जन्मले घेऊन जे पायात काटा
त्या भणंगांनीच यात्रेला निघावे
फलाट

रान या मनात गच्च, दाट पाहिजे !
मात्र त्यात एक चोरवाट पाहिजे !
हेच स्वप्न रात्र रोज रोज पाहते...
व्हायला अता तरी पहाट पाहिजे !
पाहिजे स्वतःस नाव कोणते तरी...
कोणता तरी जिण्यास घाट पाहिजे !
गुंतलास काय कौतुकात एवढा ?
रोज का तुला नवीन भाट पाहिजे ?
मागतो तुला कुठे समुद्र मी तुझा ?
फक्त एक मत्त, धुंद लाट पाहिजे !
व्यक्त व्हायला जमो; जमो न, शेवटी -
कल्पना तरी तुझी विराट पाहिजे !
मी न येथला; मला निघून जायचे...
जीवना, जरा तुझा फलाट पाहिजे !
-- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.

प्रतिसाद
व्वा.
शेवटची ओळ... जीवना जरा तुझा फलाट पाहिजे. सुंदर.
'भेटला हा जन्म चकव्यासारखा'ची आठवण झाली.
वा वा... रान
वा वा...
रान या मनात गच्च, दाट पाहिजे !
मात्र त्यात एक चोरवाट पाहिजे !
फार सुंदर शेर आहे.
तसेच भाट, फलाट अन विराट शेर ताकदवान आहेत.
विराट..
व्यक्त व्हायला जमो; जमो न, शेवटी -
कल्पना तरी तुझी विराट पाहिजे...
व्वा..
क्या बात है!
अख्खी गझल आवडली! त्यातही चोरवाट आणि फलाट तर अप्रतिम...