मला वाचवा: घनःश्याम धेंडे


"मला वाचवा, मला वाचवा" मरण बोलले
"बसू लागले चटके मजला" सरण बोलले


स्थलांतराचे दु:ख काय ते मला विचारा
"मी ही आहे ग्रस्त खरे तर" धरण बोलले


टिकून आहे उमेद माझी चालायाची
"थकून गेली वाटच पण ही" चरण बोलले


झुणका-भाकर, कांदा, ठेचा कुठवर खाऊ
"बासमतीचा भात कुणी द्या" वरण बोलले


तळे पाहुनी तृषार्त मी मग धावत सुटलो
"मृगजळ कुत्सित हसले होते" हरण बोलले


ह्रदय घेवुनी आईचे पळताना पडता...
"कुठे लागले बाळा?" अंतःकरण बोलले


घनःश्याम धेंडे
पुणे

प्रतिसाद

एकेक शेर शंभर नंबरी! गझल खूप आवडली. येथे दिल्याबद्दल आभार.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

पूर्ण गजलच छान आहे... सर्वच शेर चांगले उतरलेत...
मतला, मक्ता तर फार आवडले

मस्तच गझल. सगळेच शेर छान आहेत. मतला तर फार फार आवडला.

अवांतर:
'थकून गेली वाटच पण ही' चरण बोलले 
ह्या ओळींवरून मित्रवर्य आणि कविवर्य यादगार ह्यांच्या
मी चालतोच आहे, गेला दमून रस्ता
आता नवीन सांगा, दुसरा अजून रस्ता
ह्या आवडत्या शेराची आवर्जून आठवण झाली.

वरण, चरण आणि धरण हे शेर तर फार फार आवडले!

व्वा !!
सुंदर गझल !

"मला वाचवा, मला वाचवा" मरण बोलले
"बसू लागले चटके मजला" सरण बोलले

इथे कवीला अनेक गोष्टींचे आनंद होताना दिसतात. 'मरण' या शब्दाचे 'सरण' या शब्दाशी जुळणारे यमक अनुभवुन कवीला परमानंद झाला आहे. विरोधाभास आणु शकल्यामुळे दुग्ध्दशर्करा योगही आहेच. म्हणजे मरणच म्हणतंय "मला वाचवा, नाहीतर मीच मरायचो "  अन सरणच म्हणतय "मला भाजतय राव? काहीतरी करा की?"व्वाह! अप्रतिम करामत आहे. हे कवीला कळले कसे ते काही लक्षात येत नही. म्हणजे मरण, सरण वगैरे मंडळी रस्त्यातुन बेफाट वेगाने धावत धावत या आरोळ्या देत चालली असावीत बहुधा! या कवीकल्पना मानाव्यात तर नेमकी परिस्थिती काय आहे ज्यामुळे असा अद्वितीय शेर रचून मराठी कवितेत मोलाची भर टाकण्यात आली ते लक्षात येत नाही.


स्थलांतराचे दु:ख काय ते मला विचारा
"मी ही आहे ग्रस्त खरे तर" धरण बोलले

धन्य वाटले. धरणे का स्थलांतरित होतात? की आपल्यामुळे इतरांचे स्थलांतर होते याचे धरणाला दु:ख झाले आहे? 'एक न समजणारा काव्यप्रकार म्हणजे गझल किंवा संदर्भ न लागणारा काव्यप्रकार म्हणजे गझल किंवा फक्त कवीलाच कळू शकणारा काव्यप्रकार म्हणजे गझल' अशा काही नवीन व्याख्या उदयास आणल्यामुळे गहिवरुन आले आहे.  या शेरामधे कवीची भूमिका काय आहे तेच कळत नाही. म्हणजे स्थलांतरितांचे दु:ख मांडायचे आहे की धरणाचे की स्वतःचे अनुभव सांगायचे आहेत हे कळतच नाही.


टिकून आहे उमेद माझी चालायाची
"थकून गेली वाटच पण ही" चरण बोलले

चांगला शेर. गझलेचा शेर!


