शे(अ)रो-शायरी, भाग-३ : तुम्हारे खत में

नमस्कार मित्रांनो,
शे(अ)रो-शायरीच्या ह्या लेखमालेच्या, तिसऱ्या भागात आपले स्वागत करतो. आज आपण प्रसिद्ध शायर दाग देहलवी ह्यांच्या ’तुम्हारे ख़त में नया इक सलाम किस का था’ ह्या प्रसिद्ध गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही गझल मला आपल्याशी ’शेअर’ कराविशी वाटली, कारण ह्यातील अंदाज-ए-बयाँ म्हणजे सांगण्याची पद्धत, मला अतिशय आवडली. जे म्हणायचे आहे, ते खुबीने, नेमकेपणाने, आणि तितक्याच हृदयंगम अश्या शैलीत ह्या गझलेत मांडण्यात आले आहे.
गुलाम अली ह्यांनी गायलेली ही गझल आपण सर्वांनी ऐकली असेलच. ह्या ध्वनिफीतीमधे नसलेल्या शेरांचा सुद्धा आपण ह्या भागात आस्वाद घेणार आहोत.
चला तर, आजच्या मैफलीची सुरुवात करु या.
मित्रांनो, अशी एक कल्पना करा, की प्रेयसीला- जी प्रियकराच्या गाढ आणि उत्कट प्रेमात आहे, प्रियकराचे एक पत्र येते. पत्राच्या शेवटी, एका काहीश्या अनोळखी मुलीच्या नावाने त्याने, हिलाही "माझा प्रेमपूर्वक नमस्कार कळव" असे लिहिले आहे, ती वाचून प्रेयसीच्या स्त्री-सुलभ मनात जणू एक विचार-चक्रच सुरु होते; ती विचार करायल लागते ,की ही कोण असावी, आधी ह्याने ह्या मुलीचा कधीच उल्लेख केलेला नाहीय. मग ती प्रियकराला विचारते, की ही कोण? त्यावर प्रियकर थोडेसे हसूनच उत्तर देतो की " घाबरु नकोस, ती काही तुझी प्रेमातील प्रतिस्पर्धी नाहीय". तरी सुद्धा तिचे समाधान होत नाही. ती मग परत विचार करु लागते की " हा म्हणतोय खरा, की ही तुझी प्रेमातील प्रतिस्पर्धी नाहीय म्हणून; पण होणार नाही, कशावरून? ती त्याला परत-परत विचारते, की- वोह नाम किसका था". अगदी स्त्री-सुलभ भावना! बस! प्रेयसीच्या ह्या भावावस्थेचे कविने ह्या गझलेच्या मतल्यात अतिशय मार्मिक वर्णन केले आहे,शायर म्हणतो की-

तुम्हारे ख़त में नया इक सलाम किस का था
न था रक़ीब तो आख़िर वो नाम किस का था

[ रक़ीब= प्रतिस्पर्धी ]

प्रियकराच्या पत्रातला हा नवा ’सलाम’ कुणासाठी आणि कश्यासाठी हे न कळल्यामुळे प्रेयसी काहीशी अस्वस्थ झालीय. ती विचार करते, की माझ्या प्रियकराने आवर्जून नमस्कार सांगितला आहे- ही अशी कोण खास व्यक्ती आहे?... हा शेर खरे तर प्रियकर किंवा प्रेयसी ह्यापैकी कुणालाही लागू पडतो, पण त्यातील भाव हे स्त्री-सुलभ भावनांच्या अधिक जवळ जाणारे आहेत, असे मला वाटते.
ह्यापुढील शेरही तितकाच सुंदर आहे. तो असा की-

वो क़त्ल कर के हर किसी से पूछते हैं
ये काम किस ने किया है ये काम किस का था

ह्यातील भावार्थ असा की ,कवि त्या सौंदर्यवतीच्या मदनबाणांनी पुरता घायाळ झाला आहे, आपण म्हणतो ना की ’ यार, तिचे डोळे एकदम कातील आहेत’ किंवा ’यार, उसने तो आज कत्ल कर दिया’ बस तसे! आणि त्या मदनिकेलाही हे पक्के ठाव आहे की तिच्याच लावण्याचे तीर प्रियकराच्या हृदयात उतरले आहेत,पण तरिही ती साऱ्यांना असे विचारते आहे, आणि ते ही अगदी साळसूदपणे, ... की ह्याची अशी ’प्रेम-विव्हल’ अवस्था कोणी बरे केली, हे काम कोणी केले असावे? म्हणजे आपल्या लावण्याने बघणाऱ्याच्या हृदयात वणवा तर लावायचा आणि वरुन अगदी भोळेपणाने विचारायचे की ही आग कोणी बरे लावली असावी?
आगे कुछ ऐसा कहा है-

