शिंतोडा

चादर नाही, छप्पर डोक्यावर नाही
या रस्त्यांवर स्वप्नांचा वावर नाही
काल नफ्याने भिजले जे; या तोट्याचा -
शिंतोडाही त्यांच्या अंगावर नाही?
मंदी, युद्ध... तुम्हाला विषय चघळण्याचे
पोट तुम्हा लोकांचे हातावर नाही
रोजच पाणी देतो रोपांना, आता -
फार भरवसा या आभाळावर नाही!
सत्य हरवले छाया-पडछायांमध्ये
सूर्य कुणाचाही का माथ्यावर नाही?
खेळ सुरू ठेवा अवकाशप्रयोगांचे
माझी भाकर मंगळ-चंद्रावर नाही
कसली खोगिरभरती करता हो देवा
घट्ट कुणाची मांडच जगण्यावर नाही
फार अपेक्षा करणे मी सोडून दिले...
राग मलाही आता माझ्यावर नाही!

* मायबोलीच्या कार्यशाळा-२ http://www.maayboli.com/node/4183  लिहिलेली गझल

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

चादर नाही, छप्पर डोक्यावर नाही
या रस्त्यांवर स्वप्नांचा वावर नाही ( दोन ओळींचा संबंध सांगावा अशी विनंती! )


काल नफ्याने भिजले जे; या तोट्याचा -
शिंतोडाही त्यांच्या अंगावर नाही? ( तेच! )


मंदी, युद्ध... तुम्हाला विषय चघळण्याचे
पोट तुम्हा लोकांचे हातावर नाही ( चांगला शेर्----सामाजिक )


रोजच पाणी देतो रोपांना, आता -
फार भरवसा या आभाळावर नाही! ( सुंदर )


सत्य हरवले छाया-पडछायांमध्ये
सूर्य कुणाचाही का माथ्यावर नाही?( संदर्भ सांगावात अशी विनंती )


खेळ सुरू ठेवा अवकाशप्रयोगांचे
माझी भाकर मंगळ-चंद्रावर नाही ( चांगला शेर )


कसली खोगिरभरती करता हो देवा
घट्ट कुणाची मांडच जगण्यावर नाही ( दुसरी ओळ उत्तम आहे )


फार अपेक्षा करणे मी सोडून दिले...
राग मलाही आता माझ्यावर नाही! ( चांगला शेर )

चादर नाही, छप्पर डोक्यावर नाही
या रस्त्यांवर स्वप्नांचा वावर नाही
 
 कवीकडे चादर नाहीये. म्हणजे तो स्वतःची भणंगावस्था कथित करत आहे. डोक्यावर छप्परपण नाहीये. ही परिस्थिती असताना माणूस साधारणपणे स्वप्ने बघतो. पण कवी ज्या जीवनवाटेवर वाटचाल करत आहे तेथे स्वप्नांचा वावर पण नाहीये. फार व्यथायुक्त शेर आहे. अशी परिस्थिती का आहे ही बाब वेगळी आहे. कदाचित प्रेमभंग, सर्व आघाड्यांवर आलेले अपयश, उपेक्षा यापैकी काहीतरी कारणीभूत असावे. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की हा शेर वाचल्यावर ऐकणार्‍याला ताबडतोब कवीच्या मनस्थितीची कल्पना येते व दाद द्यावीशी वाटते. या रस्त्यावर स्वप्नांचा वावर नाही ही अतिशय छान ओळ आहे. खरे तर 'हासिले गझल ओळ' आहे.


काल नफ्याने भिजले जे; या तोट्याचा -
शिंतोडाही त्यांच्या अंगावर नाही?
 
सुंदर! कुठल्याही माणसाच्या आयुष्यात घडणार्‍या गोष्टींवर परखडपणे प्रकाश टाकणारी ओळ. 'शिंतोडाही त्यांच्या अंगावर नाही? ' माझे जगाने कायम फायदे घेतले पण जेव्हा माझी परिस्थिती वाईट झाली तेव्हा सगळे तोंड फिरवून पळाले. मात्र एक गोष्ट आहे. हा मुद्दा अनंतवेळा सांगून झालेला आहे. हा शेर कुठल्याही परिस्थितीला लागू होऊ शकतो.


