'....राहू दे मला माझा !!'


'....राहू दे मला माझा !!'


तुला घे चांदणे...अंधार राहू दे मला माझा !
तुला घे फूल...हा अंगार राहू दे मला माझा !


प्रपंचाला तुझ्या येवो सुखांची रेशमी शोभा...
व्यथांचा फाटका संसार राहू दे मला माझा !


तुला जो पाहिजे होता, दिला तो सूर मी दुनिये...
अता हा आतला गंधार राहू दे मला माझा !


पुन्हा मी छेडला जाईन की नाही; कसे सांगू...?
अखेरीचाच हा झंकार राहू दे मला माझा !


कसाही का असेना...चेहरा माझा स्वत:चा हा - 
असो वंगाळ की भंगार...राहू दे मला माझा !


मला माझाच राहू दे तुझी सोसायला दु:खे -
तुझ्या दु:खांत अपरंपार राहू दे मला माझा !!


कशी कोठून आणू सभ्यता मी बेगडी, खोटी...?
जरी हा रानटी संस्कार...! राहू दे मला माझा !

खुळी स्वप्ने, शिळी दु:खे, फिक्या आशा, मुके अश्रू...
तुझा नाहीच...हा संभार राहू दे मला माझा !


कुणाचा रंग का घेऊ ? कुणाला रूप का मागू ?
विनंती हीच वारंवार - 'राहू दे मला माझा !!'


 


गझल: 

प्रतिसाद

वा प्रदीपराव!''राहू दे मला माझा !' असा मोठा आणि वेगळा रदीफ फार छान निभावला आहे.
कुणाचा रंग का घेऊ ? कुणाला रूप का मागू ?
विनंती हीच वारंवार - 'राहू दे मला माझा !!'
शेवटचा शेर सर्वाधिक आवडला.

"वारंवार", "आतला गंधार", "अखेरीचाच हा झंकार", "अपरंपार" आवडले.

प्रदीप,
सुंदर गझल... रदीफ अप्रतिम आहेच. सगळे शेर सुंदर आहेत. मतला, संसार, संस्कार या कल्पना विशेष आवडल्या.
प्रपंचाला तुझ्या येवो सुखांची रेशमी शोभा... वा!
मक्ताही आवडला...
- कुमार

अतिशय सुंदर!

व्यथांचा संसार, संस्कार आणि वारंवार - हे शेर अगदी भिडले!
-- पुलस्ति.

 मला संभार हा शेर सर्वात आवडला.
बाकी छानच आहेत.

वा!
झंकार, गंधार आणि विनंती वारंवार हे तिन्ही शेर अतिशय आवडले. सगळी गझलच सुरेख आहे यात शंका नाही.

खरंच, सगळी गझल सुंदर आहे, गंधार खूपच भावला.

सुंदर गझल. सगळेच शेर आवडले.

'आजचा सकाळमधला लेखही उत्तम आहे. क्रमशः असल्याने वाट पाहावी लागणार असे दिसते.'

धन्यवाद!

खुळी स्वप्ने, शिळी दु:खे, फिक्या आशा, मुके अश्रू...
'संभार' जो तुझा नाही.
क्या बात है !
अप्रतिम शब्दरचना.

वा ! ब-याच दिवसांनी प्रदीपची गझल वाचायला मिळाली.

अपरंपार , संभार , संस्कार सुरेख आले आहेत. (अपरंपार शेरामधे दु:खाचे विशेषण (अपरंपार) नंतर आल्याने अडखळत राहिलो. अर्थात वृत्त वगैरे बंधने आल्यानंतर हे होणारच पण एकंदरच यतीमुळे इत्यादी .. अपरंपार राहू दे मला माझा असे वाचले जाते आहे )

बाकी छानच.

शुभेच्छा

अप्रतिम .......!!
संपूर्ण गझलच आवडेश :)

प्रपंचाला तुझ्या येवो सुखांची रेशमी शोभा...
व्यथांचा फाटका संसार राहू दे मला माझा !

प्रदिपजी, सुरेख गझल. हि कशी सुटली कळेना.

खुप आवडली. असो वन्गाळ की भंगार.. हे तर फार फार आवडले. जवळची भाषा वाटली.