कवितेचा प्रवास-२
मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात नेहमीच सुंदर काव्यलेखन करीत होतो असे नाही. तेव्हासुद्धा मला असे वाटत नव्हते. पण तेव्हा मी अगदीच फालतू लिहीत होतो, असेही नाही. माझ्या वयाच्या मानाने मी बरा लिहीत होतो. कधीकधी छान लिहायचो--
आला गोड हिवाळा!
लोचनात दाटली अचानक तुझी स्वप्न-मधुशाळा!
जरी गुलाबी थंडी आली
तरी न काया पुलकित झाली
घाल जरा लावण्यमयी पण तुझ्या स्मितांना आळा!
गडे आजचे शीत अनावर
नकळत करे काया थरथर
तंग स्वेटराआड तुझे हे यौवन करिते चाळा !
मात्र एवढ्यापुरते हं. यापलिकडे काही नाही. मी फार सज्जन होतो असे नव्हे. पण माझ्यात नेत्रसुखापुरतेच धैर्य होते. शिवाय, माझ्या तेव्हाच्या सामाजिक नियमांनुसार कॉलेजमधील मुली " अतिशूद्र" होत्या किंवा त्यांच्या दृष्टीने मीच "अतिशूद्र" होतो, असेही कुणी म्हटले, तरी हरकत नाही. चालेल!
मी प्रारंभापासून गुणगुणतच लिहीत आहे. आता हे "गुणगुणणे" आल्यावर मला मी ज्याच्यावर बेहद्द फिदा आहे, असा माझाच शेर मला आठवला. तो येथे लिहिण्याचा मोह टाळवत नाही--
रुणझुणत राहिलो, किणकिणत राहिलो !
जन्मभर मी तुला ये म्हणत राहिलो !
पुनः मोह होत आहे--
दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो !
तर ते असो. अजून पूर्वाधच पूर्ण झालेला नाही, तर मी लिहिता लिहिता उत्तरार्धाकडे कसा वळलो? माझे हे नेहमी असेच होते. जाऊ द्या.
मी सहसा मुक्तछंदाच्या वाटेला जात नाही. पण विदर्भ महाविद्यालयात असताना मी मुक्तछंदातही काव्यलेखन करून पाहिले होते.
काय बेटे ऊन आहे !
धडधडीत माझ्यासमोर
सकाळची संधी साधून
तू एकटीच आहेस पाहून
तुझ्या अंगागाला बिलगत
मला अंगठा दाखवीत आहे
काय बेटे ऊन आहे !
तेव्हा मी मुक्तछंदात असेही लिहिले होते--
दुःख माझे माझियापाशी असू दे !
ते बिचारे एकटे जाईल कोठे?
माझियावाचून त्याला
आसरा आहे कुणाचा ?
ते किती आहे इमानी
जन्मले तेव्हापुनी श्वानापरी
माझ्याच मागे राहिले ते !
दुःख माझे माझियापाशी असू दे !
पण त्याच काळात मी थोडेबहुत विनोदीही काव्यलेखन केले. निदान मी त्यावेळी त्याला "विनोदी" समजत होतो. सर्वच तपशील देणे योग्य नाही आणि शक्यही नाही. आमच्या कॉलेजमधील स्वतःला तेव्हाची "श्रीदेवी" समजणाऱ्या एका आगाऊ मुलीला उद्देशून मी तेव्हा लिहिले होते--
नवशिका प्रेमात मी
अग महामाये कच्चा
तुझ्या खप्पड गालांचा
घेऊ कसा गालगुच्चा !
आठवतेय म्हणून सांगतो की, विदर्भ महाविद्यालयात शिकत असताना फक्त कै. प्रा. भवानीशंकर पंडित सोडून मला कोणाचेही मार्गदर्शन मिळाले नाही आणि कै. प्रा. भवानीशंकर पंडितांनी मला "किनारा" ह्या कवितेच्या बाबतीत मार्गदर्शन केले ! ते माझ्या वडिलांचे मित्र होते. म्हणून मी त्यांना बुजत होतो. तेव्हाची पद्धत!
