करारनामे

झाले करारनामे आले घरी लखोटे
नुसत्याच वायद्यांनी भरतील काय पोटे?

त्यांच्या विवंचनांची नाही कुणास पर्वा
पात्रात नर्मदेच्या ओलावतात गोटे

नाही कुणी भिकारी की भीक घालणारा?
दारिद्र्यही बिचारे झाले असेल थोटे

कोते विचार त्यांचे गाठीत गुंतलेले
त्यांचेच स्वच्छ ओटे, त्यांचे पवित्र लोटे

बंदूकही रिकामी अन लेखणी निकामी
नोटा किती मिळाल्या ते मोजतात बोटे

बोलून काय गेलो, ऐकू कुणास आले
जमले सभोवताली सारेच लाळघोटे

देवालयात केले देवास कैद आम्ही
लाचार माणसांचे हे विश्व फार छोटे

ते खोकले तरी मी भयभीत फार होतो
(मी मौन पाळणारा, ते बोलतात खोटे)

माणूस मी मराठी, पाट्याच टाकणारा
माझे गणित पक्के! धंद्यांत फक्त तोटे!

गझल: 

प्रतिसाद

उत्तम, गोटीबंद गझल. तबीयत खुश!
बोलून काय गेलो, ऐकू कुणास आले
जमले सभोवताली सारेच लाळघोटे
हा शेर फारच आवडला. क्या बात है!
ते खोकले तरी मी भयभीत फार होतो
(मी मौन पाळणारा, ते बोलतात खोटे)

वाव्वा! वेगळा आहे. कारण,
मी खोकलो तरी ते भयभीत फार होती
(मी मौन पाळणारा, ते बोलतात खोटे)
असे मला सुचले असते. मस्त. त्यात त्यांचे खोकणे सुरू झाले की 'आता हा नवे काय खोटे बोलणार' ह्याची भीती नाही. शेवटचा शेर लोक 'कोट' करतील असा आहे.

ते खोकले तरी मी भयभीत फार होतो
(मी मौन पाळणारा, ते बोलतात खोटे)

सुंदर..पण हे कंसात का लिहितात?
अभिजित
मी युगांचा उपाशी! मी गझलेचा अधाशी!!

ते खोकले तरी मी भयभीत फार होतो
(मी मौन पाळणारा, ते बोलतात खोटे)

ओघाने आलील अवांतर माहिती किंवा कारण देण्यासाठी अशा कंसांचा वापर करतात, असे मला वाटते. हे कारण थोडेसे तिरकस असू शकते.
उदाहरणार्थ, तो नापास झाला. (तो तसा हुशारही कुठे होता)

बोलून काय गेलो, ऐकू कुणास आले
जमले सभोवताली सारेच लाळघोटे

माणूस मी मराठी, पाट्याच टाकणारा
माझे गणित पक्के! धंद्यांत फक्त तोटे!

वावावा! मस्तच!
अतिशय उत्तम, दर्जेदार गझल!! तबीयत खुश!

बंदूकही रिकामी अन लेखणी निकामी
नोटा किती मिळाल्या ते मोजतात बोटे

अत्त्युत्तम...!

बोलून काय गेलो, ऐकू कुणास आले
जमले सभोवताली सारेच लाळघोटे
झकास...!

ते खोकले तरी मी भयभीत फार होतो
(मी मौन पाळणारा, ते बोलतात खोटे)
सुंदर...!
लिहीत राहा..! ! !

माणूस मी मराठी, पाट्याच टाकणारा
माझे गणित पक्के! धंद्यांत फक्त तोटे!
वा. वा. खूप खूप आवडले.

सुंदर गझल.
बोलून काय गेलो, ऐकू कुणास आले
जमले सभोवताली सारेच लाळघोटे
क्या बात है !

गझल अप्रतिम आहे. मक्ता सर्वात जास्त आवडला.  वा!

रचना उत्तम आहे पण `सुरेश भटीय' झाली आहे.

आपला प्रतिसाद पहायला उशीर झाला. असो माझा त्याला प्रतिसाद पुढील प्रमाणे आहे:
प्रोत्साहन तर देत आहेच पण गझल `भटीय' म्हणून सावधानतेचा इशारा ही देत आहे.
सुरेश भटांचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे, पण त्यातून बाहेर पडून स्वतःची शैली करणे महत्त्वाचे. उदा.
इलाही जमादार, घनःशाम धेंडे, अनंत ढवळे इ. तुमची गझल पाहिल्यानंतर फक्त भटांची आठवण होत असेल तर हा गझलकाराचा पराभव आहे, उमेदीत हे ठीक असते. तसेच कविवर्य सुरेश भटांचा प्रभाव जवळपास प्रत्येक गझलकारावर आहे ही चिंतेची गोष्ट आहे.

तसेच कविवर्य सुरेश भटांचा प्रभाव जवळपास प्रत्येक गझलकारावर आहे ही चिंतेची गोष्ट आहे.

काहीतरीच काय. माझ्यामते बिलकुल चिंतेची बाब नाही.  इलाही जमादार, घनःशाम धेंडे आणि आमचे प्रिय मित्र अनंत ढवळे ह्यांचा प्रभाव ओंकारवर असता तर ती अधिक चिंतेची बाब असती. असो विनोद सोडा. पण वरील कविवर्यांवरही 'भटीय' प्रभाव दिसत नाही काय! 'भटीय', रिवायती म्हणून चांगल्या लिखाणाला खारिज करता येणार नाही, करू नये. हे बहाणे आहेत.

तसेच वेगळे लिहायचे आहे, त्यातही भटांपेक्षा वेगळे लिहायचे आहे म्हणून उगाच फुसकुल्या सोडल्यासारखे शेर लिहिण्यात काही अर्थ नाही. वेगळे, मॉडर्न-जदीद लिहिण्याच्या नादात आपले काव्य मरतुकडे होते आहे की काय ह्याचा विचार करायला हवा, असे माझे प्रामाणिक मत आहे.

सुंदर गझल... सगळेच शेर आवडले. वा! वा! वा!
बोलून काय गेलो, ऐकू कुणास आले
जमले सभोवताली सारेच लाळघोटे

देवालयात केले देवास कैद आम्ही
लाचार माणसांचे हे विश्व फार छोटे ..
. सुंदर
- कुमार

मी सहमत नाही पूर्णपणे आपल्याशी.
इलाही जमादार, घनःशाम धेंडे आणि आमचे प्रिय मित्र अनंत ढवळे यांच्या गझला आणि भटांच्या गझला ठेवल्या तर नक्कीच कोणती गझल कोणाची आहे हे सांगता येईल.
माझा आग्रह नुसता मॉडर्न-जदीद  नसून सकस मॉडर्न-जदीद आहे. भटांच्या कल्पना, रूपकं, शब्दप्रयोग इ वापरून फार काही साधता येईल असे वाटत नाही.
मी पुढील बाबतीत आपल्याशी पूर्ण सहमत आहे:
तसेच वेगळे लिहायचे आहे, त्यातही भटांपेक्षा वेगळे लिहायचे आहे म्हणून उगाच फुसकुल्या सोडल्यासारखे शेर लिहिण्यात काही अर्थ नाही. वेगळे, मॉडर्न-जदीद लिहिण्याच्या नादात आपले काव्य मरतुकडे होते आहे की काय ह्याचा विचार करायला हवा, असे माझे प्रामाणिक मत आहे.

इलाही जमादार, घनःशाम धेंडे आणि आमचे प्रिय मित्र अनंत ढवळे यांच्या गझला आणि भटांच्या गझला ठेवल्या तर नक्कीच कोणती गझल कोणाची आहे हे सांगता येईल.

