करारनामे

झाले करारनामे आले घरी लखोटे
नुसत्याच वायद्यांनी भरतील काय पोटे?

त्यांच्या विवंचनांची नाही कुणास पर्वा
पात्रात नर्मदेच्या ओलावतात गोटे

नाही कुणी भिकारी की भीक घालणारा?
दारिद्र्यही बिचारे झाले असेल थोटे

कोते विचार त्यांचे गाठीत गुंतलेले
त्यांचेच स्वच्छ ओटे, त्यांचे पवित्र लोटे

बंदूकही रिकामी अन लेखणी निकामी
नोटा किती मिळाल्या ते मोजतात बोटे

बोलून काय गेलो, ऐकू कुणास आले
जमले सभोवताली सारेच लाळघोटे

देवालयात केले देवास कैद आम्ही
लाचार माणसांचे हे विश्व फार छोटे

ते खोकले तरी मी भयभीत फार होतो
(मी मौन पाळणारा, ते बोलतात खोटे)

माणूस मी मराठी, पाट्याच टाकणारा
माझे गणित पक्के! धंद्यांत फक्त तोटे!

गझल: 

प्रतिसाद

मराठी माणूस पाट्याच टाकतो का?
आपले अनुभव मराठीच्या नावावर खपवणे योग्य नाही
                      -----  जय महाराष्ट्र

Pages