गझल अणि गझलियत

गझल आणि गझलियत याविषयी सर्वांकडूनच चर्चा अपेक्षित आहे. (खालील सर्वप्रश्न गझलमंत्र या विभागाशी निगडीत आहेत. त्यामुळे कृपया तंत्राबाबत चर्चा नको.)


याबाबतीत पडणारे काही प्रश्न असे :-
१.  गझल म्हणजे काय? या शब्दाचा नेमका अर्थ आणि याचा उगम. (गझलेच्या बाराखडीत हे पूर्णपणे स्पष्ट नाही. (किंवा मला समजले नाही.))


२. गझलेमध्ये कोणते विषय यावेत किंवा कोणते येवू नयेत? (या संबंधी अनेकांची भिन्न मते आहेत म्हणून हा प्रश्न.)


३. गझलेत अमकेच विषय यावेत असे कुठे लिहून ठेवले आहे का? असेल तर त्याचा संदर्भ द्यावा. (या संकेतस्थळावर अनेक जण केवळ 'असे असावे - असे नसावे' असे सांगत आहेत. नुसते बोलून चालणार नाही - पुरावे(दाखले) द्यावेत. )


४. जर असे कुठे लिहून ठेवले नसेल तर नेमके काय पाहिले म्हणजे गझलेचे खरे रूप दिसेल? (उर्दूतील मोठमोठ्या गझलकारांची नुसती नावे घेऊ नका. गझलकाराच्या एकंदर गझलांपैकी किती गझला 'अशा' किंवा 'तशा' आहेत हे उदाहरण देऊन सांगा. (टक्केवारीत सांगा. म्हणजे सगळ्यांना समजेल.))


५. केवळ उर्दूमधील गझलकारांच्याप्रमाणेच आपले विषय असावेत का? आपला मराठीपणा गझलेतून यावा का? कसा यावा?


६. गझलकाराला तो ज्या भाषेत गझल लिहितो आहे त्या भाषेचा अभ्यास किमान कोणत्या पातळीपर्यंत हवा?


७. उर्दू किंवा इतर भाषांमध्ये (मराठीसह) गझलेच्या विषयांमध्ये काही बदल झाले आहेत का? किंवा काळानुरूप ते व्हावेत का?


असे काही प्रश्न मला सुचले आहेत (पडले आहेत म्हणा हवे तर..).
कोणाला यात काही भर घालावयाची असल्यास घालू शकता.


एक सूचना : आपण चर्चेत भाग घेताना एखादे गझलेचे उदाहरण द्यायचे झाल्यास - गझलकाराचे नावही सांगा. जर दुस-या कोणी लिहिलेला विचार सांगणार असू तर त्याचाही संदर्भ (पुस्तक, वगैरे..) द्या. एखाद्या पुस्तकातून गझलेसंबंधी विचार आपण वाचला असेल तरी तो पुस्तकाच्या नावासहित, लेखकासहित द्या. ईंटरनेवर वाचले असेल तर लिंक द्या किंवा संकेतस्थळाचे नाव द्या. [दाखले देणे अत्यावश्यक वाटते.]


नवोदितांनीही आपापली मते - अभ्यास मांडल्यास चर्चेत रंगत येईल. [खरेतर कोणीच स्वतःला नवोदित समजू नये.]


माझी एक कळकळीची विनंती ::
यासंबंधी माहिती असणा-यांनी आपल्याला असलेली माहिती उघड केली तर नवोदित गझलकारांना आणि गझलरसिकांना सुद्धा फायदा होईल. 'ज्ञान वाटल्याने कमी होत नाही' असे ऐकले आहे. आणखी एक : एकमेकांवर बोलण्यापेक्षा विषयावरच चर्चा करूया.

गझलचर्चा: 

प्रतिसाद

 
<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" /?>

१९.०१.०९


गझल आणि गझलियत.


अजय,


आपण हा मुद्दा काढलात ते माझ्या मते चांगले झाले. माझी मते मांडत आहे.