कोणती गझल कोणाची आहे हे सांगणाऱ्याला सांगताही येईल. पण भटांचा प्रभाव ह्या कविवर्यांच्या कुठल्या गझलांवर कुठे दिसतो आहे हेदेखील सांगणाऱ्याला सांगता येईल.

भटांच्या कल्पना, रूपकं, शब्दप्रयोग इ वापरून फार काही साधता येईल असे वाटत नाही.

माझ्यामते भटांच्या कल्पना, रूपकं, शब्दप्रयोग वापरले तर काहीच हरकत नाही. (भटच कशाला अनंत ढवळे ह्यांची रूपक, कल्पना, शब्दप्रयोग वापरायला हरकत नाही) पण वरील गोष्टी वापरताना कवीचा वेगळेपणा दिसायला हवा. त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व त्यात दिसायला हवे. गायकीच्याभाषेत म्हणायचे तर उसमें कहन चाहिए. पूर्वापार चालत आलेल्या कल्पना, रूपकं, शब्दप्रयोग इ.  कबीर,  तुकाराम ह्या संतकवींनी बरेच काही साधले आहे.

कबीर "निंदक नेडा राखिए आँगन कुटी बंधाई" म्हणतात. तर तुकाराम 'निंदकाचे घर असावे" शेजारी म्हणतात. अभ्यास करून बरीच उदाहरणे देता येतील. पण ह्या दोघा महान कवींनी फार काही साधता आले नाही असे म्हणाल काय?

माझ्या मते, चांगल्या ओळीला, कवितेला-गझलेला आधी दिलखुलास दाद द्यावी. ती जदीद आहे की रिवायती ह्या गोष्टी नंतर बघाव्यात. ही सतत भोके शोधण्याची वृत्ती आम्ही सगळ्यांनीच सोडायला हवी. 

जाता-जाता
जमादारांच्या 'अब मैं राशन के कतारों में नजर आता हूं' ह्या गझलेबाबत आपले काय म्हणणे आहे?
ती फारच वेगळी आहे आणि लगेच ओळखताही येते जमादारांची आहे म्हणून.

भटांच्या कल्पना, रूपकं, शब्दप्रयोग वापरले तर काहीच हरकत नाही, पण आपलं  ही काही तरी दिसावं इतकीच अपेक्षा, (जी इलाही, धेण्डे, अनंत पूर्ण करतात असे वाटते). वरील गोष्टी वापरताना कवीचा वेगळेपणा दिसायला हवा- अगदी मना॑तले बोललात. माझ्या एका गझलेचे उदा. देतो:
अताच बहरून रूपगंधा मिठीत आली नव्यानव्याने
अताच माझ्या-तुझ्या सुखाची पहाट झाली नव्यानव्याने
इथे कुठेच समीर चव्हाण दिसत नाही. हे एक गझलकार म्हणून मला अस्वस्थ करणारं आहे.
 करारनामे  याचा मत्ला वाचल्यावर भटांच्या वायद्यांनी भरत होते ही गझल आठवली.
मी ANTI-रिवायती नाही, पण रिवायतीत आजकाल मन रमत नाही हे ही खरेच आहे.
असो तुमच्या शी संवाद साधताना मला दोन-चार गोष्टी शिकायला मिळाल्या, मला माझ्या विचारांना चाचपण्याची संधी मिळाली.
धन्यवाद.

गझल वाचायला फार सुरेख वाटते पण कवीला कशावर भाष्य करायचे आहे याचा नीट उलगडा होत नाही.
उदा.
झाले करारनामे आले घरी लखोटे
नुसत्याच वायद्यांनी भरतील काय पोटे?

या ओळींमधुन नककी काय सुचवायचे आहे?
आणखी एक शंका,

त्यांच्या विवंचनांची नाही कुणास पर्वा
पात्रात नर्मदेच्या ओलावतात गोटे

या दोन ओळींमध्ये परस्पर सबंध काय?
(मी काही गझलेचा जाणकार नाही, फक्त गझल वाचायला आवडते , तेव्हा कोणी शंकांचं निराकरण केल्यास  फार बरे वाटेल)

अभिजीत,
हा हा हा हा. फार मनातला प्रश्न विचारलात. कंसात का लिहितात.
समीर,
मान गये. आपके और हमारे खयाल मिलते जुलते है!

बाय द वे, या सगळ्या गझलेत ' ते ' म्हणजे कोण??

श्री कुशल,
मी आपले कुशल मंगल चिंततो. प्रामाणिकपणे सांगतो की मला आपल्या शंका अत्यंत रास्त वाटत आहेत. विचारत रहा. विचारत रहा. खरे तर आपणच मला गझलचे जाणकार वाटत आहात. कृपया हे बोलणे उपरोधिक वगैरे समजू नका. विनंती आहे.

रचना उत्तम आहे पण `सुरेश भटीय' झाली आहे.
ज्या काव्यासोबत कविवर्य सुरेशजींचे नाव जोडायचे आहे ते उत्तम आहे हे पुन्हा कशाला सांगायचे ? खरे तर विचार ज्या-त्या कवीचाच असतो. एकच भाव, एकच पद्धत दोन कवी वापरू शकतात.

आपल्याला Faiz च्या वाटेने जायचे की Sahir-Faraaz ह्यांच्या ही निवड आपापली आहे!

प्रतिसाद देताना, टीकाटिपण्या करताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात ही विनंती:

१. हे संकेतस्थळ गझल सादर करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. गझललेखनासाठी केवळ एक साधन आहे. साध्य नाही.
२. टीका लिखाणावर असावी. लेखकावर नसावी.
४.
टीकाटिपणी करताना मुद्दा सोडून दिलेले आक्षेपार्ह उल्लेख, परिच्छेद,
वाक्ये, शब्द काढून टाकण्यात येतील. उदा. कोण कुणासारखे लिहिते, इथे
कशाप्रकारचे लिखाण आहे वगैरे वगैरे...
५. आक्षेपार्ह वाटणारे प्रतिसाद, लिखाण सदस्यांना विश्वस्तांना निदर्शनास आणून द्यावे. योग्य ती कारवाई केली जाईल.

कृपया सर्वांनी सहकार्य करावे.

**** विश्वस्त महोदय मी कुणाचे नाव घेऊन टिका केलेली नाही. इथे मी फक्त काही उदाहरणे दिली आहेत याची नोंद घ्यावी ****

अल्बम : करार - गायक हरीहरन (१९९५-१९९६)
गझल : बाटे है जिसने सारे जुगनू दिये सितारे
हम पर नही उतारे जुगनू दिये सितारे
मै तुमसे बात करके रोशन हुवा हूं कितना
सारे सुखन तुम्हारे जुगनू दिये सितारे
सूरज इस जमी पर मुद्दत हुवी न आया
अपने यही सहारे जुगनू दिये सितारे
- नसीम शहर
अल्बम : Cry for Cry (1994-1995)गायक : जगजीत सिंग
अब मै राशन की कतारों मे नजर आता हूं
अपने खेतोंसे बिछडने की सजा पाता हूं
- खलील धनतेजवी
गझल संग्रह: भावनांची वादळे - इलाही जमादार (२९ मे २००१ )
१) माझ्याभवती माथ्यावरती दिवे काजवे तारे
तिमिरामधले खरे सोबती दिवे काजवे तारे
तुझ्या जराशा सहवासाने तेजोमय मी झालो
हवी कशाला अजून पणती दिवे काजवे तारे

२) मी रेशनच्या रांगे मध्ये उभा राह्तो आता
शिवार विकुनी आल्याची मी सजा भोगतो आता

-----------**** -----------------

हा ह्याचा चमचा.. तो त्याचा चेला...
जो ना चमचा ना चेला... तो मेला...
- ६४-बिट्स
गझलकाराची स्वतःची शैली व गझलकाराची स्वतःची ओळ्ख म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे ? 'नसत्या' शैली पेक्षा स्व. सुरेश भटांची शैली अंगिकारलेली परवडली की ....
अलीकडे उचल्यांचे चेले-चमचे आपापल्या तथाकथित गुरूची जीव तोडून चमचेगिरी करताना दिसतात. स्व. सुरेश भटांच्या गझलेला कमी लेखणं हा त्या चमचेगिरीतला सर्वात मोठा भाग.

