...कोण मी तुझा ?कोण मी तुझा ?


मी तसा तुझा कुणी नसूनही...कोण मी तुझा ?
हे कळेचना मला अजूनही...कोण मी तुझा !


भेटणे किती नि बोलणे किती रोज रोज हे...
रोज रोज हे असे असूनही...कोण मी तुझा ?


कोण मी तुझा...? उगाच मोकळे बोलतेस का ?
पाहतेस का अशी हसूनही...कोण मी तुझा !


मी असा कसा तुझ्यात गुंतलो...गुंतलोच का ?
उत्तरे खरीच सापडूनही...कोण मी तुझा ?


आठवू तरी किती किती पुन्हा तेच तेच मी
आठवे न हेच आठवूनही..कोण मी तुझा !


प्रश्न एकदा कधीतरी तुला मी विचारला...
जीव हा तुझ्यावरी जडूनही...कोण मी तुझा ?


मौन हे तुझे जिवास जाळते...जाळते किती...
तू निमूट का, तुला कळूनही...कोण मी तुझा


तू पहाटचा प्रकाश घेउनी चाललीस ना...?
रात्र रात्र हा असा जळूनही...कोण मी तुझा ?


थांबवायला मलाच पाहिजे हे कुठेतरी...
चालते तसेच चालवूनही...कोण मी तुझा ?


- प्रदीप कुलकर्णी
 गझल: 

प्रतिसाद

प्रदीप,
गझल आवडली.
तू निमूट का, तुला कळूनही...कोण मी तुझा ... हा मिसरा सर्वांत आवडला.
मी असा कसा तुझ्यात गुंतलो...गुंतलोच का ?
उत्तरे खरीच सापडूनही...कोण मी तुझा ? - वा!
चालते तसेच चालवूनही...कोण मी तुझा ? यातल्या भावना पोचल्या; पण 'कोण मी तुझा' शी वाक्याच्या दृष्टीनं संलग्नता जरा कमी आहे असं वाटतं.
- कुमार

कुमारपंतांशी सहमत आहे.
मौन हे तुझे जिवास जाळते...जाळते किती...
तू निमूट का, तुला कळूनही...कोण मी तुझा
आणि
पहिले दोन शेर विशेष आवडले.

गझल छानच आहे !
कुमार व चित्तरंजन यांनी नोंदवलेलं मत अभ्यासावं. मला असं वाटतं की, सहसा गझलकार काफियात अडकतात ! प्रदीप कुलकर्णी  रदीफांत (रदाफींत) 'अडकतात' का? त्यांची गझलरचना त्यामुळे 'कौशल्यपूर्ण ' वाटते. प्रस्तुत गझलेत काही ठिकाणी तर हे कौशल्यच अधिक जाणवतं. उदा :
मौन हे तुझे जिवास जाळते...जाळते किती... (! / ?)
तू निमूट का, तुला कळूनही...कोण मी तुझा
मी असा कसा तुझ्यात गुंतलो...गुंतलोच का ?
उत्तरे खरीच सापडूनही...कोण मी तुझा
आठवू तरी किती किती पुन्हा तेच तेच मी
आठवे न हेच आठवूनही..कोण मी तुझा !
प्रश्न एकदा कधीतरी तुला मी विचारला...
जीव हा तुझ्यावरी जडूनही...कोण मी तुझा ?
पण ....
तू पहाटचा प्रकाश घेउनी चाललीस ना...?
रात्र रात्र हा असा जळूनही...कोण मी तुझा ?
थांबवायला मलाच पाहिजे हे कुठेतरी...
चालते तसेच चालवूनही...कोण मी तुझा ?... य शेरांत 'कोण मी तुझा' समजायला जरा कष्ट पडतात.
गझल तरीही सुंदरच आहे.

