शे(अ)रो-शायरी, भाग-४ : खिलौने नहीं चलते

नमस्कार मित्रहो,
शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या ४थ्या भागात आपले स्वागत करतो. मित्रांनो, जिथे रोमॅंटीसिझम, रम्य कल्पना-विलास हे उर्दू शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील जमाली ह्यांची, एक अतिशय दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या वाचण्यात आली, आणि तीच गझल, तिच्या ह्या वैशिष्ठ्यामुळेच, मी आपणासोबत शेअर करतोय; गझल समजायला अतिशय सोपी आहे.

मतला असा आहे की-

अब काम दुआओं के सहारे नहीं चलते
चाबी न भरी हो तो खिलौने नहीं चलते

ह्या शेरात शायराने बदलत्या काळाकडे अगदी अचूक अंगुली-निर्देश केलाय. यंत्र-युगाच्या वाढत्या प्रभावामुळे मानवी जीवनातील भाव-भावनांचे स्थान आणि पर्यायाने महत्व आता अगदी नगण्य होत चालले आहे, हे शल्य कविने अगदी मार्मिक शैलीत बोलते केलेय. हा शेर लिहिताना अशी एक काव्यात्म कल्पना कविच्या मनात कदाचित येऊन गेली असावी की ,आताचे युगच असे आले आहे, की जणू परमेश्वर सुद्धा आपल्यावर रागावला आहे असेच वाटत राहावे. पूर्वीच्या काळी(सत्ययुग म्हणा हवे तर), परमेश्वराला जर मनापासून प्रार्थना केली की एखाद्या बिचाऱ्याचा आजार बरा कर, तर त्याने करुणा येऊन तसे केलेही असते, पण आता कलीयुगात, काळच असा आहे की, देवसुद्धा म्हणेल की,"नाही, मी काही करु शकत नाही, ह्या खेळण्याला भरलेली चावीच संपली आहे". आजकालच्या काळात सद्भावनांचे महत्व आणि प्रभाव हे नष्टप्राय होत चालले आहेत, असेच कविला म्हणायचे असावे; अगदी दैवी शक्ती सुद्धा ह्याला अपवाद नसाव्यात. आपल्या अवती-भवती घडणाऱ्या घटना बघून आपण सुद्धा नेहमी हाच विचार करत असतो, नाही का? (’खिलौने नही चलते’ मधे मला आशयाचा आणखी एक पदर दिसला- तो म्हणजे, जो पर्यंत स्वार्थ आहे, तो पर्यंतच एखादी व्यक्ती कार्यरत राहील, स्वार्थ संपला की पुढे नाही; अर्थात हे माझे मत!)

पुढील शेर असा आहे की-

अब खेल के मैदानसे लौटो मेरे बच्चो
ता उम्र बुजुर्गों के असासे नहीं चलते

[ १) असासे= संपत्ती, पूंजी (अनेक-वचनी), २) ता उम्र = आयुष्यभर ]

आपला बहुतेक वेळ खेळाच्या मैदानावर घालवणाऱ्या तरुण पिढीला एक बुजुर्ग वडीलकीचा सल्ला देतोय की, आता खेळणे, मौज-मजा पुरे करा, आणि आपापली जवाबदारी संभाळायला लागा, स्वत:च्या पायावर उभे रहा, कारण आम्ही जे कमावून ठेवले आहे, ते तुम्हाला आयुष्यभर थोडेच पुरणार आहे? तेंव्हा वेळीच आपली जवाबदारी ओळखून कामाला लागावे, ह्यातच तुमचे हित आहे. शेवटी, आम्ही तुम्हाला किती दिवस पुरणार आहोत ? हा आशय तर प्रत्येक घरातील परिस्थीतीला लागू पडतो, नाही का?

आगे कुछ यूँ फर्माया है-

इक उम्र के बिछुडो़ का पता पूछ रहे हो,
दो रोज़ यहाँ ख़ून के रिश्ते नहीं चलते

अगदी कटु सत्य आहे, शायर म्हणतोय ते! तो म्हणतोय की, "अहो, इथे दोन-चार दिवस सुद्धा रक्ताचे संबंध टिकत नाहीत, अन तुम्ही तर अनेक वर्षांपूर्वी हारवलेल्या तुमच्या कुणा नातेवाईकाचा पत्ता विचारताय. दुनिया इतकी आप-मतलबी झालीय की लोक, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या रक्ताच्या नात्याचा गळा घोटायला सुद्धा कमी करत नाहीत. इथे तर सख्खे नाते सुद्धा दोन दिवसही टिकण्याची मारामार आहे, आणि तुम्ही काही वर्षांपूर्वी धूसर झालेल्या, काळाच्या पडद्याआड जाऊ बघणाऱ्या नात्याविषयी विचारता आहात!

