भटसाहेब १


`एखादा होतकरू गझलकार आढळला तर मला लॉटरी लागल्यासारखा आनंद होतो`, असे म्हणणारा कवी आपले सारे आयुष्य केवळ कवितेसाठी, गझलेसाठीच जगला असणार, हे पुन्हा निराळे सांगायची आवश्यकता नाही...महाराष्ट्र साहित्य परिषदेने `मराठी गझल` या विषयावर १९८६ साली विशेषांक काढला होता. त्या विशेषांकात कविवर्य सुऱेश भट यांची प्रमुख आणि प्रदीर्घ मुलाखत होती. हा अंक निघण्याआधीच मी `एल्गार`ची पारायणे केलेली होती. त्या काळी गझल हा शब्द कुठेही दिसू द्या; मी अधाश्यासारखा तो मजकूर वाचून काढीत असे. साहजिकच मी तो गझल विशेषांक विकत घेतला आणि वाचून काढला. वर उल्लेख केलेले वाक्य या अंकातील भटसाहेबांच्या मुलाखतीतच होते. याच वाक्याचा आधार घेऊन मी त्यांना पत्र लिहिले. १९८८ साली.  नागपूरच्या पत्त्यावर. `मीही वृत्तबद्ध कविता करतो; `गझला (!)`ही लिहितो आणि आपली भेट घ्यायची इच्छा आहे`, असा काहीसा तो मजकूर होता. माझ्या या पत्राला भटसाहेबांचे लगेचच उत्तर आले. तीन-चार दिवसांत. (त्यांचे लेटरहेड माझ्या आजही लक्षात आहे. स्वतः भटसाहेबांचा हसरा चेहरा पुसटशा बाह्यरेषेने चितारलेला त्यावर छापलेला होता. वर ठळक अक्षरात, लाल शाईत, सुरेश भट हे दोन शब्द आणि मग खाली पत्ता...)
त्या पत्रात भटसाहेबांनी लिहिले होते की, `मी पुढील आठवड्यातच पुण्यात मुक्कामी येत आहे. मला पंतांच्या गोटात येऊन भेटा.` झाले.  एकतर पत्राचे उत्तर इतक्या लवकर येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते आणि त्यात पुन्हा इतक्या लवकर आपल्या आवडत्या कवीची प्रत्यक्ष भेट होईल, ही गोष्टही कल्पनातीत होती.  त्यांनी पत्रात सांगितलेल्या तारखेनुसार पंतांच्या गोटात सकाळी ठरल्या वेळी मी गेलो. बिचकत बिचकत शिरलो घरात. पोरसवदा तर होतो त्या वेळी !
भटसाहेब समोरच उभे होते. मी त्यांना लगेचच ओळखले. ते समोर दिसत असूनही काहीतरी विचारायचे म्हणून मी त्यांनाच विचारले,  `हे कवी सुरेश भट यांचंच घर आहे ना ?`...त्यांनी डोळे किलकिले केले आणि माझ्याकडे पाहत म्हणाले, `होय. मीच सुऱेश भट. आपण ?` मी सगळी `पत्रकथा` सांगितली...अर्ध्यातच थांबवून समोरच्या खोलीकडे हात दाखवीत ते म्हणाले, `हां...हां...आलं लक्षात. बसा आपण तिकडे` (मला - एवढ्याशा मुलाला - ते आपण-तुपण करत होते, हे पाहून हसू येत होते...पण अर्थातच मी ते दाबले !)
मी बसलो होतो त्या ठिकाणी भटसाहेब हातातलं काम उरकल्यानंतर आले. माझ्या शेजारीच कॉटवर बसले आणि म्हणाले, ``आपण कुलकर्णी ना ! आपलं हस्ताक्षर खूपच छान आहे. शिवाय सहसा कुणाकडं नसणारी आणखीही एक गोष्ट आपल्याकडं आहे...ती म्हणजे  शुद्धलेखन.  अक्षरही चांगलं आणि शुद्धलेखनही उत्तम असणारे तुम्ही माझ्या कामाचे माणूस आहात. माझा नवा काव्यसंग्रह (झंझावात) लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्याची `प्रेस कॉपी मला करवून घ्यायची आहे. हे काम तुम्ही करू शकाल काय ?  सकाळी तुमचं कॉलेज वगैरे उरकल्यावर संध्याकाळी येत जा माझ्याकडे...``
एव्हाना माझी स्थिती `आंधळं मागतंय एक...` अशी होऊन गेली. मी लागलीच `हो` म्हटलं आणि दुसऱ्या दिवशीपासून संध्याकाळी पंतांच्या गोटात जाऊ लागलो...त्यांच्या नव्या गझलांच्या वेगवेगळ्या वह्या आणि त्यासोबतच एक मोठ्या आकाराच्या पानांची कोरी वही, असा ऐवज त्यांनी माझ्या हवाली केला आणि म्हणाले, ``हं..करा आता सुरू...पहिलं एक पान कोरं सोडा आणि पुढच्या पानावर लिहायला लागा...पहिली गझल लिहून झाली की मला दाखवा...``(दरम्यानच्या काळात मित्र, चाहते, नवकवी आदींचा ओघ त्यांच्याकडे सुरू झाला होता. गप्पांचा फड हळूहळू रंगणार, असं दिसत होतं...). अक्षर बरं असूनही मी अधिकाधिक कोरून कोरून लिहू लागलो आणि एक गझल लिहायला बक्कळ २०-२५ मिनिटे लावली...अधूनमधून भटसाहेब डोकावत होतेच. `अक्षर एवढं कोरून काढायची आवश्यकता नाही,` अशी सूचनाही मला देऊन झाली होती ! गझल लिहून झाली. त्यांना दाखविली. पसंतिदर्शक मान त्यांनी हलवली आणि अशाच सर्व गझला लिहून काढा, असे सांगून ते पुन्हा गप्पांच्या मैफलीत रंगून गेले...