गझल या वरवर सपाट वाटणार्‍या शब्दात एक अफाट जादू असते. ज्याला 'गझल म्हणजे काय' याची चुणूक जाणवली त्याचे संपूर्ण आयुष्यच गझल होऊ शकते. मुळात गझल हा एक काव्यप्रकार आहे. इतर काव्यप्रकारांपासून तो बराच भिन्न आहे.


'गझल' या शब्दाची उत्पत्ती - या विषयावर अनेक जणांनी बरेच लिहून ठेवले आहे. फार्सी, उर्दू या परंपरेतून या शब्दाची निर्मीती झालेली सर्वांनाच माहिती आहे. उर्दू गझलांना लाभलेली अफाट लोकप्रियता सर्वश्रूत आहे.

व्याख्या - ( मी वाचलेल्या, जाणवलेल्या व मला पटलेल्या )


१. स्त्रीशी केलेला संवाद


२. हरिण शिकार्‍यापासून स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात असताना त्याची शिंगे फांदीत अडकावीत अन वळुन पाहिल्यावर आपला मृत्यू आपल्यापासून अगदी जवळ आला आहे अन तो अटळ आहे हे समजताच हरणाच्या गळ्यातून जे आर्त रुदनाचे स्वर बाहेर पडतात ते म्हणजे गझल.


३. गझल म्हणजे धुंदी आणणारे पद्य.


४. गझल म्हणजे वैयक्तिक व्यथा मुलभूतपणे सांगणारे पद्य.


गझल व इतर काव्यप्रकारांमधील प्रमूख फरकः


१. कवितेचे व्यक्तिमत्व कसेही असू शकते. म्हणजे मुक्तछंद ( ज्यात कसलेच नियम नाहीत ), चार चार ओळी, आठ आठ ओळी किंवा कितीही ओळी, यमके दर दोन ओळींना किंवा ओळींच्या संचाला बदलणे, चारोळी ( ज्यात चार ओळी आहेत व त्यांचा अर्थ हा साधारणपणे सामान्य माणसाच्या मनाला भिडणारा आहे ), वृत्ताशी संबंध नसणे,  असे! मात्र गझल जर एखाद्या कागदावर लिहीली तर ती दिसायला सुद्धा शिस्तबद्ध दिसू शकते. त्यात दोन दोन ओळींचेच शेर असतात. एका शेरातील ओळींची संख्या बदलू शकत नाही. म्हणजे दोन पेक्षा जास्त ओळी झाल्या तर तो शेर होऊच शकत नाही.साधारणपणे कमीतकमी ५ शेर असायला पाहिजेत. गझल ही वृत्तबद्ध असतेच. एकंदर मात्रा, गुरू लघु अक्षरांची संख्या, त्यांचा क्रम यावर बंधने असावीत.  या सर्व बंधनामंधून निर्माण होत असल्यामुळे गझल ही सरळ सरळ एक 'गेय' कविता होते. कुठलीही गझल ही गाता येऊ शकतेच. त्यावर सुयोग्य ठेका धरता येतोच.  भावगीत, अभंग, भारूड, मुक्तछंद, चारोळी, लावणी हे कवितेचे काही प्रकार! त्यातील गझल हा एकच प्रकार असा आहे ज्याचा साधेपणा व गेयता हीच त्याची सौंदर्यस्थळे आहेत. म्हणजे लावणीमधे उत्तान श्रुंगार, अभंगात भक्तिभाव, चारोळीमधे विडंबन, विनोद, टीका, सामाजिक भान यापैकी काहीतरी, मुक्तछंदात कविता करण्याची असलेली हौस पण कविता करण्याची क्षमता नसणे, भावगीतात दर्जेदार प्रेमाचे व्यक्तिकरण ( म्हणजे जे प्रेम सहसा समाजमान्य असावे किंवा उत्तान भडक नसावे असे प्रेम ) ही वैशिष्ट्ये असतात. तसे गझलेचे वैशिष्ट्य म्हणजे 'वृत्तबद्धतेबरोबरच' 'अत्यंत साध्या शब्दात' 'नेहमीच्या आयुष्यातील घटनांना किंवा मनातील भावनांना किंवा अनुभवांना किंवा व्यथांना किंवा अव्यक्त वा असफल प्रेमाला किंवा सफल प्रेमातील खाचखळग्यांना' काव्यबद्ध करून थेट रसिकाच्या 'मनाला भिडुन' त्याची वाहवा घेऊ शकणे. इथेच 'गझल' व इतर काव्यप्रकारांमधे दरी पडते.  ज्याला गझल करता येते, कळते, आवडते, ऐकायला किंवा वाचायला आवडते त्याला कविता तितकीच आवडेल हे जरा कठीण आहे. याचे कारण कवितेला काहीही बंधने असली पाहिजेत अशी अट नाही.