झुणका-भाकर, कांदा, ठेचा कुठवर खाऊ
"बासमतीचा भात कुणी द्या" वरण बोलले

व्वाह! 'गिरण' हा एक काफिया राहिला घ्यायचा. पण तो स्त्रीलिंगी असल्याचा संशय आल्यामुळे घेतला नसावा. 'गिरण बोलले' म्हणणे अयोग्य वाटत असावे. 'आबाच्या राज्यामध्ये ना वीज राहिली, कुठवर चालू, कशी जगू मी गिरण बोलले' वगैरे!  आम्हाला यापुढे आता साधा वरण भात खायची भीती वाटायला लागली आहे. आर्थिक परिस्थितीला अनुसरून आम्ही आपले कधी कधी आंबेमोहोर वगैरे मिसळतो. 'वसकन' वरण अंगावर वगैरे आले तर करणार काय माणूस? बर झुणका भाकर, कांदा व ठेचा हे पदार्थ 'आम्ही' खातो अशी आमची समजूत होती. आम्ही ओरपलेल्या पदार्थांना पोटात गेल्यावर 'वरण' हादडते याची कल्पना नव्हती. आम्ही मंडळींना हा शेर ऐकवल्यावर 'आपण डाळ महिला गृह उद्योगातुन घेतो' अशी एक आतली माहिती आम्हाला पुरवण्यात आली. ते ऐकल्यावर 'त्या डाळीचे वरण बोलणे शक्य आहे' याबाबत आमच्या मनात काहीही शंका वगैरे उरली नाही. सुंदर शेर! यापुढे आम्ही अत्यंत जपून राहण्याच्या विचारात आहोत. वाट्टेल त्या गोष्टी आता बोलायला लागलेल्या आहेत.


तळे पाहुनी तृषार्त मी मग धावत सुटलो
"मृगजळ कुत्सित हसले होते" हरण बोलले

पहिल्यांदा आम्हाला वाटले की कवी धावत सुटला. पण नाही. हरण धावत होते. फक्त पहिल्या ओळीला अवतरण चिन्हांची शान हरणाला मिळाली नाहीये. हरण धावते ही आमची हरणाबद्दलची माहिती किती तुटपुंजी आहे हे सानी मिसर्‍याच्या शेवटी खाडकन जाणवलेच. आता हरण पण बोलले. हरण धावणे व हरण बोलणे या क्रिया कवीच्या दृष्टीने सारख्याच शक्यतेच्या आहेत. कवीशी चराचरातील यच्चयावत बाबी भेटेल तिथे गप्पा मारत असाव्यात. हरण, धरण, वरण, मरण, सरण! ज्या ज्या गोष्टींचे नाव तीन अक्षरी असून दुसरे अक्षर 'र' असे आहे व तिसरे अक्षर 'ण' असे आहे व पहिले अक्षर लघु आहे त्या सर्व गोष्टी 'वाचा' लाभलेल्या असतात असा एक शास्त्रीय सिद्धांत आम्ही मांडत आहोत. इथे मृगजळाला कुत्सितपणे हसण्याचे 'खरे' कारण कोणते याचे संशोधन आवश्यक आहे.


ह्रदय घेवुनी आईचे पळताना पडता...
"कुठे लागले बाळा?" अंतःकरण बोलले

हा शेर 'संबंधित ' कथेवरून जसाच्या तसा घेतलेला आहे. तो व्यवस्थित बसला असला तरी आमच्या मते कवीचे क्रेडीट इतकेच की तो मुद्दा वृत्तात मांडला.

मान्यवरांच्या गझलेला आम्ही मार्क देऊ शकत नाही.

 

मजा आली समीक्षकराव! मजा आली.

इथे कोण किती नावांनी वावरतो, काय करतो, कसे गैरसमज पसरवतो हे ज्याचे त्यालाच ठाऊक. पण सार्वजनिक ठिकाणी संवाद करताना तारतम्य बाळगावे. जे असे तारतम्य बाळगत नाहीत त्यांचे प्रतिसादांना चाळणी लावावी लागते.

तिरकस, हिणकस प्रतिसाद टाळा.

मी सध्या एक पुस्तक वाचत आहे ज्यामधे लेखकाने 'गझल' या विषयावर बरेच काही लिहिले आहे. त्यात एक मुद्दा असा आहे की अनावश्यक शब्द टाळण्याकडे कवीचा कल असावा, ज्याने रचना 'हात लावता येणार नाही अशी घट्ट' होते.
वरील चर्चेत कवीवर्य यादगार यांचा जो शेर आला आहे...
मी चालतोच आहे गेला दमून रस्ता
आता नवीन सांगा दुसरा अजून रस्ता
या शेरात 'नवीन' व 'दुसरा' हे शब्द साधारण एकाच अर्थाचे आहेत अशा स्वरुपाची उदाहरणे त्या पुस्तकात लेखकाने मांडली आहेत. पुढे असे म्हंटले आहे की अशा शब्दांपैकी एक शब्द रद्द करून वेगळा शब्द गुंफावा. अर्थात मी स्वतः इतक्या पातळीला पोचलो नसल्याने त्यावर मी मतप्रदर्शन करू शकतच नाही. पण इतक्या बारकाईने जर बघायचे असेल तर अवघडच वाटते एकंदर गझल रचणे!

या गझलेत आदरणीय गझलकार चमत्कारी यांना मजा कसली आली ते कुणी सांगेल काय?
मला तरी मजा वगैरे आली नाही. ही गझल अंतर्मुख होण्यासारखी आहे.

गझल वाचता वाचता माझे मन हलवे झाले होतेच्.........पण शेवटच्या शेराने तर डोळ्यातुन पाणीच काढले.