रसायन !





रसायन

!

उघडून ठेव दारे तूही तुझ्या मनाची

...!
मीही पुरी तयारी केली पलायनाची !

बहरे कुणाकुणाचे

...कोमेजते कुणाचे...
इतकीच ही कहाणी प्रत्येक यौवनाची !

स्वप्ने कणाकणाची आली फुलून हिरवी

-
मातीस लागता या चाहूलही घनाची !

इतके अनोळखी का झाले परस्परांना

?
हृदयास या पटेना का खूण स्पंदनाची ?

मी ऐकले असे की, घनदाट खूप आहे -
मज वाट सापडेना माझ्यातल्या वनाची !!


नाही

; नसो, मनाची नसते बऱ्याच वेळा -
आहे कुणास कोठे थोडी तरी जनाची !

तू बंधनांविनाही आहेस बांधलेला

...
आता कशास भीती कुठल्याच बंधनाची !

वस्तीत माणसे या आहेत सभ्य काही

-
झाडे चुकून काही आहेत चंदनाची !

अस्वस्थता मनाची थांबूनही न थांबे

...
मेंदूत वाढ झाली कुठल्या रसायनाची ?

प्रदीप कुलकर्णी




गझल: 

प्रतिसाद

सुंदर गझल

अप्रतिम शेर ,
अस्वस्थता मनाची थांबूनही न थांबे...
मेंदूत वाढ झाली कुठल्या रसायनाची ? 
   आआअ
 


यौवनाची कहाणी मस्त आहे! माझ्यातली वाटही आवडली.  चंदनाची झाडे चा शेर खास आवडला. घनाची चाहूल वारा शेर मात्र सरळमार्गी  वाटला :)

कुलकर्णीशेठ,
एकदम झकास गझल..इतक्या दिग्ग्जांनी अभिप्राय दिल्यावर म्या सुमारने तो काय अभिप्राय द्यावा. पण सवयी प्रमाणे एक विडंबन जरूर पाडले..ह्या स्थाळावर ते प्रकाशित करता येत नाही ह्याचे वाईट वाटले.. ते विडंबन तुम्ही इथे वाचा
केशवसुमार.
 

 वा.. वा...केशवसुमार, तुम्ही आमच्या रसायनात  तुमचे वि़डंबन मिसळून जे नवे रसायन  तयार केले, ते फारच आवडले...झकास..! नशा आली...आपलं मजा आली...!!!

वा..वा...केशवसुमार...
तुम्ही नाते  या (आमच्या वेड्यावाकुड्या) गझलेचे जे विडंबन केले आहे, तेही आवडले....छान...! रसायनच्या विडंबनाबद्दल तर मागेच लिहिले आहे...! भेटू पुन्हा...

क्या बात है ! सही ग़ज़ल. सर्व शेर आवडलेत त्यामुळे एखाद्या शेराचा वेगळा उल्लेख करत नाही.
कुलकर्णी, तुम्ही फारच छान आणि सफाईदार लिहिता.
आपला,
(चाहता) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

ग़ज़ल खूप आवडली. गझलेचे तांत्रिक ज्ञान शून्य आहे. पण तुमच्या गझला/कविता फार आवडतात.

आपला,
(गझलनिरक्षर) आजानुकर्ण


उघडून ठेव दारे तूही तुझ्या मनाची...!
मीही पुरी तयारी केली पलायनाची !


तू बंधनांविनाही आहेस बांधलेला...
आता कशास भीती कुठल्याच बंधनाची !हे दोन शेर फार आवडले.आपला,
(निवडक) आजानुकर्ण