२. पहिला फरक सांगतानाच जवळजवळ दुसरा फरक सांगीतल्यासारखे झालेच. इतर काव्यप्रकार व गझल यातील सर्वात म्हणजे सर्वात महत्वाचा फरक म्हणजे 'त्यातील आशयाचा' फरक! येथे असे म्हणायचे नाही की एकाच गझलेत विविध विषयांवर शेर रचले जाऊ शकतात म्हणुन गझल कवितेपेक्षा वेगळी आहे. येथे असे म्हणायचे आहे की गझलेत काय विषय असावेत याबाबतच मुळात एक अलिखित संकेत असावा. असे मत मांडण्याचे कारण पुढे विस्तृत स्वरुपात स्पष्ट केले आहे. यावेळी फक्त इतकाच मुद्दा की काय विषय गझलेत असावेत याबाबत एक बंधन पाळल्यास गझल यशस्वी होतेच. ( अर्थात त्याला गझलेच्या इतर तांत्रिक अटी पाळल्या गेल्याच पाहिजेत हे आवश्यक आहेच )


गझलेतील विषयांबाबतची पार्श्वभूमी:


मराठीमधे गझल नव्हती. मराठीत गझल आली ती उर्दूमधून! उर्दू भाषेतील गझलांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. आता गझलेच्या फक्त तांत्रिक सौंदर्यामुळेच तिला उर्दूमधे लोकप्रियता मिळाली असे समजण्याचे कारण नाही कारण उर्दूमधे इतरही काही काव्यप्रकार आहेत ( रुबाइसारखे ) जे तंत्रशुद्ध तर असतातच पण भावतातही. गझललाच लोकप्रियता मिळण्यामागे प्रमुख कारण म्हणजे गझलेत शायराला सर्व बंधनांमधुनही मिळणारे स्वातंत्र्य! म्हणजे रदीफ, काफिया, अलामत, वृत्त असणारे कमीतकमी पाच शेर असलेच पाहिजेत व काय विषय घ्यावेत यावरही एक प्रकारचे गृहीत आहे जे पाळले गेलेच पाहिजे या बंधनांमधुनही ते पाचही शेर भिन्न विषयांवर असणे, त्यातून जीवनातील विविध अनुभुती, व्यथा, प्रेम, आशानिराशा व्यक्त करायला मिळणे हे ते स्वातंत्र्य!


जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या मानवाच्या मनातील भावना या काही प्रमाणात समान असतातच. म्हणजे उपाशी माणूस भारतात असेल तर त्याला पराठा किंवा वडापाव खावासा वाटेल ( तो कोणत्या प्रदेशात राहतो त्यावरून ), तर ब्रिटनमधे राहणार्‍या माणसाला पिझ्झा किंवा बर्गर खावासा वाटेल. पण यात 'खावेसे वाटणे' ही भावना समान आहे.  हे सर्व सामान्य माणसांबद्दल चाललेले आहे. पुर्वी वायू भक्षण करून मुनीलोक रहात असत तशा लोकांबद्दल नाही. याचप्रमाणे इतर भावनाही सारख्या असतात. जसे प्रेम, राग, भीती, लोभ, मोह, द्वेष, वासना, तिरस्कार, घमेंड इत्यादी! एखादी परकी सुंदर स्त्री पाहिल्यास एखाद्या तरुणाच्या मनात नैसर्गीक पद्धतीने जागृत होणार्‍या भावना सर्वत्र समानच असणार. तसेच इतर भावनांबद्दलही आहे. म्हणजे शिव्या दिल्यास जर्मन माणूस रागवणार नाही असे नाही. फक्त राग व्यक्त करायची पद्धत त्यावेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल एवढेच!


