एक संवाद-४
: तर हा, 'कळीचा दंश होता आणि फुलाचा वार होता, ' म्हणा ना. आणि तरीही तपशील दडवता? बरे, नका देऊ त्या कळ्याफुलांचे तपशील, पण प्रीतिभावनेने बहरलेल्या एवढ्या मधुर आणि मदिर गझला लिहिल्या. तुमच्या प्रेमकल्पनेविषयी, त्या वेदनेच्या स्वरूपाविषयी काही सांगाल का?
: तुम्हाला सांगतो काळे! जीवन तसे अपूर्णच असते माणसाचे. त्याच्या संपूर्णतेसाठी जखमा अपरिहार्यच असतात. ज्या जीवनात जखमा नाहीत, ते जीवनही समृद्ध नाही.
: म्हणजे 'इश्कसे तबीयतने जीस्तका मजा पाया | दर्द की दवा पायी दर्दे-बेदवा पाया' असे गालिब म्हणतो तसे?
: पण तो 'दर्द' खरा हवा आणि त्या जखमाही खऱ्याखुऱ्या हव्यात, पण आपल्या पांढरपेशांना करमणुकीसाठी 'शौक' म्हणून जखमा हव्या असतात. अहो या करिअरिस्टांच्या जगात खऱ्या जखमांना काही स्थान आहे का? यांना जखमांसकट जीवनाचा आनंद लुटता येतो का?
गोजिरे हे शब्द यांचे देखणे देती दगे
ही कशाची माणसे? हे बोलणारे पिंजरे
पण माझे असे नाही. महिन्यांची वर्षे होत होती आणि ती माझ्या उमेदीच्या वयाला गिळत होती. अशी माझी कलंदरी सुरू असताना काही अनुभव माझ्या पदरात ओळी टाकून गेले.
फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर
दानही करशील तू पण मी असा आहे कलंदर
माझ्या आयुष्यात मला दिलेल्या कलंदरीसहित माझा प्रवास सुरू आहे. त्यात कधी बेचैन करणारे मुक्काम लागतात आणि काळजात कळा उठतात. पण मी स्वतःची समजूत घालतो आणि पुढे चालू लागतो. लक्षात एवढेच येते की, गेलेले आयुष्य परत येत नाही.
: या जाणिवेमुळेच तुमच्या गझलेत एक ठणकती वेदना सतत आकार घेत असावी. स्मृतिव्याकुळता हा तुमच्या गझलेचा जणू प्राण आहे. अंतर्यामीची ही व्याकुळता शब्दरूप कसे घेते? या वेदनेतून तुमचे 'कातिल' शेर नेमके कसे जन्म घेतात?
: वर्षामागून वर्षे उलटतात पण आठवणी हरवलेल्या माणसाचा पाठलाग करीत असतात. अख्तर शीरानी काय म्हणतो ते ऐक-
मिट चले मेरी उम्मीदों की तरह हर्फ मगर
आज तक तेरे खतों से तेरी खुशबू न गयी
कितीतरी काळ लोटला आहे. पण आयुष्याने मला दिलेल्या जखमा मला सोडायला तयार नाहीत म्हणून मी त्यांच्यापासून अर्थ मागून तो माझ्या शब्दांना देत असतो-- माझ्यासाठी व इतरांसाठी!
: हा अर्थ देताना फक्त संवेदना तेवढ्या प्रकट होतात आणि संदर्भ कसे वेगळे होतात? तपशील कसे हरवतात? की संदर्भ तपशिलांची बाजू तुम्हीच पुसून टाकता?
: कवितेचा संबंध आयुष्याशी असतोच. आयुष्याचा संबंध परिस्थितीशी आणि व्यक्तींशी असतो. पण एकच परिस्थिती आणि एकच व्यक्ती म्हणजे आयुष्य नसते. परिस्थिती आणि व्यक्तींचे संदर्भ बदलत असतात. म्हणूनच जखमांचे संदर्भ वेगवेगळे असतात. या संदर्भांचे तपशील न देता अनुभवांपासून मिळणाऱ्या उत्कट संवेदनांचा अर्क दोन ओळीत किमान शब्दांत साठवण्याचे काम 'शेर' करीत असतो. प्रत्येक शेर म्हणजे एका जखमेचा एका संपूर्ण संवेदनेचा प्रत्यय असतो.
मिळाले शब्द हे ज्या कारणाने
गडे दे कारणे त्या कारणाची
असे म्हटले तरी कारणाची कारणे सांगण्याची गरज नसते. फक्त कारणाचा परिणाम तेवढा डोळे मिटून अनुभवायचा असतो.
: उर्दू गझलांमध्ये अध्यात्म, प्रेम, मदिरा अशा अनेक विषयांना एकाच गझलेमध्ये स्पर्श केलेला दिसतो. मराठीत असा प्रयोग फारसा झालेला दिसत नाही. असा प्रयोग झाल्यास तो यशस्वी होईल का?
: कोण म्हणतो होणार नाही? मराठीत अनेक प्रयोग झाले आणि ते यशस्वी झाले. माझ्याच गझलेमध्ये झाला आहे.
: ती गझल कोणती?
: 'एल्गार' मधली वाटचाल नावाची गझल ऐका--
ही न मंजूर वाटचाल मला
दे भविष्या तुझी मशाल मला
संत समजून काल मी गेलो
भेटला शेवटी दलाल मला
तू न बाहेर भेटतेस तरी
जाणवे आत हालचाल मला
आहेत ना वेगवेगळे विषय? हे केवळ मी नाही, अनेकांनी केले आहे, ज्यांना मी मराठी गझल शिकविली.
: तुमच्या गझलांमध्ये 'मी' हा शब्द अनेकदा पुनरावृत्त होतो तो का?
: हा 'मी' पुष्कळदा विश्वव्यापी 'मी' म्हणून येतो. मी स्वतःला वापरतो 'मी' म्हणून. उदाहरणार्थ--
मी कधीचा उभाच फिर्यादी
वाकुल्या दाखवी निकाल मला
: त्यात अशी काही भूमिका असते का, की आपण एका बाजूला व जग विरुद्ध बाजूला?
: जगाला मी माझ्या विरुद्ध समजत नाही.
: मग विरोधी कोण? 'तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे|' यातील 'तुम्ही' नेमके कोण?
: ज्या लोकांचा आयुष्यात कटू अनुभव आला ते. संपूर्ण समाज नाही. एक विशिष्ट वर्ग. त्याच्यासाठी हा शब्द येतो.
: मध्यमवर्गासाठी का?
: नाही, तसेही नाही. माझे भांडण प्रवृत्तींशी आहे. ज्या वर्गाची सुखे-समृद्धी इतरांच्या दुःखावर अवलंबून असतात, ज्या वर्गाचा मोठेपणा इतरांच्या तथाकथित लहानपणावर अवलंबून असतो, ज्या वर्गाची सांस्कृतिक श्रेष्ठता इतरांच्या वंचितपणावर अवलंबून असते, त्या वर्गाविषयी माझ्या मनात घृणा आणि द्वेष आहे. निश्चितपणे तिरस्कार आहे.