**** विश्वस्त महोदय मी कुणाचे नाव घेऊन टिका केलेली नाही. इथे मी फक्त काही उदाहरणे दिली आहेत याची नोंद घ्यावी ****


६४-बिट्सजी,

बहुत बहुत शुक्रिया|

आम्हालाही `ती' गझल कुठे तरी ऐकल्याचं जरा जरा  आठवत होतं.

पण नेमकं सांगता येईना.

तुम्ही तर धादांत पुरावाच पेश केला.

मग आमचीही ट्युब पेटली.

ह्याला म्हणतात गझलचा अभ्यास. मूळ शायरच्या नावासह संदर्भ दिलात .व्वा भई व्वा!

ते काय म्हणतात त्याला - हा सूर्य अन हा जयद्रथ - घ्या बघून

अल्बम : Cry for Cry (1994-1995)गायक : जगजीत सिंग
अब मै राशन की कतारों मे नजर आता हूं
अपने खेतोंसे बिछडने की सजा पाता हूं
- खलील धनतेजवी


मी रेशनच्या रांगे मध्ये उभा राह्तो आता
शिवार विकुनी आल्याची मी सजा भोगतो आतागझल संग्रह: भावनांची वादळे - इलाही जमादार (२९ मे २००१ )

अब इसे क्या कहे , क्या नाम दे |

खरंच ह्याला नेमकं काय म्हणता येईल हो ?

याला काय म्हणावे ?

अपुन के तो कुछ भेजे मे  नही आरेला भई |

या इलाही ये माजरा क्या है ?


(६४-बिट्सजी, जरासी मेहनत आणखी घेतली तर  असा भरपूर माल सापडण्याची शक्यता आहे. मराठी गझल तुमची कायम ऋणी राहील.)

विश्वस्त : या प्रतिसादातील आक्षेपार्ह भाग संपादित केला आहे

इथे मी कुणाचेच वकीलपत्र घेऊन आलेलो नाही तसेच भावनाविवश होऊन ही लिहीत नाही.
श्री ६४ आपले आभार की आपण इलाही जमादारींची उदूतील उचलेगिरी या साईटवर आणली.
(माहितीसाठी हे काम अगोदर राऊतांनी केलेले आहे, मी पण वरील यादीत दोन-एक शेर जोडू शकतो).
स्गळ्याच गझलकारांनी काळजी घ्यावी की कधीही ही वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नये. शेवटी इ़क्बाल  म्हणतो:
तकलीद की रविशसे तो बेहतर है खुदखुशी
रस्ता भी ढूंढ, खिज्र का सौदा भी छोड!

तेच मला पटते, मी ही याच विचारांचा आहे. माझी मागणी अजून आहे. ज्याप्रमाणे इलाहींच्या गझलेची तपासणी आपण काटेकोरपणे केलीत तशी प्रत्येक गझलकाराची (लक्षात ठेवावे कलानिमीतीत  supremum exist होत नाही!) प्रत्येकाने केल्यास गझलेचा फायदाच होईल. कुठल्याही एका प्रभावाखाली राहू नये म्ग भले तो किती ही मोठा असो. परत सांगतो इथे personal level वर मी काहीच बोलत नाही.

मला धक्का बसला. ह्याला काय अर्थ आहे? तोच मुद्दा, तीच शब्दरचना? श्री ६४, मी राशन गझल ऐकली पण होती अन मराठी पण वाचली होती. पण तुमच्या सारखे ते लक्षात आले नाही कारण नक्कीच माझा इतका अभ्यास नाही. आपल्याबद्दल माझा आदर वाढला आहे. पण काहीही असो, ही बाब धक्कादायक आहे.
मात्र एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आपले जे विधान आहे की ' नसत्या' शैलीपेक्षा भटांची शैली वापरण्यात चूक काय? ते मला पटत नाही. शैली, प्रतिभा, शब्दसंख्या, विषयांची संख्या या गोष्टी प्रत्येकात वेगळ्या असणार. मुद्दामहून दुसर्‍याची शैली किंवा इतर काही वापरणे म्हणजे काय हे मला समजतच नाही. असे मुळात एखाद्याला वाटते हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे ' दुसरे भट' किंवा ' या युगाचे भट' होणे हे ध्येयच नसावे. घ्यायचेच तर भटांकडून तंत्र घ्यावे. थीम, आशय, विषय, शब्द, या गोष्टी का घ्यायच्या? त्यांचे अनुभव आणि आपले अनुभव वेगळे नसणार काय? तंत्र या विषयावर मी बोलणे म्हणजे विनोद आहे, पण मुद्दा विचारात घ्या अशी विनंती आहे. आपल्याला जे ' आपले' म्हणून सांगायचे आहे, ते जर दिलखेचक पद्ध्तीत सांगता येत नसेल तर मान्य करावे. जसे मी उघड म्हणतो की मी तंत्रापासून बराच लांब आहे. पण जे भटांना सांगायचे होते तेच आपण का सांगत बसावे?
मला आशा आहे की यातून काहीही गैरसमज पसरणार नाहीत.

देर लगी आने मे तुमको शुक्र है फिर भी आए तो...
आस ने दिल का साथ ना छोडा वैसे हम घबराए तो..
बहूतेक... बदायुनी साहेबांचा आहे.

उशीर झाला तुला यायला अखेर तू आलास तरी...
तगमग झाली जरी जिवाची सुटली नाही आस तरी...
इलाही....

श्री. ६४ बिट्स...(अजंता मेंडीस.) 
मलाही या पिढीवर(मी वयाने मोठा नाही तरीही.)  स्व. भट साहेबांचा प्रभाव जाणवतो.. तो असणंही सहाजीकच आहे...
तरी पण ते चुकीचं वाटतं. त्या गझलांना दाद देण्याची पण इच्छा होत नाही..
हापशी च्या पाण्याचं अनुकरण होण्यापेक्षा दुधाचं अनुकरण होणं जास्त चांगलं... हा विचार मनात आणून गाडी पुढे ढकलायची... असेच सुरू आहे...
बाकीचेही असेच करतात... समीर साहेबांनी या मुद्याला वाचा फोडली हे छान झालं..
अमोलनेही (शिरसाट) या मुद्यावर चित्तदां सोबत चर्चा केली होती  मराठी गझल.कॉम वर..
http://www.marathigazal.com/node/302#comments
चर्चा छान होती शक्य झाल्यास वाचावी...