हे एकदा मान्य केले की प्रश्न उरतो तो काळाचा व संस्कृतीचा! म्हणजे असे की आज भारतात शिक्षण घेणार्‍या मुलींची संख्या पुर्वीपेक्षा बरीच जास्त आहे. त्यात परत जग जवळ आल्यामुळे संस्कृतींचा मुक्त संचार या देशातून त्या देशात होऊ शकत आहे. संपर्काची साधने भरपूर उपलब्ध असल्यामुळे तर ते आणखीनच सहज झाले आहे. या सर्वामुळे, पुर्वी कॉलेजला जाणार्‍या मुली जे पोषाख करायच्या त्यापेक्षा कितीतरी भिन्न पोषाख हल्लीच्या मुली करताना दिसतात. ते त्यांच्या पालकांनाही चालते किंवा चालवावे लागते. या सर्वामुळे, पुर्वी एखाद्या मुलीवर जीव जडलेल्या मुलाला तिच्याशी संपर्क साधायला जे कष्ट पडायचे किंवा जीव जडण्यासारख्या कारणांची पुर्वी जी संख्या असायची त्यापेक्षा आता ते कष्ट पडत नाहीत किंवा बरीच जास्त कारणे उपलब्ध असतात. म्हणजे जर एखादी मुलगी कायमच दोन वेण्या ( तेलाने चप्प बसवलेल्या ) घालून, अजिबात इकडे तिकडे न बघता वावरत असली तर तिच्यावर जीव जडण्याची कारणे निर्माण होणे जरा अवघडच व्हावे. पण आजच्या जमान्यातील मुलगी जशी वावरते त्या वावरण्यामुळे अशी कारणे बरीच असू शकतील. हा फरक पडला काळामुळे.


याच तुलनेमधे अमेरिकेतील एखादी मुलगी पन्नास वर्षापुर्वीच तशी वावरत असेल जशी भारतातील मुलगी आज वावरते. हा फरक पडला संस्कृतीमुळे.


असे काळाने व संस्कृतीने कुठे कुठे काय फरक पडले हा वेगळा विषय आहे. मात्र प्रश्न आहे की गझलनिर्मीती व गझल लोकप्रिय होण्याच्यावेळी त्या भूमीची काय संस्कृती होती व काय काळ होता हा.


गझल जिथे निर्माण झाली तेथे प्रेम व्यक्त करणे अत्यंत कठीण बाब होती. लक्षात घ्यावेत की ही चर्चा फक्त गझल या काव्यप्रकारावरच चाललेली आहे. त्याही काळी राजाच्या शौर्यावर, देशप्रेमावर, सामाजिक विषयांवर काव्य रचले जात असणारच! परंतू त्याकाळी असलेली बुरखा संस्कृती, बोली भाषेतील जन्मजात नम्रता, सौम्यता व उच्चभ्रूपणा किंवा खानदानीपणा, स्त्रीवर असलेली बंधने ( शिकावे किती, नोकरी करावी की नाही, कुठे किती मिसळावे वगैरे स्वरुपाची ) या सर्वामुळे 'प्रेम' हा जो विषय आहे त्याच्यात अनंत छटा आल्या.


आजही महाराष्ट्रातच असे नाही तर आपल्या देशातच 'लज्जा' हा स्त्रीचा दागिना समजला जातो. चारचौघात वाटेल तशी वागणारी स्त्री टीकेस पात्र होते, ही आजही आपली संस्कृती आहेच.


त्याचबरोबर आजही आपल्याकडे ज्याला वाटेल तो जिच्याबद्दल वाटेल तिच्यासमोर स्वतःचे प्रेम अजूनही व्यक्त करू शकत असेलच असे काही नाही. पाश्चात्य देशात अशी संस्कृती असल्यास कल्पना नाही, पण काही प्रमाणात तसे असावे.


