एकटाच मी !




नाही कुणीच आसपास...एकटाच मी !
वाटे किती किती उदास...एकटाच मी !


मागे-पुढे कुणी न सोबतीसही कुणी...
माझा सुना सुना प्रवास...एकटाच मी !


माझी कुठेतरी असेल सावली इथे...
शोधा, करा करा तपास...एकटाच मी !!


माझ्या मनात बाग एक रोज बहरते...
हे माळरान...अन् भकास एकटाच मी  !


माझ्याच आठवांत दंग दंग मी असा...
माझेच सोबतीस भास...एकटाच मी !


होतो भ्रमात... मी नसेन एकटा कधी -
झाला अता पुरा निरास...एकटाच मी  !


येऊ नका कुणीच भेटण्यासही मला...
देऊ नका उगीच त्रास...एकटाच मी !


नाही मला कुणीच सोबती-सवंगडी
आहे तुझा खरा कयास...एकटाच मी !


नाही कधीच त्या फुलास मी विचारले...
देशील का मला सुवास...एकटाच मी  !




गझल: 

प्रतिसाद

येऊ नका कुणीच भेटण्यासही मला...
देऊ नका उगीच त्रास...एकटाच मी !
छान...!
माझ्या मनात बाग एक रोज बहरते...
हे माळरान...अन् भकास एकटा मी  !

मागे-पुढे कुणी न सोबतीसही कुणी...
माझा सुना सुना प्रवास...एकटाच मी !
....सुंदर शेर आहे

होतो भ्रमात... मी नसेन एकटा कधी -
झाला अता पुरा निरास...एकटाच मी  !
खूप आवडला.

प्रदीप,
गझल आवडली. रदीफ वेगळी आहे, तुम्ही सुंदर वापरली आहे. तुमची वृत्तही चाकोरीबाहेरची असतात. मजा येते.
माझी कुठेतरी असेल सावली इथे...
शोधा, करा करा तपास...एकटाच मी !!
- वा!
'कयास'चा शेरही आवडला.
- कुमार

प्रदीपराव,
सुंदर ग़ज़ल! आपण वेगवेगळी वृत्ते वापरता ते खूप आवडते.

आवडली गझल..
माझ्या मनात बाग एक रोज बहरते...
हे माळरान...अन् भकास एकटाच मी  !
हे विशेष!!
-आपला आभाळ :)

कुमार जावडेकरांपेक्षा वेगळे नाही. मस्त गझल आहे.

सावलीचा शेर आवडला. वृत्त सुरेख आहे:)

तपास आणि सुवास विशेष आवडले!
-- पुलस्ति.

क्या बात है!! बहोत खूब. संपूर्ण गझल आवडली. फार सुंदर गझल.
होतो भ्रमात... मी नसेन एकटा कधी -
झाला अता पुरा निरास...एकटाच मी  !

अप्रतिम.... फार सुंदर
----अगस्ती
 

 

दाद-प्रतिसाद दिलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार...धन्यवाद !

गझलकट्ट्याचे वाचले असेलच, 
जरूर यावे २ जून ६ वा गांधी भवन.

छान