शे(अ)रो-शायरी, भाग-२: पा-ब-गिल सब है

नमस्कार मित्रांनो,
शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या दुसऱ्या भागात आपण पाकिस्तानातील एक प्रसिद्ध कवियत्री परवीन शाकिर हिच्या एका गझलेतील काही निवडक शेरांचा आस्वाद घेणार आहोत. ह्या कवियत्रीची गझल घेण्याची दोन मुख्य कारणे म्हणजे-
१) ह्या गझलेत पाकिस्तानातील वैचारिक दडपशाहीचे, अभिव्यक्ती-स्वातंत्र्याच्या गळचेपीचे अतिशय बोलके प्रतिबिंब पडले आहे, आणि ही गोष्ट ही गझल वाचता क्षणीच जाणवते.म्हणून ह्या दृष्टीने ही गझल मला प्रातिनिधीक वाटली.
२)दुसरे म्हणजे ह्या गझलेतील जे काफिये आहेत, ते उर्दू शब्द म्हणून अनेकांना काहीसे अपरिचीत असावेत, आणि ह्या गझलेच्या निमित्ताने त्यांच्या उर्दू शब्द-संख्येत काहीशी भर पडेल असे मला वाटले; म्हणून ही गझल निवडण्याचे प्रयोजन.
चला तर, सुरवात करु या!
गझलेचा मतला असा आहे की-

पा-ब-गिल सब है रिहाई की करे तदबीर कौन
दस्त-बस्ता शहर मे खोले मेरी जंजीर कौन

[१) पा-ब-गिल= चिखलात पाय रुतलेला, २) रिहाई= सुटका, ३) तदबीर= उपाय, योजना, ४) दस्त-बस्ता= ज्याचे हात बांधलेले आहेत किंवा जोडलेले आहेत असे]

कवियत्री काय म्हणतेय ते ध्यानात यायला फारसा वेळ लागणार नाही. ती म्हणतेय की, ह्या देशात सगळ्यांचेच पाय चिखलात रुतलेले आहेत, प्रत्येक जणच दलदलीत फसलेला आहे, मग माझ्या सुटकेची उपाय-योजना करणार तरी कोण आणि कशी करणार? जेथे सर्वांचेच हात बांधलेले आहेत, तेथे मला शृंखलेतून मुक्त करायला शेवटी येणार तरी कोण?. माझ्या व्यक्ती-स्वातंत्र्याची, अभिव्यक्ती-स्वातंत्र्याची जी गळचेपी होतेय, त्यातून माझी मुक्तता कोण आणि कशी करणार? हा शेर वाचताच पाकिस्तानातील राजकीय, सामाजिक वास्तवच आपल्या डोळ्यासमोर लख्ख उभे राहते. किंबहुना हा शेर अश्या कुठल्याही भ्रष्ट, मूल्यहीन, अस्मितेचा लवलेशही नसलेल्या समाज व्यवस्थेवर अतिशय मार्मिक आणि मोजक्या शब्दात भाष्य करतो. जेथे आजूबाजूची सगळी व्यवस्था, समाज, राज्यकर्ते; हे सारेच तेजोहीन, कणाहीन आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेले आहेत, तेथे भोवतालची परिस्थीती बघून, संवेदनाशील आणि पापभीरु व्यक्तीला जी हतबलता येते, त्यावर कवियत्रीने मनाला भिडणारे भाष्य केले आहे.
पुढे कवियत्री म्हणते की-

मेरा सिर हाजिर है लेकिन मेरा मुन्सिफ़ देख ले
कर रहा है मेरे फर्दे-जुर्म की तहरीर कौन

[ १) मुन्सिफ़= न्यायाधीश, २) फर्दे-जुर्म= आरोपपत्र ३) तहरीर= लिखावट, लिखाण ]

ह्यातील भावार्थ असा आहे की, मी आत्ताही देहदंडाच्या शिक्षेला सामोरी जायला तयार आहे, माझे शिर तुम्ही तात्काळ कलम करु शकता,... पण त्या आधी हे बघा,.. की मला शिक्षा ठोठावणारा न्यायाधीश कोण आहे?..., मी केलेल्या(?) गुन्ह्यांची कथा लिहिणारी व्यक्ती कोण आहे, ते एकदा तपासून घ्या! ती नि:स्पृह आहे अथवा नाही ह्याची खातरजमा करुन घ्या, अगदी आपले ऐतिहासिक संदर्भच द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की, जर नि:स्पृह अश्या रामशास्त्र्यांनी मला सजा सुनावली असेल तरच मला ती मंजूर आहे, अन्यथा नाही. एखाद्या ’आनंदीबाईंने’ आणलेल्या भाडोत्री न्यायाधीशाच्या हातून जर मला सजा-ए-मौत मिळणार असेल तर मला ती कदापीही मान्य होणार नाही. असे अनेक भाडोत्री न्यायाधीश पाकिस्तानात आपले ’कर्तव्य’ चोखपणे बजावत असतात, हे आपण नेहमी वाचत असतोच.
पुढील शेर असा आहे की-