येथे खरा मूळ मुद्दा उपस्थित होतो. माणसाच्या किमान गरजा ( अन्न, वस्त्र व निवारा ) या भागल्यानंतर त्याला इतर ( इथे माणूस म्हणजे फक्त पुरूष नव्हे ) गोष्टींकडे लक्ष द्यावेसे वाटते. यापैकी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आवडती व्यक्ती ही आयुष्याचा भागीदार असणे! म्हणजेच प्रेमाचे महत्व अनन्यसाधारण ठरते. अशा वेळेस गझलची निर्मिती जिथे झाली तिथे जे वातावरण होते ( या विषयासंदर्भात अत्यंत घुसमट होणारे असे ) त्यामुळे आपोआपच गझलेला आशयाचे एक रुपडे मिळाले. ते असे की, प्रेम ही भावना तीव्रपणे व्यक्त करणे!  काही जणांनी गझलची व्याख्याच 'स्त्रीशी केलेला संवाद' अशी केलेली आहे. कवीचे प्रेयसीवर प्रेम असणे, तिचे नसणे, तिचेही असणे पण गुप्त ठेवावे लागणे, ती त्याबाबतीत कवीकडे पूर्ण दुर्लक्ष करणारी असणे, तिच्यापर्यंत पोचण्यासाठी कवीला 'कासिद/नामाबर' अशा संदेशवाहकांची मदत घ्यावी लागणे, 'पासबान' म्हणजे द्वारपालांचा विरोध सहन करावा लागणे, मीलनाच्या रात्री तिने भलत्याच चर्चेत वेळ घालवणे, विरहाच्या अनेक रात्री नशिबात येणे, जगबुडीच्या वेळेस या सर्व पापांचा हिशोब द्यायचा आहे याची जाणीव असणे, प्रेमप्राप्ती न झाल्यामुळे मद्याचे व्यसन लागणे, त्यात धर्मोपदेशकांनी सल्ले देणे, त्यांची टर उडवली जाणे, प्रतिस्पर्ध्यालाच प्रेयसीची प्राप्ती होणे, तिच्या घरातील मैफिलीमधुन हकालपट्टी होणे, मग मद्य पाजणारी साकी जवळची वाटू लागणे, मद्यालयातूनही हकालपट्टी होणे असे भावनांचे एकावर एक मजले चढत गेले.


यातील काही गोष्टी त्या त्या संस्कृतीच्या समजुतीप्रमाणे ( जगबुडी वगैरे ) तर काही समाजातील कायद्यांमुळे होत्या. इतर सर्व गोष्टी या मानवी मनाच्या इच्छांमुळे आलेल्या होत्या.


या सर्व बाबी सिद्ध करण्यासाठि 'उर्दू गझल' मधे अक्षरशः हजारो उदाहरणे आहेत.


या सर्व बाबींमुळेच 'गझल' हा काव्यप्रकार मुळात कशाबद्दल असावा किंवा आहे हे अध्यारुत व्हायला सुरुवात झाली.


अशा पार्श्वभूमीमुळेच 'गझल' ही प्रेम, त्यासंदर्भातील भावनांची तीव्रता, दैनंदिन आयुष्यात असणार्‍या वा घडणार्‍या गोष्टी, अनुभुती, बेभानपणा या घटकांच्या साखळीमध्ये बद्ध झाली.


या पार्श्वभूमीमुळेच गझलेत व्यथा, अनुभुती, असफल प्रेम, मदिरा या गोष्टी प्रामुख्याने अंतर्भूत झाल्या.


अशी उर्दू गझल नंतर इतर काही भाषांमधे गेली व मराठीतही आली.


 


मराठी गझलः


'गझल' हा काव्यप्रकार जेव्हा मराठीमधे प्रवेशला तेव्हा तो प्रामुख्याने  तंत्राच्या अंगाने प्रवेशला असे माझे स्पष्ट मत आहे. म्हणजे असे की उर्दू गझलेत जर वृत्त उच्चारांप्रमाणे असतील तर मराठीत ती आणखीन जरा काटेकोर होऊन आली. मात्रा, गुरू-लघू अक्षरांची संख्या, अलामत, रदीफ काफिया याबाबतचे सगळे नियम घेऊन ती मराठीत आली.


मात्र, मराठीत येताना गझलेला आपले  आशयाबाबतीतचे असलेले 'मूळ' स्वरुप थोडेसे सोडावे लागले असे व्यक्तिशः मला वाटते.
हा आयात केलेला काव्यप्रकार नवीन पद्धतीने हाताळला गेला. 
गझलेला आपला मूळ रंग थोडासा सोडून मराठीत यावे लागले.


