कवितेचा प्रवास-१
माझ्या आठवणीप्रमाणे मी १९४६ पासून काव्यलेखन करीत आहे. हे १९९० साल आहे! म्हणजे ४३ वर्षांपूर्वी माझा कवी म्हणून जन्म झाला. सध्या मला कवी म्हणून ४४ वे वर्ष लागले आहे. उणेपुरे अर्धशतक!
मी आता विचार करीत आहे की, मी काय कमावले? मी काय गमावले?काव्यलेखनास प्रारंभ करून ४३ वर्षे उलटून गेली याचा अर्थ असा थोडाच होती की मी फार मोठा कवी आहे! वयाचा आणि कवितेच्या मोठेपणाचा काहीही संबंध नसतो! कवितेच्या मोठेपणाचा संबंध माणसाशी असतो. जसा लिहिणारा माणूस , तशी त्याची कविता.
लिहिणारा माणूस कवितेत लपत नसतो. तो आपल्या कवितेत लपूच शकत नाही. कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरे ही दाखवते.
केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते.
मला हे कळते. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण मला हे जरा आधी कळले असते, तर किती बरे झाले असते.
माझा "रूपगंधा" हा पहिला काव्यसंग्रह १९६१ साली प्रसिद्ध झाला. त्यावेळी पहिला शासकीय पुरस्कार कविवर्य कुसुमाग्रजांना मिळाला. दुसरा शासकीय पुरस्कार मला व श्री. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना वाटून मिळाला.
तेव्हाच्या त्या काळात मला साहजिकच खूपखूप आनंद झाला. काही दिवस तर मी नुसता तरंगत होतो. शिवाय, नाकमावतेपणाच्या त्या अवस्थेत १९६१ साली ५०० रुपये म्हणजे काही थोडीथोडकी रक्कम नव्हती!
मग एका वर्षातच हळूच माझे पाय जमिनीला लागले! मला कळले की, अजूनही प्रवास संपलेला नाही. हा तर केवळ एक मुक्काम आहे -- शासकीय पुरस्कार हा मुक्काम नसून माझ्या काव्यलेखनाचच्या विकासाचा एकेक टप्पा म्हणजे मुक्काम..
सुरवातीच्या आदिम अवस्थेत मी किती हुरळून जायचो. जे लिहिले, त्यालाच मी "कविता समजायचो" आणि ज्यालात्याला मी माझी ताजी "कविता" दाखवत सुटायचो! वयाच्या १४ व्या वर्षापासून २१-२२ वर्षांचा होईपर्यंत माझी ही अवस्था होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर माणूस जेव्हा कुणाच्या प्रेमात पडतो, तेव्हा त्याला जी "थ्रिल" मिळते, तशीच "थ्रिल" नव्या कवीला ताज्या ताज्या "कविता" लिहिताना मिळत असते.
अगदी प्रारंभीच्या काळात "कविता" करताना मी अनेकदा संस्कृत प्रचुर भाषेचा उपयोग करीत असे.
उदाहरणार्थ:
केसरी पंजरात!
गर्जना भीषणा
दचकवी भिरु मना
आज निघत भाव शांत!
केसरी पंजरात!
तर हे असे केसरी, पंजर भीषणा, भिरू आणि तव, मम असे भीषण प्रकार सुरू होते. मी अगदी सुरुवातीपासूनच लिहितांना गुणगुणत वृत्तबद्ध लिहायचो. त्यामुळे मात्रापूर्ती करताना गे, च, अहो इत्यादी अनावश्यक शब्दांचा मी आधार घ्यायचो. पण माझे दुर्दैवच माझे सुदैव ठरले. मी जणू पागल झाल्यासारखा एकसारखा लिहित होतो. गंमत अशी की, या वयात मी स्वतःच्या लेखनावर फिदा असलो तरी माझी "कविता" कुठे तरी प्रसिद्ध करवून घेण्यासाठी जी हिंमत व चतुराई लागते, ती माझ्यात नव्हती. कधी चुकून हिंमत केलीच, तर माझ्या रचना "साभार" परत यायच्या!
माझ्या आठवणीप्रमाणे मी कॉलेजमधून बाहरे पडेपर्यंत (विदर्भ महाविद्यालय) कॉलेज मॅगझिनमध्ये (विदर्भ वाणी) माझ्या फक्त दोन रचना प्रसिद्ध झाल्या होत्या. आमचे मराठीचे प्राध्यापक कै. डॉ. ना. कृ. दिवाणजी मोटार अपघातात वारले त्यावेळी मी लिहिले होते--
आसवांवाचुनी काय आपुल्या हाती ?
क्षणभरात झाली देहाची हो माती !
लागली न मरणा तुझी मुळी चाहूल
दरवळे गंध ना तोच गळाले फूल
तेवती विझाली अवचित जीवनज्योती
आसवांवाचुनी काय आपुल्या हाती?
फर्स्ट इयरमध्ये लिहिलेली ही कविता माझ्या वयाच्या मानाने अगदी काही वाईट नव्हती. पण कवितेच्या मुखड्याच्या दुसऱ्या ओळीत मी पासंग म्हणून "हो" घुसडलाच.
अजून माझी एक विनोदी चूक. डॉ. दिवाणजी वारले, तेव्हा ते पन्नाशीच्या घरता होते, निदान ते १६ वर्षाच नव्हतेच! तरीही मी त्यांची तुलना उमलतानाच गळून पडणाऱ्या फुलाशी केली. असो. कविता तर झाली.
नंतर थर्ड इयरमध्ये "विदर्भवाणी"तच प्रसिद्ध झालेली माझी एक कविता मला थोडीशी आठवते--
लागतो न थोडा डोळ्याला ह्या डोळा
तव गीत-पैंजणे रुणझुणती गोपाळा
मोहरल्या राया नदी तिरी अमराया
तव वेणुसुधेची शांत पसरली माया
रे थांब, थरथरे करुणेने कृश काया !
वगैरे, वगैरे आणि वगैरे, वगैरे...
आता आला ना दोन ठिकाणी "तव"? एकदा ठीक. पण पुनः पुन्हा "तवतव" कशाला? विरहाने काया कृश वगैरे होते हे क्लासिकल ठीक. पण मध्येच विरहाऐवजी "करुणा" कशी आली? राधेला स्वतःचीच करुणा येत होती काय? "करुणा" हा शब्द अत्यंत चुकीचा पडला होता. शब्द मिळाले किंवा शब्दांचा भरपूर साठा आहे म्हणून कविता होत नसते. गोडाउन म्हणजे मंदिर नव्हे!