संतोषराव,
तुमच्या  मनमोकळ्या व मनापासूनच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...(येथेच हेही सांगून टाकतो की, आपण आज टाकलेल्या दोन्हीही गझला खूप आवडल्या...त्या त्या गझलेच्या खाली सविस्तर प्रतिसाद देईनच)
.......................
आपली, म्हणजे आपल्या साऱयांचीच गोची काय होते की, आपण एखाद्या शब्दाकडे, शब्दसमूहाकडे सपाटपणे आणि गुळगुळीतपणे पाहत असतो...तसे पाहायची सवय आपल्याला वर्षानुवर्षे लागलेली असते...त्यामुळे अनेक घोटाळे होत असतात..
...............
तुम्ही उल्लेख केलेल्या दोन शेरांबाबत मी माझे स्पष्टीकरण देतो..पटल्यास पाहा. (मात्र, पटलेच पाहिजे, असा आग्रह मुळीचच नाही !). कारण लिहिणारा जो असतो, तो त्याच्या सभोवतालाची (मानसिक, कौटुंबिक, सामाजिक वगैरे..) सूक्ष्मातील सूक्ष्म छटा शब्दात आणण्याचा प्रयत्न करत असतो...(कदाचित, कविता इतरांना दुर्बोध वाटण्याचे किंवा संदर्भहीन, संदिग्ध वाटण्याचे हेही एक कारण असू शकेल. असो.)
.............
तू पहाटचा प्रकाश घेउनी चाललीस ना...?
रात्र रात्र हा असा जळूनही...कोण मी तुझा ?
 
एक ना एक दिवस तू माझी होशीलच, अशी मला खात्री होती....होकार आणि नकार यांच्या हिंदोळ्यातच बराच मोठा काळ निघून गेला आहे. तुझी अशा हो-नाहीची उघडझाप...त्यात माझी होणारी तगमग...जिवाचे जळणे...नेमके काय होईल..!  अशा कितीतरी रात्री तगमगीतच गेल्या. रात्री दिव्याबरोबरच (किंवा दिव्यासारखाच !) जीव खूप जळला....आणि पहाट झाली...आता तुझ्यापुढे दोन पर्याय आहेत. पहाटचा प्रकाश आणि रात्र रात्र जळणारा मी !   तू अर्थातच निवड केलीस ती पहाटेच्या प्रकाशाची...मग माझ्या रात्र रात्र जळण्याचा उपयोग काय झाला...? माझे जळणे व्यर्थच गेले की...!  मग साहजिकच मनात प्रश्न आला,  (एवढा मोठा कालावधी, अगदी रोजच्या रोज)  रात्र रात्र हा असा जळूनही...कोण मी तुझा ? तर त्याचे अध्याहृत उत्तर  `कुणीच नाही ``

(इथे, ज्याचे जळते त्यालाच कळते, ही म्हण वापरण्याचा मोह टाळवत नाही...!!!)


जे लिहिलेले असते, त्यापेक्षाही न लिहिलेलेही वाचायची सवय आपण (म्हणजे आपण सगळ्यांनीच) करून घ्यायला हवी. त्यादृष्टीने आपण (म्हणजे आपण सगळ्यांनीच) `गझलसाक्षर`  होण्याची आवश्यकता आहे.
.............................
आता दुसरा शेर
थांबवायला मलाच पाहिजे हे कुठेतरी...
चालते तसेच चालवूनही...कोण मी तुझा ?

तुझ्या-माझ्या नात्याचा, प्रेमाचा, ऋणानुबंधांचा जो काही निकाल लागायचा आहे, तो लागलेलाच आहे. मग आता आणखी तगमगणे. जळत राहणे, हे कुठेतरी मलाच थांबवायला पाहिजे. मीच त्यातून बाहेर पडले पाहिजे... ही तगमग काय, चालूच राहील...पण तिचा उपयोग काय ? ही तगमग, हे जळणे चालते तसेच चालवूनही... कोण मी तुझा...?  तर कुणीच नाही....
.............