तिच्यामधे प्रेम, अनुभुती, भावनांची तीव्रता, अगदी मनाच्या आतून आलेले विचार असणे या गोष्टी जरा कमी दिसतात असे मला वाटते. ( एकंदर संख्येच्या दृष्टीने हे विधान आहे. एखाद्या कवीबाबत किंवा एखाद्या गझलेबाबत नाही.)
त्यात आणखीन दोन फरक पडले. मराठी गझल हा एक वेगळा भाग झाला अन मराठी शायरी हा एक वेगळा भाग. मराठी शायरी तर अत्यंत 'चीप' दर्जाची व तांत्रिकदृष्ट्या अशुद्ध अशी निर्माण झाली. त्यात सादरीकरणाला व सवंगतेला दाद मिळायला लागली.


मराठी गझल म्हणजे एक सामाजिक कविता होऊन बसली असल्यासारखे वाटते. 
 अशा स्वरुपाच्या रचनांना 'गझल' म्हणुन मराठीत मान्यता मिळाली.

खालील शेर पहा:


१. प्रदीप - तू कशी जाशील कवितेतून माझ्या
२. अनंत - लाट एकेक चालली होती हे शेर किंवा या ओळी व्यक्तिगत अनुभुती उलगडणारे वाटतात.


पण करारनामे हे माझ्यामते पूर्णपणे सामाजिक आहेत. वायद्यांनी पोटे कशी भरतील, जातीयवाद, कुठल्यातरी धरणामुळे निर्माण झालेले प्रश्न वगैरे. तसेच सध्याच प्रकाशात आलेल्या सुनेत्रा सुभाष या अत्यंत अ-गझल विषयांवर रचना करत आहेत असे मला वाटते. आपला शेर - माकडांचा खेळ करतो हा मदारी मला गझलेचा वाटत नाही. मात्र नुकताच प्रकाशित झालेल्या गझलचा मक्ता ( जीवनाला सोडले ) हा गझलचा वाटतो.


 
हे सर्व होत असताना इतर समाज 'गझल' या बाबतीत किंवा मूळ गझलच्या सौंदर्याच्याबाबतीत इतका उदासीन होता की या बदलाच्या विरोधात बोलण्याची कुणाला गरजही वाटली नाही.


प्रश्नः                    


या सर्वामधे प्रश्न असा आहे की मराठीमधे उर्दूमधून गझल पूर्णपणे जशीच्या तशी आली का? तर नाही! तिला पुरेसे मराठी रंगही मिळाले नाहीत. ( म्हणजे पहा: उर्दू मधे साकी, बुलबुल, पासबान, कासिद वगैरे अनेक संकेत आहेत, जे त्या संस्कृतीचे निदर्शक आहेत ) आपल्याकडे चतुर्थी, सोवळे, सडा टाकणे, नैवेद्य दाखवणे, सोळा सोमवार अशा हजारो प्रथा आहेत. किती गझलांमधे त्यांचा सरळ सरळ किंवा प्रतिमेसारखा वापर होतो. ( भटांचा एक शेर आहे जो इथे काही दिवसांपुर्वी होता - काळजी घे जरा उखाण्याची - हा प्रथेप्रमाणे होता. ) कितीजणांनी 'प्रेयसी मिळावी म्हणुन सोळा सोमवार केले पण ती उद्यापनालाच नवर्‍याला घेऊन मेहूण म्हणुन आली' असे विधान गझलेत केले आहे? मी तरी वाचलेले नाही.
गझलमधे एक सहजता, एक तरलता, एक नाजूकता ही असायला पाहिजेच.