आज दरवाजो पे दस्तक जानी-पहचानीसी है
आज मेरे नाम लाता है मेरी ताज़ीर कौन

[ १) दस्तक= थाप, २) ताज़ीर= सजा ]

परवीन म्हणते की, आज माझ्या घराच्या दरवाज्यावर पडणाऱ्या थापा माझ्या चांगल्याच ओळखीच्या आहेत, जुलमी सुलतानाचा कुठला तरी हस्तक नक्कीच माझ्या नावे माझ्या सजेचे फर्मान( मी कधीही न केलेल्या गुन्ह्यासाठी) घेऊन आलेला आहे; फक्त तो कोण आहे हेच बघणे आता शिल्लक आहे. आपल्या पैकी जे १९७५ मधील, खुद्द आपल्या देशात लागलेल्या आणिबाणीचे साक्षीदार आहेत, त्यांना ह्या शेरातील मर्म अधिक चांगले उमजेल. खऱ्या देश-भक्ताला देश-द्रोही ठरवून त्याला रात्री-बेरात्री त्याच्या राहत्या घरातून अटक करून घेऊन जाणे, हे त्या वेळेस अगदी नित्याचेच झाले होते.
ह्या पुढील शेर असा आहे की-

नींद जब ख्वाबो से प्यारी हो तो ऐसे अहद मे,
ख्वाब देखे कौन और ख्वाबो को दे ताबीर कौन

[ १) अहद= कालावधी, काळ, २) ख्वाबोकी ताबीर= स्वप्नांचा अर्थ ]

शायरा म्हणतेय की, मी ज्या समाजात जगतेय, तेथे आता असा काळ आलाय की येथील लोकांना स्वप्न बघण्या पेक्षा निद्रीस्त राहणे अधिक आवडायला लागलेय, मग अश्या परिस्थितीत आता स्वप्ने पाहायची तरी कोणी आणि पाहिलेल्या स्वप्नांना अर्थ द्यायचा तरी कोणी? सध्याच्या काळातील समाज हा इतका आत्म-मग्न, विलासात दंग असलेला, आणि ऐषो-आरामी वृत्तीचा झालाय की नव-नवी स्वप्ने बघण्याची, आणि त्यांना मूर्त रुप देण्याची, त्यांना अर्थ देण्याची इच्छा,व जिद्दच ह्या समाजातून लोप पावत चाललीय.
ह्या नंतर कवियत्री म्हणते की-

रेत अभी पिछले मकानो की न वापस आयी थी,
फिर लब-ए-साहिल घरौन्दा कर गया तामीर कौन

[ १) लब-ए-साहिल= किनाऱ्यावरती, २) घरौन्दा= घर, ३) तामीर= रचना, बांधकाम ]
ह्या शेरातील मला जाणवलेला अर्थ असा-
गेल्या खेपेला समुद्र-किनाऱ्यावर बांधलेली जी वाळूची घरे होती त्यांना लाटांनी कधीच वाहून नेलेय, आणि त्यांची रेती सुद्धा अजून किनाऱ्या वर परत आलेली नाहीय ( लाटा जेंव्हा एखादी वस्तू आपल्या सोबत वाहून नेतात, तेंव्हा काही काळानंतर तीच वस्तू लाटेसोबत वाहून परत किनाऱ्यावरच वापस येते), तरी सुद्धा फिरुन एकदा किनाऱ्यावर पुन्हा नव्याने घर कोणी बरे बांधले असावे? अशी, कधीही हार न मानण्याची वृत्ती, जिद्द कुणाची बरे असेल? लाटांनी घर वाहून नेले असले तरी फिरुन नव्या जोमाने नव-निर्मीती करणारा हा जिगरबाज कोण आहे? ह्या संदर्भात मला कुसुमाग्रजांची ’कणा’ ही कविता येथे आठवते आहे, ज्यात पुरामध्ये सर्वस्व वाहून गेलेला विद्यार्थी परत एकदा कंबर कसून आपला संसार उभा करण्याच्या कामाला लागला आहे.
ह्या गझलेचा मक्ता तर अगदी लाजवाब आहे, तो असा की-

दुश्मनो के साथ मेरे दोस्त भी आझाद है
देखना है खेचता है मुझ पे पहला तीर कौन

ह्या शेराचाचा अर्थ विशद करुन सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही, हो ना? वाह! क्या बात है! एवढेच म्हणतो, आणि आपली रजा घेतो.
पुढील भागात भेटूच!
- मानस६

प्रतिसाद

वा.. अतिशय सुंदर गझल आणि तितकाच सुरेख परिचय.

धन्यवाद मानस!

अनेक उर्दू शब्द कळताहेत. आपण सखोल आणि अभ्यासपुर्वक लिहीता. धन्यवाद!

वाह. सुंदर गझल. धन्यवाद. मानस६.

फारच सुंदर!
परवीन ची गझल वाचायला मिळाली , आणि सुंदर रसग्रहणही, धन्यवाद!