सुरेश-१

सुरेश

१९४०-५० चा काळ असेल. त्यावेळी मी विदर्भ महाविद्यालयात शिकत होतो. आमच्या अचलपूरच्या मानाने अमरावती हे तसे मोठे शहर होते. जिल्ह्याचे ठिकाण होते. तिथे हॉटेले खूप होती. सिनेमा टॉकिज होत्या. मुख्य म्हणजे सरकारी कॉलेज होते. त्यावेळी कॉलेजमध्ये शिकायला मिळणे आजच्यासारखे सर्रास झाले नव्हते. त्यामुळे आपण कॉलेज-विद्यार्थी आहोत, ही ऐट मिरवता येत होती. अचलपूरला हॉटेलमध्ये जाणे अगम्य गमनासारखेच होते. त्यामुळेच  चमचमीत पदार्थ चापण्याची हौस अमरावतीला राजरोसपणे फेडता येत होती.

मी होस्टेलमध्ये राहात होतो तोपर्यंत मी काही लेखन केले नव्हते. पण लेखक म्हणून ओळखले जाण्याची आवड होती. शाळेत असताना मी चार-पाच वर्षे एक हस्तलिखित मासिक बऱ्याचशा नियमितपणे चालवीत होतो. त्यामुळे लिहू इच्छिणाऱ्या मुलांच्या कंपूचा मी पुढारी होतो. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीला आलो. प्राध्यापक नावाच्या प्राण्याबद्दल आकर्षण होते. नामांकित माणसे व विशेषतः लेखक पाहायला मिळावा, ही उत्सुकता होती. अमरावतीला तेव्हा लेखनासाठी नाणावलेली माणसे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती.

प्राध्यापक व लेखक दोन्ही वलये असणारी काही माणसे आमच्या कॉलेजामध्येच होती. ती नित्य पाहायला मिळत. त्यांच्याशी कधीकधी बोलण्याचीही संधी मिळे व ते प्रत्यक्ष आपल्याशी बोलल्यामुळे काही काळ हुरळल्यासारखे होऊन जाई.

अशा काळात सुरेश माझ्या सहवासात आला. परीटघडीशी वैर असणारे ढगळ कपडे त्याने अंगावर घातले होते. एक सैल पायजमा व तसाच सैल बिनकॉलरचा शर्ट हा पोशाख त्यावेळीही होता. परीटघडीशीच केवळ नव्हे, तर धुतले जाण्याशीही या कपड्यांचे वाकडे असावे, असा संशय येण्याइतपत त्यांचे एकूण रूप असे. नेहमीप्रमाणे लंगडत लंगडत तो आला. त्यावेळी त्याने माझे लक्ष वेधून घेतले. घोळका घेऊन फिरण्याची त्याची सवयही तेव्हापासूनचीच होती. फटकळपणा त्याच्या बोलण्यातून सारखा बाहेर फुटत असे. कुणाचीही मुर्वत ठेवण्याचीही त्याची वृत्ती नव्हती. त्याच्या निधड्या व उद्धट बोलण्याचेच समवयस्कांना आकर्षण होते. पण अपंगपणामुळे त्यावेळी तो बहुतेकांच्या चेष्टेचा व हेटाळणीचाच विषय होता. सार्वजनिक कार्य करण्याची त्याला हौस होती. मातृपरंपरेने तो डाव्या विचारसरणीचा होता. अमरावतीतल्या सर्व स्तरांमध्ये त्याचा मुक्त वावर होता. मुसलमान मित्रांशी त्याचे अधिक जवळीचे संबंध होते. मध्यमवर्गीय व ब्राह्मण अशा उच्चभ्रू  लोकांबद्दल त्याला तेव्हापासूनच तिटकारा होता. स्वतःच्या  अब्रुदार घराण्याबद्दल, परंपराप्राप्त प्रतिष्ठेबद्दल व सिव्हिल लाईन्स संस्कृतीबद्दल आढ्यता बाळगणाऱ्या लोकांचा सर्वांसमक्ष पाणउतारा करण्यात त्याही काळात त्याला आनंद होत असे.

माझ्याही लेखी सुरेश हा थट्टेचा विषय होता. त्यामुळेच कॉलेजच्या सभागृहात एका कार्यक्रमाच्या वेळी उठवळपणाने मी त्याची मस्करी करण्याचा प्रयत्न केला. ती करण्याइतकी आमची जवळीक नव्हती. परंतु काहीही करण्याचे कॉलेज-विद्यार्थ्याचे स्वातंत्र्य निर्विवाद व अबाधित असल्यामुळे माझ्या समोरच्या रांगेतील खुर्चीवर तो बसायला जाण्याच्या बेतात असतानाच मी ती खुर्ची मागे ओढून घेतली. काठीच्या आधारानेच बसण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचा तोल जाणे अपेक्षितच होते. मला तेच हवे होते. अवतीभवतीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही तो करमणुकीचा विषय होता. सुरेशने एकदा रागाने वळून माझ्याकडे पाहिले व एवढेच म्हणाला,

'आपणाकडून ही अपेक्षा नव्हती.'

'होतो अपेक्षाभंग कधी कधी,' मी स्वतःला सावरत बोललो.

'शीर्षभंग होणार नाही याची काळजी घ्या!' चपराक मारल्यासारखा सुरेशचा जबाब आला.

मी स्वाभाविकच चपापलो. तेव्हापासून आपोआपच त्याच्याशी वागण्यात संयम व सावधपणा आला.

ही आमची पहिली भेट. त्यानंतरही जुजबी भेटी होतच होत्या. एकदा गॅदरिंगच्या समयस्फूर्त वक्तृत्वस्पर्धेचा कार्यक्रम होता. माझी पाळी संपवून मी व्यासपीठावरून खाली आलो, सुरेशच्या नावाचा पुकारा झाला तेव्हा व्यासपीठावर गेला. टेबलावरची चिठ्ठी त्याने उचलली व मोठ्याने दाखवली. त्यावर त्याच्यासाठी विषय लिहिलेला होता --'मला पुनर्जन्म मिळाला तर!'