वफ़ा करेंगे ,निबाहेंगे, बात मानेंगे
तुम्हें भी याद है कुछ ये कलाम किस का था

[कलाम = वक्तव्य ]

प्रसंग असा आहे की, प्रेयसी प्रियकरापासून दुरावली आहे, त्याला सोडून गेली आहे, बहुदा कायमचीच! नंतर प्रेयसी जेंव्हा त्याला भेटते, तेव्हा प्रियकर तिला, तिने त्याच्याशी प्रामाणिक राहायच्या, त्याची नेहमी साथ देण्याच्या, ज्या आणा-भाका घेतल्या होत्या, त्याचे स्मरण करून देतो. प्रियकर म्हणतो की " मी सदैव तुझी साथ देईन, तुझ्या इच्छेचा आदर करेन- असे कोणी म्हटले होते; तुला आठवतेय ?" पर्यायाने हेच की, तू मला जी वचने दिली होतीस ती तू आता पूर्ण विसरली आहेस, . तुला आठवतेय तरी का, की "मी सदैव तुझीच होऊन राहीन" असे शब्द कुणाचे होते?
पुढील शेरात दाग देहलवी ह्यांनी दर्द आणि बेदर्द ह्या शब्दांचा अतिशय खुबीने वापर केलाय. दाग म्हणतात की-

रहा न दिल में वो बेदर्द और दर्द रहा
मुक़ीम कौन हुआ है मुक़ाम किस का था

[ १) मुक़ीम = घरात राहणारा, २) मुक़ाम = घर, निवास-स्थान ]

इथे प्रेयसीच्या प्रेमाचा निष्ठुरपणे त्याग करुन निघून गेलेल्या, प्रेयसीला वियोगाच्या दु:खात लोटून गेलेल्या प्रियतमाला, ’बेदर्द’ म्हटले आहे. शायर म्हणतो की माझ्या हृदयात तो ’बेदर्द’ तर राहिला नाहीच, पण त्याच्या वियोगामुळे जे दु:ख झालेय, ते मात्र राहिलेय. खरे तर माझे हृदय हे माझ्या प्रियतमाचे निवास स्थान असायला हवे होते, पण तसे तर झाले नाहीच, उलट विरह वेदनाच माझ्या हृदयात कायमची निवासाला येऊन बसली आहे. माझे हृदय होते कुणाच्या वास्तव्यासाठी, आणि प्रत्यक्ष त्यात राहतेय कोण?..
ह्या गझलेतील ह्या नंतरचा जो शेर आहे, तो ’दाग’ ह्यांनी कुठला प्रसंग अनुभवल्यामुळे लिहिला असावा, ह्या विषयी मला अतिशय कुतूहल आहे. तसा अनुभव त्यांना कुठे बरे आला असावा, किंवा त्यांना हा शेर का बरे लिहावा वाटला असेल, ह्याच विचार मी करतोय. दाग म्हणतात की-

न पूछ-ताछ थी किसी की वहाँ न आवभगत
तुम्हारी बज़्म में कल एहतमाम किस का था

[ १) बज़्म = मैफिल, २) एहतमाम = व्यवस्था, संयोजन ]

कवि म्हणतो की, काल तुझ्या इथे जी मैफल होती, तिचे संयोजन, त्यातील व्यवस्था कुणाची होती?.. कारण तिथे, ना येणाऱ्या-जाणाऱ्यांचे स्वागत होत होते, ना विचारपूस. असे नीरस, आणि भावनाशून्य नियोजन करणारा कोण बरे होता? कदाचित त्यांना असे म्हणायचे असेल की, असे आतापर्यंत कधीच झालेले नाहीय, तुझ्या मैफलीत प्रत्येकाचे व्यवस्थित आतिथ्य होत होते, मग आता अशी काय परिस्थिती आली की तुझ्या येथे साधे आतिथ्य करणारा सुद्धा कोणी राहिला नाही. झपाट्याने बदलणाऱ्या दुनियेत, सामाजिक संबंधांमधे आता फक्त व्यवहारच शिल्लक राहिला आहे, असे कविला बहुदा म्हणायचे असावे (मला ह्या संदर्भात आपल्या इथले एक उदाहरण द्यावेसे वाटते, पूर्वी लग्नांमधे पंगती उठायच्या आणि यजमान खुद्द स्वत: प्रत्येकाला आग्रहाने वाढायचे, पण आता सगळ्या खान-पान व्यवस्थेचा काँट्रॅक्ट दिला जातो, त्यामुळे यजमान पूर्वीसारखे आग्रहाने, आपुलकीने, स्नेहाने पाहुण्य़ांना जेऊ घालताहेत हे दृष्य अताशा जरा विरळाच दिसते.)
दाग पुढे म्हणतात की-