होय...आणि मला वेगवेगळे रदीफ घेऊन गझल रचण्याची  आवड आहे, हे अगदी सत्य. अशा प्रकारच्या ज्या गझला मी  आजवर येथे सादर केलेल्या आहेत, त्यातील अनेक शेर (जे माझे मलाच ओढून-ताणून आल्यासारखे वाटले होते) ते मी  निर्दयपणे फेकून दिलेले आहेत.
धन्यवाद.
...............

रात्र आणि मौन हे शेर सुंदरच!!

तू पहाटचा प्रकाश घेउनी चाललीस ना...?
रात्र रात्र हा असा जळूनही...कोण मी तुझा ?
वा सुन्दर अतीशय छान..कल्पना

श्री. प्रदीप (राव), (तुम्ही 'संतोषराव' लिहिलेत म्हणून, असो),
आपले स्पष्टीकरण तसे आवश्यक नव्हते. पण दिलेत ते खूप छान दिलेत. अशा वेळी  आपल्याजवळ (लिहिणार्‍याजवळ) सांगण्यासारखे असतेच. मुळात, मी आपल्याच काय कोणत्याही कवितेच्या बाबतीत व्यापक दृष्टिकोन ठेवला जावा, या विचारांचा आहे. प्रश्न उद्भवतो तो स्पष्टीकरण द्यावे लागते, तेव्हा...! गझलेच्या बाबतीत ते फारसे द्यावे लागू नये. व्याकरणाच्या बाबतीत ते ठीकही आहे. गझलेचे व्याकरण काही वेळा ते द्यायला लावतेही. मात्र, विशिष्ट अनुभवांच्या बाबतीत अभिव्यक्तीही स्पष्ट  हवी. आशय आरस्पानी असावा, एवढेच माझे म्हणणे.
काही शेर अर्थातच काही विशिष्ट संदर्भाने आलेले असतात.  तरीसुद्धा, हे संदर्भ व ही अनुभूतीही जेव्हा 'सर्वलागू' (सर्वसामान्य म्हणायचे नाही, म्हणून्..)होते, तेव्हा ती गझलही यशस्वी होते. या विधानांचा अर्थ असाही कृपया (कुणी) घेवू नये की, कवीने / गझलकाराने अनुभवांच्या व  अनुभूतींच्या बाबतीत 'सामान्य' रहावे. उलट, अनुभूतींच्या बाबतीत तो वेगळा असतोच. अभिव्यक्तीच्याही बाबतीत तो तसा असतोच. काही अनुभवांच्या बाबतीत कवी अधिक संवेदनशीलही असतो. सारख्याच प्रसंगातून गेल्यावरही, त्याला जाणवणारे कदाचित इतरांना जाणवतही नाही. आणि, तरीही तो जेव्हा त्याची ही अनुभूती व्यक्त करतो, तेव्हा इतरांनाही तो अनुभव आपला वाटतो. आणि मग ती कविता तुमची जरी असली तरी वाचणार्‍याला ती आपली वाटते. आपल्या (मी आजवर वाचलेल्या) (किंवा कुणाच्याही ) इतर गझलांच्या / कवितेच्या बाबतीत ते घडते. ज्या शेरांतून ते घडले नाही, त्याबाबतीत मी काळजीने लिहिले. 
मी जी प्रतिक्रिया लिहिली ती याच विचारांनी ! बाकी, मी बरोबरच, असे नसते. कदाचित, मीही चुकलो / कमी पडलो असेन. मीही (कुणीही ) एखाद्या अनुभूतीच्या बाबतीत मनोवस्थेप्रमाणे बेसावध (इनर्ट) राहून ती गझल वाचली असेल.
पण असो. याबाबतीत अधिक ताणणे नको. आपल्या गझलांचा आनंद मिळतो, हे कशाहूनही अधिक महत्वाचे. तो सतत मिळ्त राहो. अजून पाठवा. आजच्याही गझला सुंदर्च. एकीला मी प्रतिसाद कळवला आहेच. लेट्स गो अहेड !!!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०