आपण त्या संस्कृतीशी अजिबात संबंधित नसतानाही त्या गझला  आपल्या डोक्यावर चढून बसतात. मराठी गझलेशी आपला संबंध असूनही आपल्याला त्या सतत गुणगुणाव्याश्या वाटत नाहीत. हे मराठी गझलेचे अपयश त्यातील तंत्र सांभाळल्यानंतरही निर्माण झालेले आहे कारण 'मंत्र' सांभाळला गेला नाही असे मला स्पष्ट्पणे वाटते.
आता एक वाद असा निघू शकेल की कुणी सांगीतले की गझलेत हेच विषय असावेत? त्यावर माझे म्हणणे असे आहे की मराठीतील 'त्या' गझलांना गझल म्हंटले पाहिजे असे तरी कुठे आहे? त्याला 'मझल' म्हणावे! गझल हा काव्यप्रकारच जर माणसाच्या हृदयाच्या तारा छेडण्यासाठी असला तर त्याने समाजातील दुष्प्रवृत्ती तोडण्याचे काम करावेच कशाला? त्याच्यासाठी वेगळे काव्यप्रकार आहेत की. किंवा तसे करायचेच असेल तर त्याला गझल म्हंटलेच पाहिजे हा आग्रह कशाला?
दुसरा वाद असा निघेल की हा कोण अतिहुशार आला हे सगळे लिहिणारा, ज्याच्या स्वतःच्या गझला निकृष्ट आहेत? त्यावर मला असे म्हणायचे आहे की मी जे उर्दू वाचन केले आहे त्यातून मला जे जाणवले तेवढे लिहिले आहे.
( यातील काही मते आधीच लिहून सेव्ह केलेली असल्याने नवीन मुद्दे व जुने मुद्दे दिसायला वेगवेग्ळे दिसू शकतील, पण ही सर्व माझीच मते आहेत आणि त्याच्याशी मी प्रामाणिक आहे. )
जर असे कुठे लिहून ठेवले नसेल तर नेमके काय पाहिले म्हणजे गझलेचे खरे रूप दिसेल? (उर्दूतील मोठमोठ्या गझलकारांची नुसती नावे घेऊ नका. गझलकाराच्या एकंदर गझलांपैकी किती गझला 'अशा' किंवा 'तशा' आहेत हे उदाहरण देऊन सांगा. (टक्केवारीत सांगा. म्हणजे सगळ्यांना समजेल
आपला वरील मुद्दा मला जरा जास्तच आक्रमक वाटत असून तो जास्तकरून आपल्याला ते समजावे या हेतूने प्रेरित झालेला वाटत आहे. तसे असल्यास आपण उर्दू गझलवरील मिळतील ती पुस्तके वाचावीत, इंटरनेटवर अभ्यास करावात व गझल-गायन ऐकावेत.
मराठीपणा कसा यावा यावर मी वर लिहिलेच आहे.
भाषेच्या अभ्यासापेक्षा जीवनाचा अभ्यास अन खुलेपणा आवश्यक आहे ज्याने शेर रचताना व्यक्तीकरण सशक्त व्हावे.
उर्दूमधे काळानुरूप झालेले बदल हे संकेतांच्या दृष्टीने असू शकतील. म्हणजे निरोप्याला प्रेयसीकडे पाठवण्याऐवजी फोन करत असतील, पण विषय तेच राहिले असणार. उगीच कुणी जत्रेत १०० मेले, धरण फुटले, मुंबईला बॉम्बस्फोट झाले, नवीन वर्ष, अध्यात्म वा स्त्रीवाद आणला असेल असे नाही.
धन्यवाद!
 
 

़ काही  गझलांमधील हे विषय बघा -

मुफलिसी सब बहार खोती है
मर्द का एतबार खोती है

-- वली औरंगाबादी

ऐ जाहिदां उठाओ जमीं को जमीन से
जो सरनविश्त है उसे कां तक मिटावेगा
--दाऊद

बेकसी मुझसे आशना है सिराज
नईं तो आलम में कौन है किसका

--सिराज

सद साला दौरे चर्ख था सागर का एक दौर
निकले जो मैकदे से तो दुनिया बदल  गई

----कवीचे नाव आता आठवत नाही, आठवले की नोंदवतो..