हमारे ख़त के तो पुर्जे किए पढ़ा भी नहीं
सुना जो तुम ने बा-दिल वो पयाम किस का था

[ १) पुर्जे = तुकडे २) बा-दिल = मनापासून ३) पयाम = संदेश ]

कवि प्रेयसीला उद्देशून म्हणतोय की, मी तुला अतिशय प्रेमपूर्वक एक पत्र पाठविले होते, त्याचे तू फाडून सरळ तुकडे-तुकडे केलेस, वाचायची साधी तसदी सुद्धा घेतली नाहीस. पण तुला आलेला एक संदेश असा होता , जो तू अतिशय अधीरतेने, प्रेमभराने ऐकलास. तुला आलेला तो संदेश कुणाचा होता? तो असा कोण भाग्यवान होता, की ज्याचा निरोप तू इतका ’दिल थामके’ ऐकलास... तो कोण होता हे मलाही सांग! कविला त्याचा प्रेमातील ’रक़ीब’ कोण आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
ह्या पुढील द्विपदीमधे एक अतिशय मौलिक विचार व्यक्त झालाय. शेर असा आहे की-

इन्हीं सिफ़ात से होता है आदमी मशहूर
जो लुत्फ़ आप ही करते तो नाम किस का था

[ १) सिफ़ात = गुण, २) लुत्फ़ = कृपा, उदारता ]
आपल्या समाजात एखादे चांगले काम, अथवा दान-धर्म, हे खूप गाजावाजा करुन, दिखावा करुन, करण्याची एक वृत्ती दिसून येते. दानधर्म करण्यात आपले नाव व्हावे, हाच बहुतेकांचा मुख्य हेतू असतो. पण असेही काही लोक असतात, जे कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता अशी पुण्य-कार्ये सतत करत असतात. कवि ह्या दिखाऊ वृत्तीच्या लोकांना उद्देशून म्हणतोय की, तुम्ही जर म्हणता की दान-धर्म, उदारता हे सर्व गुण तुमच्याच जवळ आहेत, तर मग तुमचे नाव झालेले कुठे दिसत नाही, दानशूर म्हणून कुण्या दुसऱ्याचेच नाव प्रसिद्ध आहे; असे का बरे? ह्याचे कारण असे की, त्याने कुठलाही गाजावाजा न करता, मोठेपणाचा आव न आणता, नि:स्वार्थी भावाने नेहमी चांगले काम केले आहे, आणि त्याच्या ह्या नि:स्वार्थी भावाने सेवा करण्याच्या गुणामुळेच तो प्रसिद्ध झाला आहे. कुठलाही बडेजाव न आणता, प्रसिद्धीची हाव न धरता जर तुम्ही एखादे नेक काम कराल तर त्याचे नाव आपोआप प्रसिद्धीला येतेच.
आगे कुछ ऐसा लिखा है-

तमाम बज़्म जिसे सुन के रह गई मुश्ताक़
कहो, वो तज़्किरा-ए-नातमाम किसका था

[ १) मुश्ताक = उत्सुक, अभिलाषी, २) तज़्किरा-ए-नातमाम = अपूर्ण असा उल्लेख,वर्णन, चर्चा, ]

कवि एक असा प्रसंग सांगतो आहे, की मैफलीत एका शायराच्या कलागुणांचा अगदी मोघम, बहुदा त्याचे नाव न घेताच, उल्लेख करण्यात आला, काहीसा अपूर्ण असा! पण असे असले तरी त्याचा अल्पसा परिचय, त्याच्या प्रतिभेचे, कलागुणांचे ओझरते वर्णन ऐकणाऱ्याच्या मनावर इतकी छाप टाकणारे होते की सगळे श्रोते त्याला ऐकायला अतिशय अधीर, उत्सुक झाले. म्हणून कवि पृच्छा करतोय की हा प्रतिभावंत कोण, की ज्याच्या नुसत्या ओझरत्या उल्लेखाने सुद्धा मैफल भारावून गेली?
कवि पुढे म्हणतो की-

