सुरेश-२

   
त्याचा विषय ऐकताच श्रोत्यांमध्ये खसखस पिकली. त्यातच सुरेशने सुरुवात केली.

"'मला पुनर्जन्म मिळाला तर' अहाहा किती छान होईल. अव्यंग सुरेश भट तुमच्यासमोर उभा राहील."

त्याचे हे पहिलेच वाक्य माझ्या काळजाला झोंबले. तो पुढे काय बोलला हे आता आठवत नाही. पण त्याचे हे वाक्य मी विसरू शकलो नाही. या वाक्याने माझ्या काळजात घर केले. निरुपायाने जन्मभर सोसावी लागलेली असमर्थतेची व अपमानाची वेदनाच त्याच्या या उत्स्फूर्त वाक्यातून भळभळत होती. या प्रसंगापासून सुरेश माझा मित्र झाला. तेव्हापासून त्याचा ढगळ पोशाख, अफाट वागणे व बेफाट बोलणे मला बोचेनासे झाले. त्याच्याबद्दलच्या करुणेचा कोंभ माझ्या मनात लसलसून आला. त्याच्या तोपर्यंतच्या उद्धट वर्तनाचे गूढ उकलले. तो तथाकथित सुसंस्कृतांशी आक्रमकपणे का वागतो हेही कळून आले. त्याच्यापेक्षा गुणवत्तेने अनेकांगांनी उणे असणाऱ्यांनी त्याला तुच्छ लेखावे याबद्दल त्याच्या जिव्हारी जखम झाली होती. अशांवर निष्कारण चढेलपणाने तुटून पडणे हाच त्याच्या विद्ध वृत्तीचा उपाय होता.

अपंगपणा हा त्याचा गुन्हा नव्हता. त्याबद्दल त्याचा इलाजही नव्हता आणि त्याने अपंग असणे हा इतरांचा पुरुषार्थ नव्हता व त्याची फुकट फुशारकी मिरवण्यातही काही अर्थ नव्हता. अशांचे चारचौघात तोंड रंगवण्यात सुरेशला सूडाचे एक सूक्ष्म समाधान लाभत असे. आता त्याबद्दलही माझी तक्रार नव्हती. उलट अशा वागण्याला माझ्या लेखी सुप्त समर्थनच असायचे.

आमचे मराठीचे प्राध्यापक ना. कृ. दिवाणजी एका मोटार-अपघातात अचानक बळी पडले. त्यामुळे सर्व कॉलेजमध्ये शोककळा पसरली होती. ते त्यावेळी विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस होते. वामनराव चोरघड्यांच्या संपादनाखाली निघणाऱ्या 'युगवाणी' ने त्यांच्यावर विशेषांक काढला. त्यात मी सुरेशची एक कविता वाचली. दिवाणजींच्या अपघाती व अकाली निधनावर सुरेशने त्यात 'शारदेचे हास्य मलूल झाल्याची व तिच्या पायातील पैंजण गळून पडल्याची' कल्पना केली होती. सुरेशच्या धसमुसळ्या व आडदांड व्यक्तिमत्त्वाचा हा कोवळा पैलू मला अपरिचित होता. या ओबडधोबड पहाडातून प्रतिभेचा जिवंत झरा झुळझुळत असेल अशी तोपर्यंत मला कल्पनाही नव्हती. या कवितेने सुरेशचे आणि माझे गोत्र जुळले. करुणेने आणि प्रायश्चित्ताच्या भावनेने सुरू झालेली आमची मैत्री कवितेमुळे अधिक सांर्द्र झाली.

आता त्याच्याशी वागण्यात मोकळेपणा आला. त्याची थट्टा करण्यात, निर्दयपणे त्याचे वाभाडे काढण्यात पूर्वीपेक्षाही अधिक स्वातंत्र्य घ्यावेसे वाटू लागले. आता प्रतिघाताची भीती व काळजी वाटेनाशी झाली. किंबहुना जाहीरपणे परस्परांवर आघात व प्रत्याघात करण्याची चुरस आमच्यात वाढू लागली. आमचे हे दर्शनी भाषिक द्वंद्व अनुभवण्याची परिसराचीही हौस वाढत गेली. परस्परांच्या आयुष्यात परस्परांना निःसंकोच व अप्रतिबंध प्रवेश मिळाला.

(क्रमशः)