कैफियत-२
गझल म्हणजे काय?
एकाच वृत्तातील, एकच यमक (काफिया) व अन्त्ययमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी २-२ ओळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल.
गझलेमधील ह्या प्रत्येक दोन ओळींच्या कवितेला आपण "शेर" म्हणतो. कुणी शेराला "द्विपदी" म्हणतात. गझलेतील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र व सार्वभौम कविताच असते.
नेहमीची कविता सलग असते. ती उलगडत जाते. पण गझल उलगडत नसते. एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात किंवा एकच संवेदना, एकच भाव किंवा एकच मूड असलेले सर्वच्या सर्व शेर असू शकतात.
मात्र गझलेतून कोणताही शेर बाहेर वेगळा काढून त्याचे चिंतन केले, तर मागचा पुढचा कोणताही संदर्भ नसूनही तो शेर म्हणजे एक संपूर्ण अभिव्यक्ती, एक वेगळी कविताच असल्याचे आढळून येते. गझलेच्या फॊर्ममधे उलगडत जाणारी सलग कविता लिहिली जाऊ शकते; पण कविताच, गझल नव्हे! उर्दूत अशा कितीतरी कविता आहेत. गझलेचे खरे गमक हेच आहे की, सुटा शेरही एक पूर्ण कविताच असतो.
म्हणजे नेहमीची कविता आणि गझल ह्यात -
१) अनेक कवितांची एकाच फॊर्ममध्ये किंवा आकृतिबंधात बांधणी किंवा मांडणी आणि
२) प्रत्येक शेराचे कविता म्हणून स्वतःचे सार्वभौमत्व.
हे दोन महत्त्वाचे व मूलभूत फरक असतात.
रसिकांनी प्रत्येक शेराचा स्वतंत्र आनंद घ्यायचा असतो, प्रत्येक शेराची वेगळी चव स्वतंत्रपणे घ्यायची असते. आणि प्रत्येक शेराचे स्वतंत्र रसग्रहण व चिंतन करायचे असते. गझल लिहिणाऱ्याची हीच अपेक्षा असते.
"एकाच गझलेतून विविध विषय हाताळले जाऊ शकतात. त्यामुळे सलगता राहत नाही, प्रवाह खंडित होतो आणि रसभंग होतो" असा एक आक्षेप घेतला जातो.
ह्याविषयी आदरणीय श्री. सेतुमाधवरावजी पगडी म्हणतात - "याला उत्तर हेच की, गझलमधील प्रत्येक शेर स्वतंत्र समजून त्याचे रसग्रहण करावे. मुशाइऱ्यांतून अशा प्रकारे रसग्रहण केले जाते. एक कल्पना एकाच शेरमधून मांडण्याचे आणि ती यशस्वीपणे मांडण्याचे कौशल्य हे उर्दूत उत्तम काव्याचे गमक आहे. ट ला ट जोडून शेर रचणारे कवी असंख्य आहेत. उर्दूत तर त्यांचे पेवच फुटले आहे. पण अर्थपूर्ण, प्रभावी आणि परिणामकारक रचना आणि तीही दोन ओळीत करणे अत्यंत अवघड आहे." (उर्दू काव्याचा परिचय: पान २८०) - आणि हे अत्यंत अवघड आहे.
म्हणूनच यशवी म्हणजेच अर्थपूर्ण, प्रभावी, परिणामकारक व ताकदीचे शेर असलेली गझल एक कायदा म्हणूनच कविसंमेलनात आणि छापील स्वरूपातही हटकून बाजी मारून जाते.
हे असे आहे म्हणूनच आज गझलेवर काही गोटांतून "सौंदर्यशास्त्रीय" आक्षेप घेतले जात आहेत. हे युगसत्य मराठी रसिकांनी, गझल लिहिणाऱ्यांनी आणि मी ज्यांच्यासाठी गझल लिहीत आहे त्या स्वच्छ मनाच्या आजच्या व उद्याच्या तरुण पिढीने लक्षात घेतले पाहिजे.