कैफियत-३


आता आपण गझलेच्या आकृतिबंधाविषयी विचार करू या.

गझलेच्या पहिल्या शेराला "मतला" म्हणतात. प्रत्येक शेरात दोन ओळी असतातच पण मतल्याच्या शेरात दोन्ही ओळीत यमक (काफ़िया) आणि अन्त्ययमक (रदीफ़) असते. उदाहरणार्थ-

राहिले रे अजून श्वास किती
जीवना ही तुझी मिजास किती

ह्या माझ्याच एका गझलेतील मतल्याच्या ह्या शेरात दोन्ही ओळीत "श्वास" आणि "मिजास" अशी यमके आहेत आणि "किती" हे अन्त्ययमक उर्फ रदीफ़ आहे. आणि एकच मात्रावृत्त आहे.

गझलेच्या पहिल्या शेरात म्हणजेच मतल्यात दोन्ही ओळीत यमक व अन्त्ययमक आलेले आहे. पण मतल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीत यमक आणि अन्त्ययमक येत असते. उदाहरणार्थ-

सोबतीला जरी तुझी छाया
मी करू पांगळा प्रवास किती?

मासला म्हणून आपण माझा एक मतला आणि त्यानंतरचा शेर पाहिला. ह्या दोन्ही शेरांत श्वास, मिजास आणि प्रवास अशी यमके आलेली आहेत. आता ह्याच गझलेतीत अजून एक शेर पाहू-

हे कसे प्रेम? या कशा आशा?
मी जपावे अजून भास किती?

म्हणजे येथे दुसऱ्या ओळीत "भास" हे यमक आणि "किती" हे अन्त्ययमक आलेले आहे. मतल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शेराच्या फक्त दुसऱ्या ओळीत यमक आणि अन्त्ययमक येत असते.

परंतु काही गझलांत अन्त्ययमक म्हणजेच रदीफ़ नसते. अशा गझलांना "गैर-मुरद्दफ़" म्हणतात. आता माझ्या एका गैर-मुरद्दफ़ गझलेचे काही शेर नमुन्यादाखल देतो-

दिवसाच चोरट्यांनो जाळू नका मशाली
अजुनी न सूर्य केला तुमच्या कुणी हवाली

माझे जगावयाचे अप्रूप एवढे की,
जमले मला बघाया मुडदेच भोवताली!

उरली विरंगुळ्याला ही सांजवेळ माझी
उरल्या तुझ्या जराशा प्राणात हालचाली!

येथे मतल्याच्या पहिल्या शेरात "मशाली" आणि "हवाली" ही दोन यमके दोइन्ही ओळीत आहेत. नंतरच्या शेरात फक्त दुसऱ्या ओळीत "भोवताली" आणि तिसऱ्या शेराच्या दुसऱ्या ओळीत "हालचाली" ही यमके आहेत. मात्र यमक आल्यानंतर अन्त्ययमक म्हणून कोणताही शब्द नाही.

शेरातील प्रत्येक ओळीला "मिसरा" म्हणतात. पहिल्या ओळीला "उला मिसरा" म्हणतात, तर दुसऱ्या ओळीला "सानी मिसरा" म्हणतात.

शेरात जे सांगायचे असते त्याची प्रस्तावना म्हणजे पहिली ओळ असते. तर दुसरी ओळ म्हणजे पहिल्या ओळीतील प्रस्तावनेचा उत्कट व प्रभावी समारोप असतो. म्हणून शेर लिहिताना दुसरी ओळ लिहिणे, हे अधिक जबाबदारीचे व अधिक अवघड काम असते. नुसते यमक, अन्त्ययमक आणि वृत्त साधून दुसरी ओळ जमत नसते, तर ती ओळ जे सांगायचे आहे त्याचा शेवट असल्यामुळे, तेवढ्याच ताकदीने पण सहज आली पाहिजे.

हे सर्व घडले तरच शेर "कामयाब" होतो!