...कोठे जाऊ?





...कोठे जाऊ?


मज नको नको झाला शब्दच्छल... कोठे जाऊ ?
अर्थ शोधतो मी माझा चपखल...कोठे जाऊ ?


नेमके कुणाचे ऐकावे, समजेना काही...
मज दिशा दहाही म्हणती `चल, चल...`कोठे जाऊ ?


चेहरे नवे हे...नाही ओळख कोणाशीही...
राहिली न ती तेव्हाची मैफल...कोठे जाऊ ?


आठवे न काही केल्या वळण मलाही माझे...
मी उभाच एका जागी हतबल...कोठे जाऊ ?


आटपून आटोपेना...आग कशी अश्रूंची...
आवरू कसा मी हा वडवानल...कोठे जाऊ ?


जायचे मलाही येथून परत त्या काठाला...
ऐकतो, अता तेथेही दलदल...कोठे जाऊ ?


टोकदार काटे येथे...धगधग ज्वाळा तेथे...
घेउनी फुले मी माझी कोमल...कोठे जाऊ ?


ऐकवे न एकांता, आकांत तुझा एकाकी...
सोसवे न  मौनाचा कोलाहल...कोठे जाऊ ?


एकटाच मी कोठे...? आहे कविता सांगाती...
भोवती खुळ्या शब्दांची दंगल...कोठे जाऊ ?


शेवटी उतारा आहे वत्सल त्या मृत्यूचा...
मज पचे न जन्माचे हालाहल...कोठे जाऊ?


- प्रदीप कुलकर्णी




प्रतिसाद

तुम लिखते रहो

 प्रदीप!
तुम लिखते रहो, हम पढते रहे
तो मजा जीने का और भी आता है

ऐकवे न एकांता, आकांत तुझा एकाकी...
सोसवे न  मौनाचा कोलाहल...कोठे जाऊ ?
एकटाच मी कोठे...? आहे कविता सांगाती...
भोवती खुळ्या शब्दांची दंगल...कोठे जाऊ ?
---- गझल व खास करून हे शेर अप्रतिम!

जयन्ता५२

सुरेख गझल

सुरेख गझल. कोलाहल, दंगल अतिशय आवडले. जयंतरावांशी सहमत.

वा!

दलदल आणि शेवटचे ३ शेर हे विशेष आवडले प्रदीपजी!
-- पुलस्ति.

हेच

म्हणतो.
प्रदिप, अप्रतिम गझल... सगळेच शेर आवडले.

विश्वास

सुंदर

प्रदीप,
सुंदर गझल.. काफिये आणि रदीफ दोन्ही अतिशय वेगळे असूनही गझल अगदी सहज जुळून आली आहे.
आवरू कसा मी हा वडवानल...कोठे जाऊ ?
हा मिसरा, तसेच मक्ता, मौनाचा कोलाहल - सगळेच चपखल...
- कुमार

बहोत अच्छे !

बहोत बहोत बहोत अच्छे !
यासाठीच तर आपली गझल हवी असते.
मज नको नको झाला शब्दच्छल... कोठे जाऊ ?
अर्थ शोधतो मी माझा चपखल...कोठे जाऊ ?

टोकदार काटे येथे...धगधग ज्वाळा तेथे...
घेउनी फुले मी माझी कोमल...कोठे जाऊ ?

ऐकवे न एकांता, आकांत तुझा एकाकी...
सोसवे न  मौनाचा कोलाहल...कोठे जाऊ ? ...शिवाय दंगल हे आवडले...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०