बाळ भूषण,
भेटलेली माणसे स्वार्थी होती, लबाड होती. खरे ऐकायला मिळाले की दूर करायची. स्वतःच्या वर्तुळात प्रवेश घेऊ द्यायची नाहीत. प्रसिद्धीच्या मागे असायची. दुसरा जो खरा गुणी आहे तो पुढे येऊ नये यासाठी काहीही मार्ग अवलंबायची. एकंदर अन्याय झाल्याची भावना.
हे तुझे मोठ्ठे मोठ्ठे विचार वाचले होsss मी, बाळा---
सोन्या,  तुला असं म्हणायचंय का  ? -की  कै. सुरेश भटांच्या नंतर सर्व लोक दानी झाले , सगळे सत्याची पूजा करू लागले आणि सत्यवानांना समाजात मान मिळू लागला. सगळे जण प्रेमाने एकमेकांना आपापल्या वर्तूळात घेऊ लागले, सगळे प्रसिद्धी-पराडःमुख झाले , आता कुणाला प्रसिद्धीची हाव नाही. गुणी लोकांना संधी मिळू लागली आणि ते पुढे येऊ लागले. सगळ्यांना न्याय मिळून राम राज्य आले --
असं सगळं सगळं छान छान झाल्या सारखं ज्याला ज्याला वाटतं त्यानं त्यानं त्याच्या गझलेत, कवितेमधे तसं जरूर  लिहावं , तू पण लिही, कुणी  थांबिवलं बाळा तुला?तू मला त्याचं नाव सांग बघू, मी त्याला रागं भरेन हो sss. आता असं बघ,  तुझ्या खूप सदोष रचना त्या संपादक काकांनी विचाराधीन केल्या, तर तू लगेच तुझं दु:ख तुझ्या पुढच्या रचनेत मांडतोस,  अगदी  खूप खूप वाईट वाटतं तुला त्याचं... हो की नाही ? मग  दुसर्‍याच्या गझलेला  'ही गझल भटांसारखी गझल आहे, कारण त्यात स्वतःवर अन्याय झाल्याची भावना आहे '  असं का  बरं म्हणावं ?
या उपर दुसरा मुद्दा गझलेत लिलेले सर्व काही स्वतःच्या आयुष्यात घडलेलं असलंच पाहिजे असं कोणी सांगितलं तुला बाळा ? तू त्याचं नाव सांग बघू, मी त्यालाही रागं भरेन हो ssss.  दुसर्‍याच्या बाबतीत घडलेलेही अनुभवही गझेलेत मांडता येतात.  गझलेतला 'मी' हा   प्रातिनिधीक आहे, बाळा, या पुढे लक्षात ठेव हो ssss. खूप शीक आणि मोठ्ठा हो.
माणसांचे दु:ख माझे बनत आहे
सोसताना मी नव्याने घडत आहे

                       - कै. सुरेश भट
                                                                      - तुझे प्रेमळ आजोबा

हा हा हा हा! मस्त उत्तर आहे. मुद्दे पण पटतायत.
लिहिण्याची शैली आवडली.
फक्त मला एवढे म्हणायचे होते की तशाच थीम मधे गझल का लिहिल्या जातात?
उदा: कै. भट यांची रचना:
हेही असेच होते तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते
केले न बंड कोणी त्या घोषणाच होत्या
ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते
आता ही रचना:
झाले करारनामे आले घरी लखोटे
नुसत्याच वायद्यांनी भरतील काय पोटे?

त्यांच्या विवंचनांची नाही कुणास पर्वा
पात्रात नर्मदेच्या ओलावतात गोटे
कोते विचार त्यांचे गाठीत गुंतलेले
त्यांचेच स्वच्छ ओटे, त्यांचे पवित्र लोटे

कृपया काहीही व्यक्तिगत समजू नये.
ही रचना अर्थातच चांगली आहे.
पण कवीच्या मनातील भावना साधारण सारख्या वाटतात असे माझे मत आहे. बर तसे होणारच कारण आपण म्हणताय की त्याच भावनाही येऊ शकतात व परकाया प्रवेश हाही कवि करतच असतो. मग सादरीकरण का तसेच? आपण आपल्या मिश्किल शैलीतच सांगा. मजा येते.

बाळा भूषण,
मी तुला काही दुवे देतो ते वाच बघू आधी. सावकाश वाचलेस तरी चालेल पण, नक्की वाच होsss.
ही एक चर्चा आहे अदृश्य पट्टा या गझलेखालची.
(हे शेर गाळ्ले तर बरे )http://www.sureshbhat.in/node/797#comment-3139 इथे गझलेतील नाविन्या बद्द्ल चर्चा केली आहे. मी  फक्त वाचली ती . पण त्यातील ६४-बिट्स काकांचे काही मुद्दे  बरोब्बर आहेत. त्या मुद्यावरून लक्षात येतं की  तेच तेच विचार/खयाल असले तरी त्यांची माडणी आपण कशी  करावी यातच खरं कसब आहे.
जागात प्रामुख्याने - सर्व विचार हे " चांगलं आणि वाईट" या २ मुख्य विचारांचेच उपविचार आहेत. या दोनच विचारांची वेगवेगळी रुपं आपल्या समोर गझलेतून, कवितेतून येत असतात.
यादगार काकांनी ६४-बिट्स काकांना पुढे काय सांगितले ते सुध्दा वाच होsss बाळा.
(नाविन्याची व्याख्या) http://www.sureshbhat.in/node/797#comment-3144
>> कारण प्रत्येक वेळी ताजी पोळी कशी मिळ्णार ? पोळी ताजी असली तरी पीठ तर  ताजं नसणार, पीठ ताजं असलं तरी गहू नक्कीच ताजे नसणार :))  गहू तयार करणारे जमीन व पाणी हे २ घटक तर काही कोटी वर्ष जुने आहेत ते कुठून  आणायचे ताजे ताजे ?  <<
बाळा, हे सगळं वाचल्यावर मग तुला कळेल की ॐकार यांची गझल वेगळ्या प्रकारे लिहिली गेली आहे (उपमा, शब्द, कल्पना, काफिया, रदीफ इत्यादी ) पण तरी सामायिक स्वरूपाचे विचार मांडत आहे.  सामायीक विचार आणि तेच तेच विचार ह्यात खूप फरक आहे, बाळा.
आपल्याकडे  अनेक गझलकार आहेत जे, तोच तोच खयाल परत मांडतात. मी त्याला चूक मानत नाही, कारण अजून नव्या प्रकारे, आधिक दमदारपणे तोच, विचार पुन्हा मांडायची  तीव्र इच्छा  गझलकाराला स्वस्थ बसून देत नाही.
                                                                                                - तुझे प्रेमळ आजोबा

खरे.. व्यर्थ वाटेल खोटे पुन्हा..
पुरे.. खूप झाला खुलासा तुझा..

(अमित वाघ)

खतावार समझेगी दुनिया तुझे
अब इतनी  जियादा सफाई न दे...
(बशीर बद्र)

वृतही तेच आहे...तरी पण ते चुकीचं वाटतं. त्या गझलांना दाद देण्याची पण इच्छा होत नाही..

परखड

खतावार समझेगी दुनिया तुझे  हे जसे च्या तसे कुठे घेतलय अमितने ? छे: ही काही खरी  नक्कल नाही. मला नाही आवडली ! खरी नक्कल असली तरच मी दाद देणार जशी मोठमोठ्या नक्कल-खोरांना देतो.
- खरी नक्कल

मला वाटतयं अशातल्या या चर्चा पूर्णत: भरकटल्या आहेत्..

अगदीच नव्याने लिहू लागलेल्या माझ्या कवीमित्रांना जरासे थांबण्याचा, जीवनाकडे आणि आपल्या कवितेकडे गांभीर्याने बघण्याचा सल्ला द्यावासा वाटतो..शिवाय कवितेमधे दोन अधिक दोन बरोबर चार असे काही ठोस आणि अपरिवर्तनीय निकष लावता येत नाहीत्..अत्यंत सपाट जमीनीत देखील चांगले शेर येऊ शकतात, तसेच नाविन्याच्या नावाखाली अत्यंत पोकळ गझला देखील संभवतात. मी गेली अनेक वर्षे मराठी गझलेमधील नाविन्याचा पुरस्कार करतोय, पण हे करताना मला आधीच्या गझलांवर वाटेल तशी , निराधार टीका करण्याची कधी आवश्यकता वाटली नाही. कविता, विशेषतः गझल, परंपरेच्या आधारनेच वाटचाल करताना दिसून येते..याचा मर्यादित अर्थ घेऊन , जुन्या कवींचे सर्रास अंधानुकरण करणे जितके अयोग्य आहे, तितकेच या कवींचे समग्र कवित्व एका फट्क्यात नाकारने देखील आहे.

आपली परंपरा, आपली भाषा, आपल्या साहित्याचे सामाजिक, सांस्क्रुतिक आणि ऐतिहासिक संकेत या सर्वांचच्या परिवेशात कुठलेही  साहित्य वाटचाल करत असते. या सर्वांचे भान ठेऊन , आपल्या संवेदनेच्या जास्तीत जास्त जवळ जाणारी कविता लिहिणार्‍या कविंच्या कविता कालातीत ठरल्याचे दिसून येते. 

कवीमित्र हे बौद्धिक सूड्सत्र थांबवून आपल्या कवितेवर लक्ष केंद्रित करतील अशी अजूनही आशा वाटते..

निरोप वाचा
प्रेषक: अनंत ढवळे.
प्रति : अमित वाघ.

विषय: अब इतनी जियादा सफाई न दे
दिनांक: रवि, 03/02/2008 - 05:47

खरे.. व्यर्थ वाटेल खोटे पुन्हा..
पुरे.. खूप झाला खुलासा तुझा..


हा शेर चांगला आहे.खर तर एक उर्दू शेर असाच आहे,
खतावार समझेगी दुनिया तुझे
अब इतनी  जियादा सफाई न दे... (बद्र ?)
मला वाटते हा योगायोगही असू शकतो..
आपले मत अवश्य कळवावे.निरोप वाचा
प्रेषक: अनंत ढवळे.
प्रति : अमित वाघ.
विषय: उत्तर: अब इतनी जियादा सफाई न दे
दिनांक: शुक्र, 07/18/2008 - 03:24

> योगायोग आहे..
आणि तो ही सारख्याच वृत्तात...
बद्र साहेबांचा शेर जास्त छान वाटतो...
मी लिहिला कारण असा अनुभव आला होता एका मित्राचा...
धन्यवाद...
अमित ,
योगायोगच आहे...

पहिला निरोप ढवळे साहेबांनी पाठवला होता...
पण मला त्यावेळेस त्यांना उत्तर देता आले नाही....
मी ते लिहिले पण होते(दुसरा निरोप...)....
परंतु त्यावेळेस संपादना ची सोय नव्हती म्हणून गझल संपादित पण नाही करू शकलो...
खरं.. खरं... सांगतो परखड भाऊ...
आणि तुमची शप्पथ आजोबा....
खरंच तुमच्या डोक्याची शप्पथ...
आणि नक्कल दादा मी नक्कल नव्हती केली हो...
ती झाली चुकून...
वाटलंस पुन्हा देतो..

कुठे रहिला अर्थ श्वासा तुझा....
अरे... होत आहे उसासा तुझा....(१)

खरे.. व्यर्थ वाटेल खोटे पुन्हा..
पुरे.. खूप झाला खुलासा तुझा..(ह्या शेरा बद्दल थोडं उशीरा कळलं)

चुकीची तुला भेटली बातमी.!!!
तरी छान होता.. दिलासा तुझा..(२)

कुठे पाळला आजवर शब्द तू..
कसाकाय ठेवू भरोसा तुझा...( शेर 'टिपिकल' झालाय हे तेव्हाच मान्य केलेय)

जरी ओळखीही नसे आपली..
तरी हात हाती हवासा तुझा...(३)

अमित वाघ.
''गुरुमंदिर'', सुधीर कॉलनी. अकोला- ४४४००१.
मो. क्र. ९९२१६११६११; ९८५०२३९८८२.
( एक नं सध्या बदललाय...९९२१६११६११ ऐवजी ९७६६६ ९७६६७.)
१,२,३ शेर मला तरी वाटतं की माझेच आहेत...
www.gazalnavihotanna.blogspot.com

मला वाटतं बर्याचदा असंही होत असावं की आपण कुठेतरी एखादा चांगला शेर वाचतो / ऐकतो, आणि नंतर कधीतरी त्याचे पड्साद आपल्या कवितेत ऊमटतात्..पुढील उदाहर्णे पहा
इश्क ने खूं किया है दिल जिसका
पारा ए लाल हुआ अश्क उसका
बेकसी मुझसे आशना है सिराज
नईं तो आलम में कौन है किसका
( सिराज औरंगाबादी )
मूं तका ही करे है जिस तिस का
हैरती है ये आईना किस का
शाम ही से बुझा सा रहता है
दिल हुआ है चराग मुफलिस का
( मीर तकी मीर )
तसेच,
आरजुएं  ह्जार रखतें हैं
तो भी हम जी को मार रखते हैं
( मीर)
हजारो ख्वहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकीन फिर भी कम निकले
( गालीब)
मला वाट्तं की जीवनाबद्द्लचे काही विचार, काही प्रश्न सर्वच प्रतिभावंताना पडत असतात्..त्यामुळे कल्पना साधर्म्य असेल तर त्यात चौर्याचा दोष येत नाही.. गझलेच्या बाबतीत यमक आणि अंत्ययमके साधारण तीच ती असल्याने बर्‍याच गझला सारख्याच वाटतात.
यमकाचा विषय निघाला म्हणून सांगावेसे वाटते, बर्‍याच गझला या आधी अंत्ययमक आधी ठरवून लिहिल्यासारख्या दिसून येतात. या गझला अधून मधून ऐकावयास बर्‍या वाटत असल्या, तरी त्यातून फारसे काही हाती लागत नाही...
 

ते खोकले तरी मी भयभीत फार होतो
(मी मौन पाळणारा, ते बोलतात खोटे)

वाव्वा! वेगळा आहे. कारण,
मी खोकलो तरी ते भयभीत फार होती
(मी मौन पाळणारा, ते बोलतात खोटे)
हा बदल छान आहे...
               "सुरेश भटीय" असे जर कोणी म्हणत असेल तर तो गझलकाराचा पराभव नसून
"ती एक उत्तम गझलेला मिळालेली दाद आहे" असेच मी म्हणेन...
मराठी गझल हा काव्यविधाच सुरेश भट यांच्या प्रभावाखाली आहे.
९०  टक्क्याहून अधिक लोक सुरेश भट यांन फॉलो करतात. (फॉलो म्हणजे शब्दशः अनुकरण नव्हे  ). मी स्वतः  या ९० टक्यामध्ये आहे.
इतर जे  "स्वयंभू" (?) आहेत त्यांची चिंता करण्याचे कारण नाही..
गझल उत्तम जमून आली आहे..

त्यांच्या विवंचनांची नाही कुणास पर्वा
पात्रात नर्मदेच्या ओलावतात गोटे
कोते विचार त्यांचे गाठीत गुंतलेले
त्यांचेच स्वच्छ ओटे, त्यांचे पवित्र लोटे

बंदूकही रिकामी अन लेखणी निकामी
नोटा किती मिळाल्या ते मोजतात बोटे
ते खोकले तरी मी भयभीत फार होतो
(मी मौन पाळणारा, ते बोलतात खोटे)
कुणीतरी एका साध्या शंकेचे निरसन कराल काय?  या शेरांमधले 'ते' म्हणजे कोण?

माफ करा पण माझ्या वरील प्रश्नाचे उत्तर कुणीतरी द्यावे.
हे ' ते ' म्हणजे कोण????????
'ते' कोण आहेत यावर अक्षरशः संपूर्ण पाच शेर अवलंबून आहेत.
हेच ते शेर ज्यावर भल्याभल्यांनी शाबाशी दिली. मला शायराला शाबाशी मिळण्याबाबत काहीही मत्सर नाहीये. मला हे समजून घ्यायचय की शाबाशीस पात्र असा शेर कशावरून ठरवला जातो.
तंत्र?
शब्दरचना?
आशय?
सर्वांचे मिश्रण?
मिश्रण असेल तर आशय समजलाच पाहिजे.
आणि मलाच समजत नाही अशी शंका असेल तर माझे आव्हान आहे, की या शेरांमधला शब्दार्थ मला दाखवून द्यावाच.
 
 

यादगार,
तुमच्यामते तुमच्या प्रश्नात उत्तराची सुरुवात आहे. याचा अर्थ उत्तर तुम्हाला माहिती आहे. मग सांगुनच टाकावेत.
 

चांगला प्रतिसाद दिलात. आता एकदाच भरवा की?


 
श्री यादगार यांचा प्रश्न
शनि, 09/06/2008 - 18:57 — यादगार
उत्तरं मिळण्याची शक्यता

भूषण महाशय,
अजून असाच पण चौफेर विचार करा काही दिवस ....  त्या ५ शेरातले 'ते' देखील कळून येतील.
माणूस स्वतःचं स्वतः  शोधून  जितकी उत्तरं शोधू शकतो तितकं चांगलं कुणीच  समजावू शकत नाही. मी पण नाही....
ज्या ज्या शेराचा अर्थ कळ्णार नाही त्या त्या शेराची पडताळ्णी पाउस(३) मधे बिट्स-६४  यांनी
दिलेल्या नियमांशी करून विचार सुरू करा.

प्रथम शेर वाचून त्याचा जो अर्थ तुम्हाला उमगतो तो आधी मांडा.  मग संबंधित गझलकारास किवा जो चर्चा करत आहे त्याला, तुम्हाला उमगलेला अर्थच अभिप्रेत आहे का या बाबत पडताळणी करा.
जर कोणाला  एखाद्या शेराचा अर्थ विचारलात तर तो तुमच्याच बौद्धिक क्षमते बाबत शंका घेऊन उत्तर देण्याचं टाळण्याची शक्यता जास्त आहे.
तेव्हा : अमूक एक शेराचा अर्थ तुम्हाला जसा वाटतोय तसाच अर्थ गझलकारालाही अभिप्रेत आहे का  ? अशी जर भूमिका तुम्ही घेतलीत तर तुम्हाला उत्तरं मिळण्याची शक्यता बरीच आहे.
माझे उत्तरः
श्री यादगार,
१. प्रतिसादसाठी धन्यवाद.
२. प्रतिसाद इन्ट्रेस्टीन्ग आहे.
३. मला कृपया गालीब, मीर, मोमीन, दाग, जौक, सौदा यापैकी कुणाचाही एक शेर दाखवा की जो त्या भाषेचे ज्ञान असणार्‍याला समजू शकणार नाही.
४. सदर गझलेत मी अर्थ विचारतो आहे हा मुद्दा आपण जशाच्या तसा घेतलात. मला असे म्हणायचे आहे की या गझलेत शायराला अभिप्रेत असलेला अर्थ प्रत्येकाला समजेलच असे नाही. मुद्दा असा आहे, की एकापेक्षा जास्त अर्थ नसावेत काय? जरूर असावेत. पण इथे निदान एकतरी अर्थ जाणवायला पाहिजे ना? मला हे अजिबात पटत नाही की एक गझल रचल्यावर शायराने तिचा अर्थ लावणे रसिकावर सोडावे. रसिकाने चेक करावे त्याच्याबरोबर की बाबारे मला वाटतय तेच तुला म्हणायचंय का काहीतरी तिसरेच मनात आहे हे माझ्यामते अयोग्य आहे. पुन्हा एकदा आजोबांनी ज्यावर संमती दर्शवली होती तो आगाजान ऐश चा गालीबवरचा शेर लिहितो:
मजा कहेनेका जब है के एक कहे दुसरा समझे
इनका कहा ये आप समझे या खुदा समझे
आतातरी तुमच्यामते असलेले त्या पाच शेरांचे अर्थ कृपया सांगा. पॉईंट असा आहे  की तो अर्थ त्याच शब्दांमधून प्रकट व्हायला पाहिजे. 

भूषण,
शनि, 09/06/2008 - 13:05 — Bhushan Katakkar

ते?

त्यांच्या विवंचनांची नाही कुणास पर्वा
पात्रात नर्मदेच्या ओलावतात गोटे

कोते विचार त्यांचे गाठीत गुंतलेले
त्यांचेच स्वच्छ ओटे, त्यांचे पवित्र लोटे

बंदूकही रिकामी अन लेखणी निकामी
नोटा किती मिळाल्या ते मोजतात बोटे

ते खोकले तरी मी भयभीत फार होतो
(मी मौन पाळणारा, ते बोलतात खोटे)

कुणीतरी एका साध्या शंकेचे निरसन कराल काय?  या शेरांमधले 'ते' म्हणजे कोण?
नर्मदेतील गोटे, गाठ, बोटे, मौन अशा शब्दांनी मला तरी अनेक घटना आठवतात. सर्व सरळ सांगणे कठीण. शेवटी ज्याचा-त्याचा दृष्टीकोन आहे.

श्री ओंकार,
मला आपण इतरांच्या गझलांवर जे प्रतिसाद दिले आहेत ते फक्त याचसाठी खटकले की तसे निकष लावून आपली ही वरील गझल बघितली तर आपण स्वतः तेच करत आहात असे लक्षात येईल. हे अजिबात वैयक्तिक नाही व समजूही नये. इथे फक्त एवढेच समजून घेण्याचा प्रयत्ने आहे की आपल्या प्रतिसादांना आधार काय आहे?
१. 'ळ' प्रमाणे 'टे' जुळवाजुळव उघडी पडत आहे.
२. बहुतेक शेर एकाच अर्थाचे असल्यामुळे गझल करण्याऐवजी एकच शेर केला असता व 'गझलचर्चा' या सदरात दिला असता तर बरे झाले असते.
३. खूप दिवस थांबून केलेली ही गझलही अजिबात श्रेष्ठ नाही. त्यामुळे वाट पाहण्याच्या अपेक्षेचे कारण समजत नाही.
४.बाय द वे अजून ही कुणी 'ते' म्हणजे कोण ते सांगीतले नाही. यासाठी नाही की 'वेड्याला' कुठे उत्तरे देत बसायची, यासाठी की निश्चीत सांगणेच शक्य नाही की 'ते' म्हणजे कोण?
५. संख्या - रोज एक गझल करणे वा संख्या याबाबत मला असे म्हणायचे आहे की आपण का बरे असे म्हणता की रोज एक गझल करू नये? समजा केली तर कुणाचे बिघडते? समजा गझल निकृष्ट झाली तर आवडली नाही म्हणू शकतोच की आपण! पण प्रत्येक गझलेत एक शेर जरी चांगला निघाला तरी मी म्हणेन खूप झाले. मुळात एखाद्याला खूप जास्त वेळ असू शकतो किंवा नाद असू शकतो ना गझल करण्याचा? त्यामुळे संख्येवरील मर्यादांची अट असण्याचे प्रयोजन समजतच नाही. गुणवत्ता नाही असे कारण असल्यास ती खूप थांबूनही येत नाही हे आपण बघितलेच.
तेव्हा आपण दिलेले प्रतिसाद हे माझ्यामते गैरवाजवी वाटतात.
 

१.  'ळ' प्रमाणे 'टे' जुळवाजुळव उघडी पडत आहे.

मी जुळवाजुळव होत नाही असे म्हणतच नाही. परंतू अश्या शब्दांचा चपखलपणा महत्त्वाचा नाही काय? थोटे आणि छोटे चे शेर जुळवाजुळवच आहेत. त्याऐवजी काही दुसरे शेर सुचले तर मी ते बदलीनही. मी इतरत्र प्रतिसाद देण्याआधी तुम्हाला हे शेर अधोरेखित करता आले असते. असो. तुम्ही माझा प्रतिसाद परत वाचलात आणि unbiased नजरेने परीक्षण केलेत तर तुम्हाला माझे म्हणणे कळेल.

२. बहुतेक शेर एकाच अर्थाचे असल्यामुळे गझल करण्याऐवजी एकच शेर केला असता व 'गझलचर्चा' या सदरात दिला असता तर बरे झाले असते.तुम्हाला अर्थ कळले नाहीत याकरता ते मी समजावून देण्याचे कष्ट घेईन. पण तुम्हाला समजले नाहीत याचा अर्थ कोणालाच समजले नाहीत असा होत नाही.

३. खूप दिवस थांबून केलेली ही गझलही अजिबात श्रेष्ठ नाही. त्यामुळे वाट पाहण्याच्या अपेक्षेचे कारण समजत नाही. ह्म्म्म. मी कसलाही दावा केलेला नाही. तुम्हाला कोणी सांगितले की मी किती दिवस थांबलोहोतो? मी कधी म्हटले ही गझल श्रेष्ठ आहे. तुम्ही स्वतःचे विधान माझ्या तोंडी घालू पाहतआहात.
तुम्ही तुमच्या गझला ५-६ महिन्यांनंतर परत वाचून पहा आणि मग आपण या विषयावर बोलू.  तोवर गझलेची बाराखडीही वाचत जा.

४.बाय द वे अजून ही कुणी 'ते' म्हणजे कोण ते सांगीतले नाही. यासाठी
नाही की 'वेड्याला' कुठे उत्तरे देत बसायची, यासाठी की निश्चीत सांगणेच
शक्य नाही की 'ते' म्हणजे कोण?
त्यांच्या विवंचनांची नाही कुणास पर्वा
पात्रात नर्मदेच्या ओलावतात गोटे
( नर्मदा बचाव आंदोलनात सहभागी झालेले ते)

कोते विचार त्यांचे गाठीत गुंतलेले
त्यांचेच स्वच्छ ओटे, त्यांचे पवित्र लोटे
(ते म्हणजे सोवळ्याओवळ्याची भाषा करणारे प्रस्थापित ब्राह्मण )

बंदूकही रिकामी अन लेखणी निकामी
नोटा किती मिळाल्या ते मोजतात बोटे
( तू कुठे जातोस ते बघतोच मी, परीक्षा कधी घ्यायची ते ठरवतो - अशा वाक्यरचनेत येणारा शब्द - ते. )


ते खोकले तरी मी भयभीत फार होतो
(मी मौन पाळणारा, ते बोलतात खोटे)
(इथले ते तुम्हाला जे अपेक्षित असतील ते. माझ्या दृष्टीने अशी बरीच माणसं दिसतात माल आसपास)


आणखी एक-
माणूस मी मराठी, पाट्याच टाकणारा
माझे गणित पक्के! धंद्यांत फक्त तोटे!

(इथे गणित वृत्तात बसत नाही. त्याऐवजी हिशेब/हिशोब योग्य आहे. असो. दुसर्‍या एकासंकेतस्थळावर हा बदल मला एका सदस्याने सुचवला होता आणि तो मला पटला होता.)


५. संख्या - रोज एक गझल करणे वा संख्या याबाबत मला असे म्हणायचे आहे
की आपण का बरे असे म्हणता की रोज एक गझल करू नये? समजा केली तर कुणाचे
बिघडते? समजा गझल निकृष्ट झाली तर आवडली नाही म्हणू शकतोच की आपण!
पण प्रत्येक गझलेत एक शेर जरी चांगला निघाला तरी मी म्हणेन खूप झाले.
मुळात एखाद्याला खूप जास्त वेळ असू शकतो किंवा नाद असू शकतो ना गझल
करण्याचा? त्यामुळे संख्येवरील मर्यादांची अट असण्याचे प्रयोजन समजतच
नाही. गुणवत्ता नाही असे कारण असल्यास ती खूप थांबूनही येत नाही हे आपण
बघितलेच.
वैयक्तिक तुम्हाला स्वानुभावातून सल्ले देण्याचा निष्फळ प्रयत्न मी केला. तुम्ही दररोज कितीही गझला केल्यात तरी माझे बिघडत नाही. आवडली नाही म्हटल्यावर ते स्वीकारण्याची तयारी आपणांकडे दिसली नाही. तुम्ही माझ्या गुणवत्तेविषयी शंका दाखवावी याबाबत माझ्या मनात आकस वगैरे नाही.  तुमच्या या आणि इतर ठिकाणचे प्रतिसाद पाहता तुमचा रोख वैयक्तिक नसतो असे विधान मी तरी करणार नाही.

तुम्हाला चार-दोन शब्द सांगण्याचा माझा हा प्रयत्न इतकेच. त्याला चूक/ धाडस/ माज कायम्हणायचे ते म्हणावे.

आता कुठे जरासे माझे लिहून झाले
आता कुठे जरासे शब्दांत प्राण आले.

आपण महान प्रतिसाद दिला आहेत. मुख्य म्हणजे आपण प्रतिसाद दिलात ह्याचा धन्यवाद!
१. नर्मदा बचाव आंदोलन, स्वतःला पवित्र समजणारे व जातीयवाद मनात बाळगणारे ब्राह्मण व नोटा किती मिळाल्या ते मोजणारी बोटे अशा स्वरुपाचे विषय घरात कार्य झाल्यावर आम्हा देशस्थांकडे गोंधळ्यांना बोलवून गोंधळ करतात त्या गोंधळात असतात. किंवा टी व्ही वर एखाद्या मुशायर्‍यात एखादा बंडखोर कवी पेटून असे काहीतरी बोलतो. गझलेत मी असे विचार ऐकले नव्हते. त्यामुळे मी हट्टाने त्यांचा अर्थ विचारत होतो. माफ करा. आकस वगैरे काही नाही, फक्त मला ती गझलच वाटली नाही म्हणुन बोलत होतो. माझ्या मते गझल एक तर स्पष्टपणे समजायला पाहिजे व त्यात कुठेतरी शेरांचा जो मूड असतो त्याचा संबंध असला पाहिजे. म्हणजे एकदा नर्मदा बचाव, एकदा ब्राह्मण व एकदा काहीतरी वेगळेच असे नसावे असे वाटते. बरीच उदाहरणे मी गझलांची देऊ शकीन की ज्या श्रेष्ठ आहेत, समजल्या गेल्या व त्यांच्या शेरांमधील मूड मधे काहीतरी सुसुत्रता आहे.
२. ज्याला जसा घ्यायचा असेल तसा अर्थ - हा विचार मला पटत नाही. जे लिहिले आहे ते समजलेच पाहिजे, सर्वांना जवळजवळ तसेच वाटले पाहिजे व तो अर्थ त्या शब्दांमधून स्पष्टपणे दिसलाच पाहिजे ( उपमा असली तरी लक्षात यावे की उपमा आहे )  अशा आग्रही विचारांचा मी आहे. मी वर एक प्रश्न विचारला आहे की मीर, सौदा, गालीब, जौक, मोमीन, दाग यांच्या गझलांमधील फक्त एक शेर असा दाखवा जो त्या भाषेचे ज्ञान नसणार्‍याला समजू शकणार नाही.
असो. मला एवढेच म्हणायचे होते की :
गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा
( अर्थ आपल्याला जसा वाटेल तसा.. )

प्रिय मित्र भूषण,
गझलकाराच्या मनोव्यापारांना तो स्वतः कशा पद्धतीने शब्दबद्ध करतो हे ज्याच्यात्याच्यावर अवलंबून असते. पण गझलेत मनोव्यापारांना सर्वात जास्त महत्व दिले जाते किंवा दिले जावे हे मान्य असावे. तशा दृष्टीकोनातून बघितल्यास करारनामे ही गझल तर आहेच पण उलट त्यात अनेकविध विषय आले आहेत. नर्मदा बचाव आंदोलनात जे लोक ग्रस्त झाले त्यांची व्यथा शायराने मांडणे हे मुळीच गैर नाही. तुझा जो मुद्दा आहे की गझलेत काय आशयाचे शेर असावेत यावर तशी बंधने नसावीत. मात्र करारनामे ही संपूर्णपणे सामाजिक गझल वाटते ज्यामुळे तू असे म्हणत आहेस की एखादा बंडखोर कवी अशा रचना करतो असे वाटते. ते मात्र मला मान्य आहे. कारण मुळात गझल ही अत्यंत तरल भावनांना व्यक्त करणारी असावी अशा मताचा मी आहे. करारनामे तरल भावनांना ( म्हणजे दोन व्यक्तिंमधील मनोव्यापार, संबंध किंवा प्रेम, विरह, अनुभुती ) अशा भावनांना फारशी व्यक्त न करता फारच आक्रमकपणे समाजातील वाईट गोष्टींवर भाष्य करते. खरे तर ही गझल तशी फार वादग्रस्त मुद्यांना हात घालते, जसे नर्मदा बचाव आंदोलन, जातीयवाद, मराठी माणूस व त्याच्या काही क्षेत्रातील कमी समजल्या गेलेल्या क्षमता. त्यामुळे तुला ही गझल न वाटता एक बंडखोर कविता वाटली असावी. मला व्यक्तिशः असे वाटते की प्रिय मित्र ओंकारने याच गझलेत काही नाजूक भावनाही सादर केल्या असत्या तर फार उत्तम झाले असते. असो.
अर्थ - शेराचा अर्थ सर्वांना कळण्यासारखा असावा हे जे तुझे मत आहे ते मला मान्य आहे. पण जसजसा शायर उंचीवर जायला लागतो तसा तो काही भावना अशा पद्ध्तीने सादर करतो की त्या ऐकून त्यावर प्रतिसाद देण्यासाठीसुद्धा रसिकाची एक विशिष्ट मनस्थिती असावी लागते. म्हणजे असे बघः नर्मदा बचाव आंदोलन किंवा जातीयवाद याचा ज्यांना स्वानुभव आहे किंवा जवळुन त्यातील दुष्परिणाम पाहिले आहेत किंवा त्याचसारखे इतर काही अनुभव घेतले आहेत तो अशी गझल फार परिणामकारकपणे रचेल, जशी करारनामे वाटते. पण आयुष्यात असा काहीच अनुभव स्वतःला नसणे, किंवा जवळुन पाहिला नसणे किंवा इतर काही तत्सम अनुभव नसणे असा अवस्थेतील रसिक त्या गझलेला नीट दाद देऊ शकणार नाही. याचाच अर्थ असा होत आहे की गझल ही संपूर्णपणे गझलकाराची दौलत असते व दाद मिळते की नाही याचा गझल रचताना मुळात विचारच केलेला नसतो. गझल रचतानाची मनस्थिती ही दाद मिळण्यासाठी असते तशी नसून कळकळीची असते. तेव्हा प्रत्येक गझलेचा किंवा शेराचा अर्थ कळलाच पाहिजे असा आग्रह धरणे माझ्या मते गैर आहे. असो.
उर्दू शायरीची सुलभता - यावर तुझे असे म्हणणे आहे की त्या शायरांचा शेर समजतोच. हे त्यांचे श्रेष्ठत्व आहे. पण जर नीट बघितलेस तर असे जाणवेल की ती शायरी ही बहुतांशी स्वानुभवावर आधारित असायची. त्यामुळे ती आपोआप श्रेष्ठ व्हायचीच. असो.
तसा मी ग..

श्री ओंकार,
आत्ताच मला सन्माननीय श्री प्रदीप कुलकर्णी व स. प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांच्यात श्री प्रदीप यांच्या एका गझलेवरून झालेला एक चांगला संवाद बघायला मिळाला. मला तो अतिशय उद्बोधक वाटला. कृपया गैरसमज नको की माझे हे भाष्य श्री प्रदीप यांच्या गझलेबाबत आहे. त्यांची ती गझल अत्युतम आहेच. फक्त संदर्भ इथे घेत आहे. संवाद असा:

सोम, 08/06/2007 - 17:41 — प्रदीप कुलकर्णी<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" /?>


 


तुम्ही उल्लेख केलेल्या दोन शेरांबाबत मी माझे स्पष्टीकरण देतो..पटल्यास पाहा. (मात्र, पटलेच पाहिजे, असा आग्रह मुळीचच नाही !). कारण लिहिणारा जो असतो, तो त्याच्या सभोवतालाची (मानसिक, कौटुंबिक, सामाजिक वगैरे..) सूक्ष्मातील सूक्ष्म छटा शब्दात आणण्याचा प्रयत्न करत असतो...(कदाचित, कविता इतरांना दुर्बोध वाटण्याचे किंवा संदर्भहीन, संदिग्ध वाटण्याचे हेही एक कारण असू शकेल. असो.)
.............


जे लिहिलेले असते, त्यापेक्षाही न लिहिलेलेही वाचायची सवय आपण (म्हणजे आपण सगळ्यांनीच) करून घ्यायला हवी. त्यादृष्टीने आपण (म्हणजे आपण सगळ्यांनीच) `गझलसाक्षर`  होण्याची आवश्यकता आहे.


 


मंगळ, 08/14/2007 - 06:52 — संतोष कुलकर्णी


 


मुळात, मी आपल्याच काय कोणत्याही कवितेच्या बाबतीत व्यापक दृष्टिकोन ठेवला जावा, या विचारांचा आहे. प्रश्न उद्भवतो तो स्पष्टीकरण द्यावे लागते, तेव्हा...! गझलेच्या बाबतीत ते फारसे द्यावे लागू नये. व्याकरणाच्या बाबतीत ते ठीकही आहे. गझलेचे व्याकरण काही वेळा ते द्यायला लावतेही. मात्र, विशिष्ट अनुभवांच्या बाबतीत अभिव्यक्तीही स्पष्ट  हवी. आशय आरस्पानी असावा, एवढेच माझे म्हणणे.

 

आता या वरील संवादामधे वास्तविक मला दोघांचेही विचार खूप श्रेष्ठ वाटत आहेत. पण माझ्या नैसर्गिक प्रवृत्तीमुले असावे की मला प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांचे विचार पटत आहेत. अर्थात मी श्री प्रदीप यांच्या विचारांना मानत नाही असे म्हणण्याचा उद्धटपणा करत नाहीये हे कृपया समजून घ्यावेत.


गझलेचे स्पष्टीकरण करायला लागावे ही माझ्यामते थोडीशी अयोग्य बाब आहे.


 


 

कमीत  कमी आपली गझल इतरांपेक्षा वेगळी  वाटेल अशी लिहावी,

आपण गझल लेखन आता सुरू केले आहे का??

कमीत  कमी आपली गझल इतरांपेक्षा वेगळी  वाटेल अशी लिहावी,

आपण गझल लेखन आता सुरू केले आहे का??

माणूस मी मराठी, पाट्याच टाकणारा
माझे गणित पक्के! धंद्यांत फक्त तोटे!
                          हया शेराचा अर्थ म्हणजे मराठी माणुस पाट्याच टाकतो काय?
                                            क्रुपया आसे विधान कारु नये
                                                              --- जय महाराष्ट्र

Pages