शहां की कुहले जवाहर थी खाके पा जिनकी
उन्ही की आंख में फिरती सलाहियां देखीं

---- मीर

मर्ग ईक मान्दगी का वक्फा है
यानी आगे चलेंगे दम लेकर
----मीर

वे सुरतें ईलाही किस देस बस्तियां हैं
अब जिणा़ऍ  देखने को आंखें तरस्तियां हैं

बरसात का तो मौसम कब का चला गया पर
मिशगां की ये घटाएं अब तक बरस्तियां हैं
-----सौदा

सौदा ! खुदा के वास्ते कर किस्सा मुख्तसर
अपनी तो नींद उड गयी तेरे फसाने से...

---सौदा

अब तो घबरा के ये कहते  हैं के मर जाएंगे
मर के भी चैन न आया तो किधर जाएंगे

---जौक

मैं कौन हूं  ऐ हमनफसां सोख्ता जां हूं
इक आग मेरे दिल में है जो  शोला फशां हूं
लाया है मेरा शौक मुझे परदे से बाहर
वर्ना मैं वही खिलवति ए राजे निहां हूं
जल्वा है मुझीसे लबे दरिया ए सुखन पर
सदरंग मेरी मौज है मैं तब ए रवां हूं
..मीर

रखा कर हात दिल पर आह करते
नहीं रहते चराग ऐसी पवन में..

----मीर

 खरे तर अगदी आधीपासून कवींनी शक्य तितक्या विषयांवर शेर लिहिलेले आहेत्...इथे आणखी अशी शेकडो उदाहरणे देता येतील्...गालिब चा हा  शेर पहा :

है कहां तमन्ना का दूसरा कदम या रब
दश्ते इम्कां में हमने एक नक्शे पा पाया !

मला वाटते कवींनी  गझलेत हे नको ते नको इ. मध्ये न अडकता मोकळेपणाने गझला लिहिव्यात..<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" /?>


 

मुफलिसी सब बहार खोती है
मर्द का एतबार खोती है ( व्यथा, गरिबीमुळे आलेले वैफल्य )

-- वली औरंगाबादी

बेकसी मुझसे आशना है सिराज
नईं तो आलम में कौन है किसका 
( व्यथा )
--सिराज

सद साला दौरे चर्ख था सागर का एक दौर
निकले जो मैकदे से तो दुनिया बदल  गई
( धुंदी, मद्यामुळे शांतता लाभली )

----कवीचे नाव आता आठवत नाही, आठवले की नोंदवतो..


मर्ग ईक मान्दगी का वक्फा है
यानी आगे चलेंगे दम लेकर ( मृत्यू विझण्याबाबतचे ज्ञान आहे, मिळाले की पुढे जायचे, बाकी म्रुत्यू काहीही नाही, प्रवास मृत्यूपाशी संपत नाही )
----मीर


सौदा ! खुदा के वास्ते कर किस्सा मुख्तसर
अपनी तो नींद उड गयी तेरे फसाने से...
( महान कवी सौदा स्वतःला म्हणत आहे,  परमेश्वरासाठी तुझी कहाणी आता थोडक्यात संपव, आमची तर झोप गेली असली भीषण कहाणी आहे ही )

---सौदा

अब तो घबरा के ये कहते  हैं के मर जाएंगे
मर के भी चैन न आया तो किधर जाएंगे
( शेख इब्राहिम जौक यांचा गाजलेला शेर. अर्थ सरळ आहे )

---जौक
ढवळे साहेबांनी दिलेल्यापैकी जे शेर मी इथे नोंदले नाहीत त्यांचा अर्थ मला माहीत नाही, तो कृपया त्यांनी सांगावा.
माझ्यामते, मी ज्या शेरांचे अर्थ दिले आहेत, ते जर योग्य असतील, तर ढवळे साहेब म्हणत आहेत त्याप्रमाणे त्यात विषयांचे वैविध्य नसून उलट मी आधीच्या प्रतिसादात नोंदलेल्याच विषयांचे विविध प्रकारे केलेले सादरीकरण आहे.
म्हणजे, वैयक्तिक व्यथांपेक्षा वरील शेरात काही वेगळे आहे असे मला तरी वाटत नाही.
उदाहरणार्थ : ( एक शेर 'बस्तियाँ वर आहे तो सोडुन ) आपले गाव, सामाजिक रुढी, टीकात्मक, राजकीय संदर्भ असलेले असे शेर यात नाहीच आहेत.
धन्यवाद!