आजही मला आठवते आणि आश्चर्य वाटते. मला महाविद्यालयात (एका कवितेचा अपवाद सोडून) आणि "बाहेर" पडल्यानंतर महाराष्ट्रातील किंवा विदर्भातील एकाही बुजुर्ग कवीचे- मागील पिढीतील एकाही कवीचे- मार्गदर्शन लाभले नाही. मी त्यांना बिलकुल दोष देत नाही. पण झाले ते असे झाले! अमरावतीत होणाऱ्या कविसंमेलनांत माझ्या व इतरांच्या कविता ते कोणतेही भाष्य न करता ऐकून घेत. "हल्ली काय लिहिलेले आहे? किंवा काय लिहीत आहात?" असे मला एकाही बुजुर्गाने कधीही-कधीही-कधीही विचारले नाही. आज त्याबद्दल माझ्या मनात राग नाही. आश्चर्य मात्र आहे! अरे, हे असे होते तर ? तेव्हा कसे लक्षात आले नाही?
तेव्हा आणि नंतरसुद्धा बरीच वर्षे बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या नाहीत आणि आता? सबकुछ लुटाके होश में आये तो क्या किया?
खाजगी जीवनातील अत्यंत वैताग आणणाऱ्या गोष्टींमुळे मी १० वी पासूनच मानसिकदृष्ट्या पार असंतुलित झालो होतो. कसाबसा मॅट्रिक पास झालो. कॉलेजमधेही शिक्षणात माझे बिलकुल मन लागत नव्हते. शेवटी फायनल व पुरवणी परीक्षा असे दोनदा गचके खाऊन मी (कॉपी न करता आणि वशिला न लावता) तृतीय श्रेणीत बी. ए. पास झालो. त्याबद्दल आजही मला दुःख वा लाज वाटत नाही. माझे पुढे काय होणार होते, त्याची मला तेव्हाच थोडीशी कल्पना आलेली होती.
१९५५ साली कॉलेजातून बाहेर पडल्यानंतर मात्र माझे वाखे सुरू झाले. त्याचा तपशील येथे देण्याची गरज नाही.
या गावाहुन त्या गावी
गुंडाळुन गाशा
पाहत गेलो
"मी! मी!" चा फडतूस तमाशा
मोजत गेले आशेच्या मापात निराशा
माझे घर असून भणंगाचे जिणे सुरू झाले. कुठेच स्थिरावू शकलो नाही. बरोबरीचे लोक नोकरी वगैरे लागून आपापल्या बायकांसह मच्छरदाण्यांत निजू लागले. मला टाळू लागले. टाळण्यासाठी हजार बहाणे असतात. त्यांच्या दृष्टीने मी एक मच्छर होतो -- उपद्रवी! अपरंपार निराशा व कटुता माझ्या वाट्याला आली. ज्या समाजात मी जन्मलो, तो समाज -- ती समाजरचना कशी आहे, ह्याचा मला अनुभव येऊ लागला. तथाकथित सोबती (मित्र कशाला म्हणू?) कसे आहेत हे मला समजू लागले. पण पूर्ण समजले नाहीत !
एकेक सोबती मी निरखून पाहिला
एकेक चेहरा मी उलटून पाहिला
समाजाने माझ्यावर अदृश्य बहिष्कार घातला. मी समाजावर खुलेआम बहिष्कार घातला ! ही कटुता व ही चीड, ह्यामुळेच मी स्वतःवर--स्वतःच्या वागण्यावर कोणते बंधन घालून घेण्याचे नाकारले. गावात फक्त ३-४ घरे सोडून मी कुठेही अड्डा जमवीत नव्हतो. ते मला खपवून घेत होते म्हणूनच मी त्यांच्याकडे जात होतो. इतरांना मी जुमानतच नव्हतो. ज्यांनी मला जशी वागणूक दिली, त्याहूनही जास्त धारदार वागणूक मी त्यांना दिली--
त्यांनी हिशेब माझा केला हवा तसा
मीही हिशेब माझा चुकवून पाहिला
खरोखर ह्या जगात कवीचे मूल्यमापन तो किती चांगले लिहितो त्यावर होत नसून त्याच्या सामाजिक स्थानावर त्याचा दर्जा ठरविला जातो आणि जे शहाणे एक माणूस म्हणून त्या कवीचे मूल्यमापन करतात, ते स्वतः कसे असतात?