हे तेच ते दिनरात..

हे तेच ते दिनरात...मी वैतागलो
नाही बदल त्यांच्यात...मी वैतागलो

जी पाहिजे ती चीज नाही गवसली
हिंडून बाजारात मी वैतागलो

ती मीलने, ती चुंबने, आलिंगने
सारेच हे स्वप्नात !...(मी वैतागलो)

घे आत किंवा सुचव ना जाण्यास तू
थांबू किती दारात ? मी वैतागलो

ही रोजची गर्दी नि घाई रोजची
हे रोजचे अपघात....मी वैतागलो

किटकीट पत्नीची नि पोरांचे रडे --
-- माझ्याच संसारात मी वैतागलो !

गझल: 

प्रतिसाद

गझल आवडली. चांगली झाली आहे.

हे तेच ते दिनरात...मी वैतागलो
नाही बदल त्यांच्यात...मी वैतागलो

जी पाहिजे ती चीज नाही गवसली
हिंडून बाजारात मी वैतागलो

ही रोजची गर्दी नि घाई रोजची
हे रोजचे अपघात....मी वैतागलो

हे शेर विशेष.

वा ! रदीफ चांगला निभावला आहे केदार. घाई गर्दी विशेष. ह्या शेराचा लहजा पण छान आला आहे.

किटकीट .. अं . .. चांगला होवू शकला असता असे वाटले. शुभेच्छा

जी पाहिजे ती चीज नाही गवसली
:-)

केदार,

यावेळेसची गझल विशेष वाटली नाही. क्षमस्व!

( मित्रांनाच असे स्पष्ट प्रतिसाद देणे शक्य असते.)

केदार,
ही गझल प्रत्यक्ष तुझ्या तोंडून ऐकण्याचा योग आला होता. (बराच वेळ घेतलास प्रकाशित करायला!)

घे आत किंवा सुचव ना जाण्यास तू
थांबू किती दारात ? मी वैतागलो

'वैताग' चांगला व्यक्त झालाय.

जी पाहिजे ती "चीज" नाही गवसली
हिंडून बाजारात मी वैतागलो
थांबू किती दारात ? मी वैतागलो

छान. सुन्दर!
कलोअ
चूभूद्याघ्या

चित्त, वैभव, भूषण, ज्ञानेश, अजय..धन्यवाद.

वैभव,
त्या शेराबाबत सहमत.

भूषण,
आवड निवड या वैयक्तिक बाबी. प्रत्येकाला मतस्वातंत्र्य. ये बात अपनी तबियत की बात होती है...

ज्ञानेश,
अजून काही शेर होतील का, पाहात होतो. थोडा वेळ लागेल असे लक्षात आले. झालेले शेर प्रकाशित केले.

.केदार पाटणकर

वेगळा रदीफ, केदारजी गझल आवडली.

मतल्याने
अंतरात उठती लाटांवरती लाटा...
(आयुष्य असे का संथ वाहते आहे?)

ह्या माझ्या एका द्विपदीची आठवण करून दिली. अर्थात दोन्ही द्विपदी अगदी वेगळ्या आहेत. गझल चांगली जमली आहे.

आक्रोश आत्म्यांचा इथे मी ऐकतो
"राहून या शरिरात मी वैतागलो!!"

.केदार पाटणकर

आक्रोश आत्म्यांचा इथे मी ऐकतो
"राहून या शरिरात मी वैतागलो!!"

छान. "राहून या देहात मी वैतागलो!!" असेही चालून जाईल. तसेच, एकापेक्षा अनेक आत्मे आहेत असे म्हणायचे आहे काय?

चित्तरंजन,

तू म्हणतोस ते बरोबर आहे.

देहात हा शब्द योग्य आहे. साहित्यात

आत्मा-देह

अशीच द्वयी वापरली जाते.

एकवचनच वापरायचे होते. चुकून अनुस्वार पडला.