भाव
तुझ्या डोळ्यांतले जे भाव होते
कुणाच्या काळजावर घाव होते?
इथे काटेच आता सोबतीला,
[फुलांसाठी कधी हे गाव होते ]
तुझा रुसवा, तुझे फसवे उसासे,
मला रोखायचे ते डाव होते
तुझ्या ओठांत माझे गीत होते,
तुझ्या गीतात माझे नाव होते
कधी सत्यात ते दिसलेच नाही
तुझ्या स्वप्नातले जे गाव होते
मनापासून मी होते तुझी का?
अखेरीला मनी हे भाव होते!
गझल:
प्रतिसाद
आनंदयात्री
बुध, 27/05/2009 - 14:39
Permalink
मनापासून
मनापासून मी होते तुझी का?
अखेरीला मनी हे भाव होते!
सुंदर...
तुझा रुसवा, तुझे फसवे उसासे,
मला रोखायाचे ते डाव होते
छान...
'रोखायचे' हवंय... वृत्तासाठी...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!
क्रान्ति
बुध, 27/05/2009 - 18:40
Permalink
धन्यवाद
खरंच, रोखायचे टंकायचं होतं, चुकून एक काना जास्त झाला! संपादन कसं करतात?
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}
मानस६
बुध, 27/05/2009 - 19:27
Permalink
मला रोखायाचे ते डाव होते
तुझा रुसवा, तुझे फसवे उसासे,
मला रोखायाचे ते डाव होते... वा वा!
-मानस६
चित्तरंजन भट
गुरु, 28/05/2009 - 17:42
Permalink
छान
गझल एकंदर छान आहे.
फुलांसाठी कधी हे गाव होते
मनापासून मी होते तुझी का?
ह्या सुट्या ओळी फार आवडल्या. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आणखी बारीक आणि थोडा अधिक ताजा विचार मांडता आल्यास उत्तम असे मला वाटते. चूभूद्याघ्या.
दशरथयादव
गुरु, 28/05/2009 - 21:24
Permalink
छान ..... कधी
छान .....
कधी सत्यात ते दिसलेच नाही
तुझ्या स्वप्नातले जे गाव होते
मनापासून मी होते तुझी का?
अखेरीला मनी हे भाव होते!
प्रसाद लिमये
शुक्र, 29/05/2009 - 18:42
Permalink
सुरेख
तुझ्या डोळ्यांतले जे भाव होते
कुणाच्या काळजावर घाव होते?
तुझ्या ओठांत माझे गीत होते,
तुझ्या गीतात माझे नाव होते
हे दोन शेर जास्त आवडले
ज्ञानेश.
बुध, 03/06/2009 - 12:54
Permalink
सुंदर.
छान आहे गझल.
शेवटचे तीन शेर फार आवडले.
जयश्री अंबासकर
मंगळ, 09/06/2009 - 13:30
Permalink
क्रान्ति....
क्रान्ति....मस्तच :) पहिले तीन शेर फारच आवडले :)