आई !

 आई !

..........................
आर्त माझ्या पुकाऱ्यात आई ! 
या मुक्या कोंडमाऱ्यात आई !

डागण्या भास देई जिवाला...
त्या क्षणाच्या निखाऱ्यात आई !

हात पाठीवरी हा कुणाचा ?
वाहत्या सांजवाऱ्यात आई !!

मारतो आसवांतून हाका...
दूरच्या मंद ताऱ्यात आई !

औषधे, भाकरी, देव, पोथी ...
मज दिसे याच साऱ्यात आई !

शोधतो मी...मला सापडेना...
आठवांच्या पसाऱ्यात आई !

काय समजून समजायचे मी ?
बोलते हातवाऱ्यात आई!

श्वास नुसते न येती, न जाती...
वावरे येरझाऱ्यात आई !

मुक्त झाली...किती काळ होती  -
यातनांच्या पहाऱ्यात आई !

हे खरे...पान पिकलेच होते...
ती पहा त्या धुमाऱ्यात आई !! 

 - प्रदीप कुलकर्णी
 
गझल: 

प्रतिसाद

मारतो आसवांतून हाका...
दूरच्या मंद ताऱ्यात आई !
 

काय समजून समजायचे मी ?
बोलते हातवाऱ्यात आई!
 

मुक्त झाली...किती काळ होती  -
यातनांच्या पहाऱ्यात आई !
अतिशय व्याकुळ करणारी गझल. अतिशय आवडली. अप्रतिम.

गझल वाचून् डोळ्यात पाणी आले. .....aaNakhii kaay lihoo?

हृदयस्पर्शी गझल. खूप आवडली. तुमचे स्पष्टीकरण वाचून ते शेर आणखीनच खुलले. विशेषतः धुमारे.

आहे.

धन्यवाद सोनाली....प्रतिसादाबद्दल...
तुझी प्रतिक्रिया वाचून नीदा फाजली यांचा एक दोहा आठवला....
मै रोया, परदेस मे भीगा मां का प्यार...!
मन से मन की बात हुई बिन चिट्ठी, बिन तार...!
असो...मनाला आणि आठवणींना कोणत्याच, कसल्याच सीमा रोखू शकत नाहीत...म्हणूनच आपण सातासमुद्रापार असलो तरी आठवणींद्वारे क्शणार्धात आपल्या जिवलगांपाशी जाऊ शकतो...
प्रतिसादाबद्दल पुन्हा धन्यवाद ...
 

 धन्यवाद प्रणव...
भरभरून प्रतिसादाबद्दल.... धन्यवाद. तुझी गझल वाचली. वेगळी आहे...सविस्तार नंतर लिहितो...

चक्रपाणि...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद....!

करणारी गझल आहे प्रदीपजी...
ऑफिसमधे गझल उघडली. हातवार्‍यात - शेर वाचला आणि डेस्कवरून उठून बाहेर जावे लागले क्षणभर...
-- पुलस्ति.

व्वा प्रदिपजी,
अतिशय छान! पुढील गझलेची वाट पाहतोय...
शुभेच्छा
-नितीन

प्रदीप जी, गझल वाचून डोळ्यात पाणी यावे, असे माझ्या बाबतीत तरी पहिल्यांदाच घडले...
काळजाच्या आरपार जाणारा हा शेर-
मुक्त झाली...किती काळ होती  -
यातनांच्या पहाऱ्यात आई !

सलाम, तुमच्या प्रतिभेला!

सर्वस्व तुझिया पाई,
पुण्याई तुझिया थाई

आई म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचा रुणानुबन्ध ,

काय समजून समजायचे मी ?
बोलते हातवाऱ्यात आई!
 
वाह ! गझल आवडली

आई हा विषयच इतका जिव्हाळ्याचा आहे ना..... तुमच्या गझलेतली आई फार व्याकुळ करुन गेली.
मुक्त झाली...किती काळ होती  -
यातनांच्या पहाऱ्यात आई ! .......... हा तर अगदी आरपार गेला.

सारेच शेर मनाला भिडले.
साने गुरुजीच्या (आईविषयीच्या) साहित्यानंतर आयुष्यात कायमची स्मरणात राहिल अशी गझल.

प्रदीपजी...
नि:शब्द आणि नि:स्तब्ध झालो...
Hats Off!!!
Btw, font size कमी कमी का  गेला आहे??
चुभूद्याघ्या...
 

नमस्कार प्रदीपजी,

आई हा विषयच असा आहे की काळजाला हात घालतोच. मला माझ्या आईची आठवण झाली. तुमच्या प्रत्येक शेरात दिसणार्‍या आईच्या हालचालीत मला माझी आई दिसली. माझी आई गेली तेव्हा मी एक गझल तिला श्रद्धांजली म्हणून लिहिली पण ती अजून पूर्णावस्थेत नाही. असो खूप छान गझल वाचायला मिळाली. धन्यवाद.

श्वास नुसते न येती, न जाती...
वावरे येरझाऱ्यात आई !

कमाल केलीत प्रदिपजी !

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"


माझ्या भावना 'नेमक्या' व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद!! माझी आई ७ वर्षान्पूर्वी गेली...तरीही अजून ती प्रत्येक क्षनात असते....
        मनाला मोकलेपनाने आसवान्नी लपेतून घ्यायची सन्धी दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद!

-केतकी


प्रत्येक शेर काळजाला हात घालणारा! उत्कट आणि अप्रतिम गझल!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}