एक संवाद-३

: तखल्लुसरूपी विमा उतरवण्याची गरज नाही असे आपण म्हणता. पण उर्दू कवींनी केवळ छापखाने नव्हते व नियतकालिके नव्हती म्हणून आपले नाव मक्त्यात गुंफले असे वाटत नाही. कारण ही पद्धत आधुनिक काळातदेखील आपल्याला दिसते.
: मला स्वतःला त्याची आवश्यकता वाटत नाही. मराठी कवींनी तसे केल्यास तो स्वाभाविकतेपेक्षा अनुकरणाचाच भाग अधिक होईल व अन्य उपयुक्त शब्दासाठी  असणारी जागा वाया जाईल.

: पण गालिबच्या किती तरी गझलांत स्वतःच्या 'असद' किंवा 'गालिब' या नावांचा उल्लेख उत्कट आत्मसंवादाच्या पातळीवर येतो तेव्हा स्वतःचे नाव गुंफण्यात उपयुक्त शब्दाची जागा वाया घालवली, असे म्हणता येणार नाही.
: स्वतःच्या नावाचा उल्लेख कोणत्याही पातळीवर येवो  तो नाव गुंफण्यासाठीच आला आहे. आता गालिब इतका महान कवी होता की तो अगदी बेमालूम रीतीने नाव गुंफत असे. तो त्याच्या काव्यकलेतील महानतेचा आणि कुशलतेचा प्रश्न आहे.  तेथे त्याने शेराच्या निर्मितीसाठी-- शेरातील काव्य घडवण्यासाठी किंवा काव्याला पूरक म्हणून तखल्लुसचा उपयोग केला आहे. तेथे तखल्लुस हा कवितेचाच घटक असतो. ते तखल्लुसच असे निवडतात की कोणत्याही वृत्तात अगदी सहजतेने वापरता येतील.

: आपल्या 'एल्गार' या कवितासंग्रहात प्रामुख्याने गझलाच आहेत. त्या वाचत असताना, 'अचानक कोसळली पावसाची सर | अलगद उतरले थेंब भुईवर | इथे तिथे जागोजागी झाली शिंपडण | कुण्या काळजाचे दुःख झाले अनावर' अशा ओळी वाचल्या की एकदम वेगळे काही वाचल्याचा सुखद प्रत्यय येतो. पण यांची संख्या फार कमी आहे. निसर्गचित्रण करण्याचा मोह आताशा आपण टाळत आहात का? गझलनिर्मितीसाठी ही प्रेरणा अलीकडे आपण दाबून टाकताहात का असे जाणवते. इतर नवोदित गझलकारांनीही असेच केल्यास एकूण काव्यविकासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही का?
: काळे! तुमच्या प्रश्नातून तुमची निसर्गकवितेबद्दलची आवड सूचित होते. पण निसर्ग ही माझी प्रेरणा नव्हतीच कधी. माझा संबंध जगण्याशी आणि माणसांशी होता. माणूस आणि मानवी संबंध हीच माझी प्रेरणा, त्यामुळे निसर्गचित्रणाचा मोह मी टाळत आहे असे म्हणणे योग्य होणार नाही. गझलेला निसर्गाचे वावडे नाही. गझलकाराला विषयाचे संपूर्ण स्वातंत्र्य असते. केवळ निसर्गच्याच नव्हे तर कोणत्याच प्रेरणा गझलकारांनी दाबून टाकू नयेत, असे माझे मत आहे.

: सूफी संप्रदायाच्या प्रभावाने आध्यात्मिक विचार प्रगट करण्याची उर्दू कवींना आवड निर्माण झाली व तशीही मुळात अध्यात्माची आवड पुष्कळ कवींना असते व ती त्यांच्या गझलांतून मोठ्या प्रभावीपणे प्रकट झाली आहे. कितीतरी कवींनी प्रणयाचे संकेत अध्यात्म प्रकटीकरणासाठी वापरले आहेत. आपल्या गझलांमध्ये ही अध्यात्मसन्मुखता मला आढळली नाही. आपला अज्ञातावर आणि तत्संबंधातील भक्ती वर विश्वास नाही का?
: परमेश्वर, आत्मा आणि पुनर्जन्म वगैरे गोष्टींवर माझा विश्वास नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे हिंदू धर्मावरच विश्वास नाही. मी कोणत्याही मंदिरात जात नाही. स्वाभाविकच या गोष्टींना माझ्या गझलांत कसे स्थान असणार? मी संतांना तत्कालीन परिस्थितीतील महान मानवतावादी म्हणून मानतो पण इहलोका ते रंजल्यागांजल्यांना जराही सोडवू शकले नाहीत असे माझे मत आहे.
तेव्हा सदेह स्वर्गी गेला जरी तुका
येथील भाविकांना भंडावती भुका

: तुमच्या गझलांमध्ये कधी स्पष्ट तर कधी ओझरत्या स्वरूपात 'ती' चे संदर्भ येतात. त्यातील 'ती' उर्दू कवींप्रमाणे सांकेतिक आहे का? ही गुल, बुलबुल किंवा शमा-परवाना यांची संकेतनिबद्ध कहाणी आहे की हे अजूनही न संपलेले 'झंकारत झुरणे' म्हणजे कधी काळच्या जखमांचे खरेखुरे पडसाद आहेत?
: तुम्ही फक्त पडसाद ऐकावे. ते पडसादही खरे आहेत आणि त्या जखमाही खऱ्या आहेत. पण जखमांचे आता कशाला? आणि जखमा काय चव्हाट्यावर मांडण्याची गोष्ट आहे?
जो डूबना है तो इतने सकून से डूबो
के आसपास की लहरों को भी पता न लगे
आणि अशी जखम काय आयुष्यात एकदाच होते? मागे महाराष्ट्र टाइम्समध्ये याच विषयावर हा 'जोर' देऊन मी एक सविस्तर लेखही लिहिला होता. असो.

: आता त्या जखमांचे किंवा जखमांचे संदर्भ कळल्याने काय बिघडणार आहे? की तुमची वृत्ती आताही 'मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी! मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते' अशीच आहे? 'तुझ्या एकेक घावाची कथा माझ्याच घावाची,' असे तुम्ही म्हणता. एखाद्या तरी घावाची कथा थोडी उलगडाल का?
: तुम्ही तपशिलाचा पिच्छा पुरविता आहात काळे, पण आपला बोभाटा परवडला. त्याची सवय झाली आहे. मी तर शेवटी बदनाम झंझावात, पण इतरांच्या बदनामीचे का! शेवटी
इथे मी सोसला माझा अशासाठीच बोभाटा
कळ्यांची काळजी होती, फुलांचा मामला होता
ऐसी बात है! आणि आता तर फुले टिपण्याचेही वय निघून गेले आहे.