गझला उतरवून काढायचे हे काम मला अनेक महिने पुरले...त्याच काळात माझी, माझ्या कुटुंबीयांची आपुलकीने चौकशी ते करीत असत. बघता बघता माझं वय विसरून ते माझ्याशी जणू काही एखाद्या मित्राप्रमाणे गप्पा करू लागले. अर्थात, मी केवळ श्रवणभक्तीच करीत असे, हे काही सांगायला नको. काही बोलायची हिंमतच होत नसे. फक्त गझला नकलताना ज्या काही शंका येत असत, तेवढ्यापुरताच मी बोलत असे. नवोदित कवींवर मनापासून माया करणारा, त्यांच्या काव्यलेखनाची आत्मीयतेने चौकशी करणारा- आणि तीही सातत्याने करणारा- हा कवी आहे, एवढी एक गोष्ट मला त्या काळात ठळकपणे जाणवत गेली...
भटसाहेबांची आणि माझी ओळख ही अशी झाली. १९८८ पासून ते त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत म्हणजे २००३ पर्यंत मला त्यांचा अम्लान स्नेह मिळाला. पुण्यात ते ज्या ज्या वेळी येत, त्या त्या वेळी त्यांना भेटायला जायचे, हा माझा परिपाठ मग ठरूनच गेलेला होता. गझलेच्या माहितीच्या दृष्टीने त्यांची प्रत्येकच भेट मला समृद्ध करून गेली. त्यांच्या बोलण्यातून, गप्पांमधून बरेच काही शिकत गेलो मी.  पण मी जे काही त्या वेळी लिहायचो, ते त्यांना दाखवायचे धाडस मात्र माझे होत नसे...ते कधी कधी म्हणायचे, अरे, ऐकव की, तू काय लिहिलेस ते... बघू काय आणि कसा लिहितोस ते...` (एव्हाना `आपण`, `तुम्ही`वरून संबोधन `तू`वर आलेले होते ! आणि त्यामुळे मलाही खूपच हायसे वाटत होते. )मग मोठ्या मुश्किलीने दोन-तीन शेर ऐकवायचो...एखादा शेर सपाट असेल तर ते तसेही सांगायचे...`तू गझल लिहीत आहेस....भाषण नव्हे; भाषणासारखा शेर अजिबात लिहू नकोस...शेर कसा संवादी, प्रवाही असायला हवा...`
एखादा शेर आवडला तर ते अशी काही मनापासून दाद द्यायचे की बस्स. `शाहकार` (त्यांचा आवडता शब्द !) झालाय हा शेर, असं म्हणायचे. आपली सगळीच गझल `शाहकार` व्हायला हवी...त्यादृष्टीनेच गझलकाराने लिहायला हवे...गझललेखनातील अशी एखादी खुबी ते  गप्पांच्या ओघात सहजपणे सांगून जायचे...
त्यांची एखादी गझल पुण्यातील मुक्कामात अपूर्ण राहिलेली आणि पुढच्या कुठल्या तरी गावात (गझलपठणासाठी त्यांचा राज्यात सगळीकडे संचार असे) मुक्कामात पूर्ण झाली तर पोस्टकार्ड पाठवून लगेच कळवायचे...अमूक अमूक गझल पूर्ण झाली...इतके-इतके (शेरांची संख्या) शेर. मला या गोष्टीचे कोण अप्रूप वाटायचे ! एवढा मोठा कवी आणि त्याची गझल पूर्ण झाली की आपल्याला पत्रांतून कळवतो...मी हरखून जायचो...(`मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते` आणि `रुणझुणत राहिलो, किणकिणत राहिलो` या गझला मला यासंदर्भात आठवतात...) भटसाहेबांचा नव्या कवींशी अफाट म्हणजे अफाटच पत्रव्यवहार होता...त्यांनी पाठविलेली पत्रही कशी ? तर जणू अक्षरांची रंगपंचमीच ! लाल, हिरवी, निळी, जांभळी, गुलाबी...अशी वेगवेगळ्या शायांमध्ये लिहिलेली असायची ही पत्रं...महत्त्वाचा मुद्दा वेगळ्या शाईनेच ठळक करायचे. सुटसुटीत, मुद्देसूद, विचारांचा कुठलाही गोंधळ नसलेली ही पत्रे वाचणे म्हणजे अवर्णनीय आनंदाचा भाग असे.
Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

मस्त लेख आहे हा.

अप्रतिम लेख...
थेट भिडणारा..
नशीबवान आहात प्रदीपजी, दोन कारणांसाठी - पहिलं, भटसाहेबांचा तब्बल चौदा वर्षे सहवास लाभला. आणि दुसरं, त्या भावना तितक्याच समर्थपणे लिहीण्याची शब्दसंपदा आणि शैली लाभली आहे..
अभिनंदन!!