...त्याचीच ओढा री पुन्हा!!

.............................................................

दाही दिशा हिंडून मी आलो तुझ्या दारी पुन्हा !
जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ?

साऱ्याच पापांची अता शिक्षा मला घाऊक दे...
फेरी नको लादू नवी...लादू नको वारी पुन्हा !

ऐकून आधी घेतली...समजून घेऊ दे अता...
तू सांग संकोचाविना घडलीं  कथा सारी पुन्हा !

टीकेस घाबरतोस का...? निंदेमुळे खचतोस का...?
तू धीर गोळा कर जरा...ठरशील तू भारी पुन्हा !

मज शब्द हे काही पुन्हा मोहात पाडू पाहती...
संन्यस्त मी...! कविते मला केलेस संसारी पुन्हा !

करतोस तू उपकारही...देतोस वर जाणीवही...
मिंधा तुझा आहेच मी...! आहेच आभारी पुन्हा !

पाडाव माझा होउनी कित्येक वर्षे लोटली...
माझ्यावरी केलीस तू का ही नवी स्वारी पुन्हा ?

फुटतो जरी डोळा तरी मरतात शुक्राचार्य का ?
बसती नव्या काळातही अडवून हे झारी पुन्हा !

गेला उजाळा तो कुठे,  इतक्यात मी जो पाहिला...
माझ्यापुढे आली कशी ही वाट अंधारी पुन्हा ?

झोळी पुन्हा हातात ही...? हाळी पुन्हा ओठांवरी...
नशिबात माझ्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा !

'आईस का तू लाजशी...? मुकशील प्राणांना अरे...!'
दुर्योधनाला सांगते विनवून गांधारी पुन्हा!!

डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...?
बोलेल जो आधी कुणी, त्याचीच ओढा री पुन्हा!!

.............................................................
- प्रदीप कुलकर्णी
.............................................................

गझल: 

प्रतिसाद

मस्त मस्त गझल प्रदीपजी!!
वारी, कथा, संसारी, आभारी, आणि री हे शेर तर अप्रतिम आहेत!!
संन्यस्त मी...! कविते मला केलेस संसारी पुन्हा ! - क्या बात है!

प्रदीप,  गझल अगदी भारी आहे.. बहोत बढ़िया...

चित्तरंजन

दाही दिशा हिंडून मी आलो तुझ्या दारी पुन्हा !
जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ?
वाव्वा! मस्त मतला!
ऐकून आधी घेतली...समजून घेऊ दे अता...
तू सांग संकोचाविना घडलीं  कथा सारी पुन्हा !
क्या बात है..

मज शब्द हे काही पुन्हा मोहात पाडू पाहती...
संन्यस्त मी...! कविते मला केलेस संसारी पुन्हा !
क्या बात है..
करतोस तू उपकारही...देतोस वर जाणीवही...
मिंधा तुझा आहेच मी...! आहेच आभारी पुन्हा !
क्या बात है..क्या बात है..
'आईस का तू लाजशी...? मुकशील प्राणांना अरे...!'
दुर्योधनाला सांगते विनवून गांधारी पुन्हा!!
फार उत्तम!
डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...?
बोलेल जो आधी कुणी, त्याचीच ओढा री पुन्हा!!
हाहा. ;)

साऱ्याच पापांची अता शिक्षा मला घाऊक दे...
फेरी नको लादू नवी...लादू नको वारी पुन्हा !.. अतिशय उच्चटीकेस घाबरतोस का...? निंदेमुळे खचतोस का...?
तू धीर गोळा कर जरा...ठरशील तू भारी पुन्हा !.. खूब
मज शब्द हे काही पुन्हा मोहात पाडू पाहती...
संन्यस्त मी...! कविते मला केलेस संसारी पुन्हा !... मस्तच
-मानस६

वा वा प्रदीपराव,
अप्रतिम गझल दिल्याबद्दल धन्यवाद. अतिशय सुरेख. सर्व शेर उत्तम आहेत. कोणा एकाचा उल्लेख करायचा म्हणजे इतरांवर अन्याय होईल.
पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.
आपला,
(चाहता) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

संपूर्ण गझल सुरेख आहे.
डोके कशाला खाजवा हा शर एक्दम भन्नाटः)

मज शब्द हे काही पुन्हा मोहात पाडू पाहती...
संन्यस्त मी...! कविते मला केलेस संसारी पुन्हा !करतोस तू उपकारही...देतोस वर जाणीवही...
मिंधा तुझा आहेच मी...! आहेच आभारी पुन्हा !
आणि मक्त्याचा शेर खास आवडले :)

टीकेस घाबरतोस का...? निंदेमुळे खचतोस का...?
तू धीर गोळा कर जरा...ठरशील तू भारी पुन्हा !
 
वाह...

प्रदीपजी,
सुंदर ग़ज़ल!
काही द्विपदी खूपच आवडल्या!