झुलवा

रात्रीला स्वप्नाने सजवा
स्वप्नाला अश्रूंनी घडवा


त्यांची दु:खे जेथे पिकती
तेथे तुमची कळकळ जिरवा


त्याच उड्या अन त्याच कसरती
खेळ संपता - तंबू हलवा...


नसे जाणता राजा आता
कशास कोणी खिंडी लढवा?


नेता म्हणतो, "सूर्य लपवला -
(जयद्रथांना खुशाल उडवा!)"


धर्म, राजसत्ता अन आम्ही
युगायुगांचा चालू झुलवा...

गझल: 

प्रतिसाद

पुलस्तिशेठ,
धर्म, राजसत्ता अन आम्ही
युगायुगांचा चालू झुलवा... सुंदर
गझल आवडली..
नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद  इथे वाचा  
केशवसुमार
( नंतर गझलेत बदल केलेले दिसतात)

पुलस्ति,
मतला,तंबू,खिंड हे शेर मस्त!
"जयद्रथ" च्या शेराचा नेमका अर्थ उमजला नाही.

जयन्ता५२

एकंदर सगळी गझल आवडली. आणि त्यातला
त्याच उड्या अन त्याच कसरती
खेळ संपता - तंबू हलवा...
हा शेर फार आवडला.

त्यांची दु:खे जेथे पिकती
तेथे तुमची कळकळ जिरवा
ह्या शेरातली ओळ जेथे जेथे दु:खे पिकती असाही वाचून बघितला.


रात्रीला स्वप्नाने सजवा
स्वप्नाला अश्रूंनी घडवावा...
वा...वा...वा...!!!
मला वाटते, तुम्ही दुसरा व तिसरा असे दोन शेर नंतर बदललेले दिसतात. मात्र, आधीचेच शेर मला जास्त आवडले होते. 

हे मला प्राचीन व अर्वाचीन राजकारणाचे जाणवलेले एक व्यवच्छेदक लक्षण आहे.
नेता = तत्कालीन यशस्वी राजकारणी
सूर्य = हे नेहेमीप्रमाणे "चांगल्या" चे प्रतीक - सद्सद्विवेकबुद्धी, कायदा, न्याय इ.इ.
जयद्रथ = "नेत्याने निवडलेल्या वाईटा" चे प्रतीक. हे वाईट नाही असे म्हणणे नाही, पण ते निवडलेले (targetted) आहे हा मुद्दा जास्त महत्वाचा.
मला अधोरेखित करायची आहे - निवडलेल्या वाईटाला संपवण्याची पद्धत. येथे तुम्ही बुश्-इराक घाला, गुजरात घाला...यापुढचा विचार वाचकाला करायचा आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद जयंतराव.
-- पुलस्ति.

त्याच उड्या अन त्याच कसरती
खेळ संपता - तंबू हलवा...

वावा! हा शेर सगळ्यात जास्त आवडला.
गझल चांगली आहे. आवडली. जयद्रथाचा शेर प्रथम वाचनात मलाही नीटसा कळला नाही. तुम्ही अर्थ सांगितल्यावर आता अजूनही विचार करतो आहे :)
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस