मी बोचलो म्हणाले

मी बोचलो म्हणाले
मी बोचलो म्हणाले त्यांना -  किती ठिकाणी
हेही खरेच, माझी नाही  मिठास वाणी

घडणार काय त्याचा आहे कुणास पत्ता?
आत्ता मनात आहे तर घे छळून राणी

अडवून त्यास धरले होते दगडविटांनी
शोधून वाट त्याची गेले निघून पाणी

 शिस्तीत राहुनी मी बेशिस्त वागणारा
 होतो उशीर तेव्हा रचतो नवी  कहाणी

 इच्छा असेल तेव्हा  भेटावयास ये तू
 शोधू नको बहाणे, ठेवू नको निशाणी!

  तारा तिच्या मनाच्या झंकारल्या कशाने?
 असते खुषीत ती अन लिहिते सुरेल गाणी

- सोनाली जोशी

(सुरेश भट यांच्या 'कहाणी' या  गझलेच्या जमिनीवर)

प्रतिसाद

अडवून त्यास धरले होते दगडविटांनी
शोधून वाट त्याची गेले निघून पाणी... वा ..


शिस्तीत राहुनी मी बेशिस्त वागणारा
होतो उशीर तेव्हा रचतो नवी  कहाणी .. सुरेख्..जीवनातील वास्तवतेच्या खूप जवळ
मतला अधिक प्रभावी करता येईल का?
                       -मानस६




चांगली रचना! तिलकधारी समाधानी झाला.

गझल आवडली, आणि हे शेर फार आवडले...
इच्छा असेल तेव्हा  भेटावयास ये तू
शोधू नको बहाणे, ठेवू नको निशाणी!

तारा तिच्या मनाच्या झंकारल्या कशाने?
असते खुषीत ती अन लिहिते सुरेल गाणी (वाह!! फारच आवडला शेर..)

सुरेख....... सगळे शेर आवडले

गेले निघून पाणी - फारच सुंदर ओळ

अडवून त्यास धरले होते दगडविटांनी
शोधून वाट त्याची गेले निघून पाणी... वा ..

गझल वाचणार्‍या, प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे आभार.
सोनाली

सोनाली,

सुरेखच गझल आहे.

फार आवडली.


गेले निघून पाणी..
खूप छान शेर आहे.

हा शेर फारच आवडला!
इतरही छान...

इच्छा असेल तेव्हा  भेटावयास ये तू
 शोधू नको बहाणे, ठेवू नको निशाणी!
 वा!