पुढील शेर असा आहे की-

ग़ीबत मे निकल जाते है तफ़रीह के लम्हे
अब महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं चलते

[ १) ग़ीबत= कुचाळक्या, चुगली, चहाडी, २) तफ़रीह= फुरसत, मनोरंजन, ३) लतीफ़े= विनोद ( अनेक-वचन) ]

शकील म्हणतात की आता महफिलीची संस्कृतीच बदलत चालली आहे, चार मित्र एकत्र जमले तर दुसऱ्यांच्या चुगल्या, चहाडी करण्यातच लोकांचा वेळ जातो. एकमेकांना विनोद सांगून हसविणे, चार घटका एकमेकांची करमणूक करणे, हा प्रकारच आता राहिला नाहीय. मित्रांच्या महफिलीत आता एकमेकांची निखळ करमणूक करणाऱ्या गप्पा-विनोद ह्यांना स्थानच राहिलेले नाही. (आज-कालच्या सिरीयल्स मधे तरी काय दाखवितात? प्रत्येक पात्र एक-दुसऱ्याच्या कुचाळक्या, चुगल्या करत असतानाच आपण बघत असतो.) हे सांस्कृतीक अध:पतनच म्हणायचे नाही, तर दुसरे काय?

ह्या पुढचा शेर तर ह्या गझलेतील मला अत्याधिक आवडलेला शेर आहे. तो असा की-

यह विल्स का पॅकेट , ये सफ़ारी, ये नगीने
हुज़रो में मेरे भाई ये नक़्शे नहीं चलते

[ १) नगीना= दागिना, २) हुज़रा= फकीराची, किंवा पुजाऱ्याची खोली; हुज़रो-अनेकवचन, ३) नक़्शा= ढब, शैली, ढंग; नक़्शे-अनेकवचन ]

प्रसंग असा आहे की, कुणीसा एका पुजाऱ्याच्या किंवा संन्यास्याच्या खोलीत आलाय, आणि तो ही कसा तर, अगदी आपला बडेजाव मिरवित; एका हातात विल्स सिगारेटचे पाकीट, अंगामधे सफ़ारी ड्रेस, गळ्यात सोन्याच्या साखळीसारखा एखादा दागिना! म्हणून तो फकीरच बहुदा त्या वल्लीला उद्देशून म्हणतोय की, " अरे बाबा, ही एका फकीराची- ज्याने सर्व ऐहिक, भौतिक सुखांचा त्याग केलेला आहे, त्याची खोली आहे. इथे असे शान-शौक चालत नाहीत. इथे यायचे असेल तर एक साधा-सुधा माणूस म्हणून ये. जरा आठवून बघा; एखाद्या संताच्या किंवा देव-देवतांच्या दर्शनासाठी जाताना सुद्धा लोग अगदी नटून-थटून जातात, असे कितीतरी फोटो आपण अनेकदा सर्वच मिडीयामधे बघत असतो.( पुन्हा एकदा आजच्या सिरीयल्स आठवा; त्यात तर झोपायला जातानाही दागिने घालतात!)

ह्या गझलेचा शेवटचा शेर सुद्धा अतिशय अर्थवाही असा आहे-

लिखने के लिये क़ौम का दुख-दर्द बहुत है
अब शेर में महबूब के नखरे नहीं चलते

[ क़ौम = वर्ण, जाती, वंश, राष्ट्र ]

ह्या गझलेतील प्रत्येक शेरच वास्तवाचे भान करुन देणारा आहे. आणि हा शेर देखील गझलेतील बदलत्या विषयांवर अगदी यथार्थच सांगतोय की, पूर्वी प्रेमिका, तिच्या दिलखेचक अदा हा गझलांचा प्रमुख विषय असायचा, पण आता बदलत्या काळाबरोबर शायरी सुद्धा बदलत चाललीय. आताच्या काळात भोवतालच्या समाजातील समस्या, प्रश्न, दु:खे ह्यांनाच प्राधान्य दिल्या जातेय किंबहुना द्यायला हवे. त्यामुळे गझलसुद्धा ’रिलेव्हंट’ होत चाललीय, तिच्यातील विषय आता ’रोमांस’ हा न राहता, त्यात सामाजिक वास्तवाचे भान येत चालले आहे. आणि अगदी खरेय ते! अगदी आज-कालच्या मराठी गझलाच बघा ना, अतिशय प्रगतीशील होतेय मराठी गझल. दलित काव्य हे सुद्धा ह्या संदर्भातील एक उत्तम उदाहरण ठरु शकेल.
चला तर, आता निघतो! पुढच्या भागात कतील शिफ़ाई ह्यांची एक गझल आपल्याशी ’शेअर’ करण्याचा ’मानस’ आहे! पुन्हा भेटूच!
-मानस६

प्रतिसाद

वाहवा....
धन्यवाद मानस.... फार सुंदर गझल शेअर केलित.. धन्यवाद.

अब खेल के मैदानसे लौटो मेरे बच्चो
ता उम्र बुजुर्गों के असासे नहीं चलते

अगदी यथार्थ........

गझलेतील इतर शेरांच्या मानाने मतला जरा कमी प्रभावी वाटला... पण एकंदर गझल अतिशय सुंदर...

पुनश्च धन्यवाद.

डॉ.कैलास

आहाहा!!
मस्त!