गुज़र गया वो ज़माना कहें तो किस से कहें
ख़याल दिल को मेरे सुबह-ओ-शाम किस का था

शायर इथे, प्रेमाचा ऋतू, जो आता कायमचा सरुन गेलेला आहे, त्याविषयी बोलतोय. तो म्हणतोय की आता ते प्रेम भरले दिन गेलेत, "वेगवेगळी फुले उमलली, रचूनी त्यांचे झेले, एकमेकांवरी उधळले , गेले ते दिन गेले" अशीच खंत शायराला आहे. तो पुढे म्हणतो की त्या वेळेला मी रात्रंदिवस कुणाच्या विचारात मग्न असायचो?, तर ते विचार तुझेच, आणि तुझेच असायचे, म्हणजेच प्रेयसीचे! आता मात्र ते प्रेम सरले, ते दिवस गेले, प्रियकराचा वियोग झाला. हे दु:ख मी आता बोलू तरी कुणापाशी?
अजून एक शेर असा आहे की-

अगर्चे देखने वाले तेरे हज़ारों थे
तबाह हाल बहुत ज़ेरे-बाम किसका था

[ १) अगर्चे = जरी, यद्यपी, २) बाम= घराचा सज्जा, ३) जेरे-बाम = सज्जाखाली ]

कवि अश्या एका प्रसंगाचे वर्णन करतोय की, त्याची अतिशय सुंदर असलेली प्रेयसी, तिच्या घराच्या सज्जात सहज येऊन उभी राहिली आहे. पण तिच्या सौंदर्याची ख्याती इतकी दूरवर पसरली आहे की, ती सज्जात येऊन उभी राहिली , ह्याची देखील बातमी झाली, आणि केवळ तिला बघायला अनेक जण आपापल्या घराच्या बाहेर आलेले आहेत. प्रियकर सुद्धा तिच्या घराच्या सज्जाखाली तिला ’एक नजर’ बघायला आलाय. शायर म्ह्णतो की, त्या वेळी तुला बघणारे जरी हजारो होते, तरी तुझे सौन्दर्य बघून ज्याचे हृदय अतिशय ’घायाळ’ झाले, तबाह झाले, तो कोण होता?- तर तो मीच होतो. एका अर्थाने ,प्रियकर असे म्हणतोय की, तुझ्या सौंदर्याचा माझ्या सारखा चाहता, पुजारी माझ्याशिवाय दुसरा कोण आहे?
गझलेचा मक्ता सुद्धा अतिशय मस्त लिहिलाय. तो असा की-

हर इक से कहते हैं क्या 'दाग़' बेवफ़ा निकला
ये पूछे इन से कोई वो ग़ुलाम किस का था

प्रेयसी प्रियकरावर जो प्रतारणेचा आरोप करतेय, त्याचे मोठे छान उत्तर प्रियकर ह्या शेरातून देतोय. प्रियकर म्हणतोय की ती प्रत्येकाला हे सांगतेय की प्रियकर ( आता इथे ’दाग’ स्वत:च-) हा माझ्याशी प्रामाणिक राहिला नाही. त्यावर प्रियकर म्हणतोय की तिला जाऊन कुणीतरी एकदा विचारा, की ती जर म्हणतेय की ’दाग’ बेवफ़ा आहे, तर मग ’दाग’ प्रेमात कुणाचा गुलाम बनून राहिला होता, हे तिने एकदा सांगावे; म्हणजे असे की मी प्रेमात फक्त तिचा आणि तिचाच गुलाम होऊन राहिलो होतो. आणि असे असून सुद्धा ती माझ्यावर ’बेवफ़ा’ असण्याचा आरोप करतेय?
चला तर, आता आपला निरोप घेतो, पुढील भागात भेटूच.
-मानस६

प्रतिसाद

मानस ६,

आपला उपक्रम स्तुत्य आहेच. काम अच्छा है वो जिसका के मुआल अच्छा है! एक विनंती आहे. गझलांची निवडही अधिक सुंदर व्हावी. ही गझल व गालिबची सुरुवातीला दिलेली गझल या तुलनेने साध्या होत्या. परवीनची गझल मस्त वाटली.

तुम्हारे खतमे - प्रेयसीलाही शेर लागू पडतात हे मान्य होण्यासारखे आहे.. तरीही.. माझ्यामते ही पुरुष प्रियकराने व्यक्त केलेली गझलच आहे.

अभिनंदन व धन्यवाद!

मानस६जी,

पहिल्या लेखापेक्षा वाचायला सोपा, ओघवता वाटला. अर्थही पटकन लक्षात आला. (अर्थात पहिलाही छानच होता.) या लेखमालेस माझ्या सदिच्छा.