरा !

ध्यास तू पुरेसा माझा घेतलास का ?
मी दिसेन ठाई ठाई...थांब की जरा !

कोणते खरे अन् खोटे कोणते बरे...?
जाणशील तू सच्चाई...थांब की जरा !

का उगाच डोळे आधी लागले मिटू...?
संपली कुठे अंगाई...थांब की जरा !!

सोडतोस का रे बाबा धीर तू असा...?
व्हायची उद्या स्वस्ताई...थांब की जरा !

ऐक वा नको ऐकू तू अंतरा कधी...
ऐक ऐक ही अस्ताई...थांब की जरा !

हो, तुलाच देतो गाणे वाचण्यास मी...
वाळली कुठे ही शाई...थांब की जरा !

ऐकलेच नाही माझे शेवटी तिने....
मी म्हणूनसुद्धा- `आई, थांब की जरा` !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

मी पुढे पुढे जाण्याचे योजतो जरी...
सांगते मला सटवाई...थांब की जरा !
का उगाच डोळे आधी लागले मिटू...?
संपली कुठे अंगाई...थांब की जरा !!
ऐक वा नको ऐकू तू अंतरा कधी...
ऐक ऐक ही अस्ताई...थांब की जरा !
हो, तुलाच देतो गाणे वाचण्यास मी...
वाळली कुठे ही शाई...थांब की जरा !
ऐकलेच नाही माझे शेवटी तिने....
मी म्हणूनसुद्धा- `आई, थांब की जरा` !
वा! वा! वा! एकाहून एक!
क्या रदीफ-काफिया है! जबरदस्त गझल.

मी पुढे पुढे जाण्याचे योजतो जरी...
सांगते मला सटवाई...थांब की जरा !
वेदना, व्यथा, दुःखेही पोतडीत या...
पाहण्यास ही नवलाई...थांब की जरा !

सर्वच शेर आवडले. प्रदीपजी नेहमीच छान लिहितात. मजा आली.
मी पुढे पुढे जाण्याचे योजतो जरी...
सांगते मला सटवाई...थांब की जरा !    अप्रतिम.
ध्यास तू पुरेसा माझा घेतलास का ?
मी दिसेन ठाई ठाई...थांब की जरा ....  जणू कविताच कविला सांगतेय.
हो, तुलाच देतो गाणे वाचण्यास मी...
वाळली कुठे ही शाई...थांब की जरा !   वाचक म्हणून मी एवढाच अधिर्,प्रदिपजी
ऐकलेच नाही माझे शेवटी तिने....
मी म्हणूनसुद्धा- `आई, थांब की जरा` !     ह्रुदय स्पर्शी

ऐकलेच नाही माझे शेवटी तिने....
मी म्हणूनसुद्धा- `आई, थांब की जरा` !
अप्रतिम. वाचुन डोळ्यांत पाणी आले.

    म्हणायचे होते. गझल फार आवडली.

प्रदीप,
अतिशय सुंदर गझल...
वेदना, व्यथा, दुःखेही पोतडीत या...
पाहण्यास ही नवलाई...थांब की जरा !
- वा! सुंदर.
'अस्ताई' वरून माझी एक गझल / त्यातला एक शेर आठवला.
जीवनाचा नूर आहे वेगळा
ताल, लय अन् सूर आहे वेगळा
गुंतशी स्थायीत का तू सारखा?
(अंतरा भरपूर आहे वेगळा)

ऐकलेच नाही माझे शेवटी तिने....
मी म्हणूनसुद्धा- `आई, थांब की जरा` ! ...
 याबद्दल लिहिण्यासाठी शब्द नाहीत.
- कुमार

अप्रतिम गझल
जावडेकरांशी सहमत.

सुंदर गझल प्रदिप. आवडली.

अस्ताई, स्वस्ताई, शाई, सटवाई - वा वा!!
आई शेराबद्दल कुमारशी अगदी सहमत... शब्दच नाहीत...