मंदी, युद्ध... तुम्हाला विषय चघळण्याचे
पोट तुम्हा लोकांचे हातावर नाही
 
आणखीन एक उत्तम शेर! सर्वसामान्य माणसाला या सर्व बाबींशी खरे तर काही देणे घेणे नसते. भल्याभल्या राजकीय नेत्यांना भर सभेत ऐकवावा असा शेर. भटसाहेब स्वतः भर सभेत असे वादग्रस्त शेर सादर करून व्यासपीठावरच्या तथाकथित महान लोकांना मान खाली घालायला लावत. फार बिनधास्त माणूस. एक कवीच असे करू शकतो. यात सच्चाई आहे. मधे एकदा महाराष्ट्रातील एका श्रेष्ठ गझलकारांच्या घराच्या जवळ काही कामानिमित्त त्यावेळचे मुख्यमंत्री आले होते. झाले. यांना बोलावणे गेले कारण काही जणांनी सांगीतले की असे असे गझलकार इथेच राहतात. बोलवायला आलेल्या लोकांना या महाशयांनी बाथरूममधून सांगीतले की मी आंघोळ करत आहे. आंघोळ होइपर्यंत मुख्यमंत्री गेलेले होते. लोकांनी विचारले आपण घाई करून का आला नाहीत? ते म्हणाले : मी काय आंघोळ सोडुन यायचे काय? मला काय माहिती हे येतील अन मला भेटायची इच्छा प्रदर्शित करतील? अशी वृत्ती कलेच्या बहुतेक प्रकारांमधे बहुतांशी कवीच दाखवू शकतात. एका कवीसाठी ( पुढील वाटचालीच्या दृष्टीकोनातून ) खरे तर मुख्यमंत्र्यांशी भेट होणे महत्वाचे असु शकत होते. पण नाही. हे कवी सुरेश भटांचे मित्र होते हेही जाता जाता नमूद करतो. तेव्हा मुद्दा असा की सच्चाई ही आहे की तुम्ही लढताय का आश्वासने देताय ह्याचे आम्हाला महत्व नसून आम्हाला आमची पोटे भरायची चिंता आहे.


रोजच पाणी देतो रोपांना, आता -
फार भरवसा या आभाळावर नाही!
 
एकापेक्षा एक चढणारे शेर. याही शेराचा अर्थ बर्‍याच क्षेत्रांना, बर्‍याच बाबींना लागू होणारा आहे.


सत्य हरवले छाया-पडछायांमध्ये
सूर्य कुणाचाही का माथ्यावर नाही?
 
एखादा शेर रचतानाची मनस्थिती कवीपेक्षा जास्त चांगली कुणालाही ज्ञात नसते. या शेराचे महत्व कुठलाही रसिक जाणू शकेल व सांगूही शकेल. पण कवीने स्वतः सांगणे फार उत्तम. बहुधा 'तिलकधारी पुरस्कारवाले' यांनाही हेच म्हणायचे असावे.


खेळ सुरू ठेवा अवकाशप्रयोगांचे
माझी भाकर मंगळ-चंद्रावर नाही
 
मंदी, युद्ध यासारख्याच अर्थाचा शेर. पण फार छान जमलाय.


कसली खोगिरभरती करता हो देवा
घट्ट कुणाची मांडच जगण्यावर नाही
 
व्वाह! काय शेर आहे! अशा शेरांचे फक्त रसग्रहण केलेले बरे. परत परत आठवतात अशा शेरांनीच गझल बनते.


फार अपेक्षा करणे मी सोडून दिले...
राग मलाही आता माझ्यावर नाही!
 
अतिशय साधा शेर! वर इतके चांगले शेर रचल्यावर असा शेर का रचला असावा हे समजत नाही.

तिलकधारीजी आणि समीक्षक,

शिंतोडा आणि सूर्य या शेरांबद्दल अधिक स्पष्टीकरण सवडीने देईनच. अंधुक राहताहेत शेर हे जाणवत होतं.. पण इतर उपाय/इलाज सुचला नाही.

अपेक्षा शेर तसा सपाट आहे... पण - राग मला"ही" - या "ही" मधे थो..डी मेख आहे.
मतल्यातल्या दोन ओळींचा संबंध मागायची मात्र, तिलकधारीजी, खरच गरज नव्हती. शेरावर अगदी ३-४ मिनिटे रेंगाळला असतात तर समीक्षकांप्रमाणे आपसूकच समजला असता.
प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद!


माझ्या जेमतेम आकलन शक्तीला हे शेर मायबोलवरही कळले होते. आता समिक्षकांनी बराच खुलासा केल्याने पुन्हा रस ओरपता आला.  एकही शे र वा शब्द क्लिष्ट नाही.  तेच महत्त्वाचे.

शिंतोड्यातही भिजलो. उत्तम-छान वाटले.
कलोअ चूभूद्याघ्या


रोजच पाणी देतो रोपांना, आता -
फार भरवसा या आभाळावर नाही!
 
माझ्या मते हा हासिले-गझल शेर! गझल नेहमीप्रंमाणे दर्जेदार!
जयन्ता५२