मराठी गझलांचे चैतन्य


दुआ करो, मेरी खुश्बू पे तबसिरा न करो
कि एक रात में खिलना भी था, बिखरना भी
- कैसर-उल-जाफ़री

"माझ्यासाठी शुभकामना करा, माझ्या सुगंधाची समीक्षा करत बसू नका; मला तर एकच रात्र लाभली होती, आणि मला फुलायचंही होतं आणि वाऱ्यावर विखरूनही जायचं होतं."

कविश्रेष्ठ सुरेश भटांनी मराठी भाषेत गझल या काव्यशैलीचं सर्वगुणी प्रवर्तन केलं. म्हणजे तंत्रात चोख आणि मंत्रात बावनकशी अशी मराठी गझल त्यांनी लिहिली. मराठी भाषेच्या रांगडय़ा मातीत गझलाच्या संरचनेचं संकल्पन, त्याच्या बीजाची कल्पना, त्या बीजाची पेरणी यासाठी लागणाऱ्या आधारभूत जमिनीची मशागत आणि त्यातून घेतलेलं गझलचं अस्सल भरघोस दाणेदार पीक. हेच ते गझलचं सर्वगुणी प्रवर्तन. ही फक्त एकटय़ा सुरेश भटांची एकहाती कामगिरी आहे.

मराठीत गझलचं कोणतंही प्रामाणिक वातावरण, वाङ्मय, वारसा, वहिवाट आणि वाण नव्हतं. भटपूर्व काळाची ही स्थिती! नाही म्हणायला गझलच्या आकृतिबंधात लिहिलेली भावकविता आढळते. कुंठित आणि अत्यंत तोकडय़ा विचारातून लिहिलेल्या या भावकवितांनी पुढे गझलचा विचारही कुंठितच करून टाकला. दमदार कविता म्हणून गझलचं अस्तित्व निर्माण व्हायचं असेल तर अनेक गझलकार कवींच्या पिढय़ा जाव्या लागतील. एकेका पिढीकडून गझलचं संकल्पन व विकसन होत जावं. अशा विकसनातूनच गझलचं एकेक पाऊल पुढे पडतं आणि गझलचा एक व्यापक प्रवाह निर्माण होतो. पण मराठीत घडलं ते वेगळंच. भगीरथ ऋषीने एकटय़ाच्या तपाच्या बळावर स्वर्गातल्या गंगा नदीला पृथ्वीवर आणलं, तसं सुरेश भटांनी आपल्या एकटय़ाच्या बळावर मराठीत अस्सल बावनकशी गझल निर्माण केली. गझलचा उद्भव अरबस्तानात ९ व्या शतकात कवी रुदकी याच्याकडून झाल्याचं उर्दू अभ्यासक मानतात. म्हणजे गेल्या हजार वर्षांपासून गझलचा प्रवास सुरू आहे.

भारतापुरतं बोलायचं झालं तर इथे १५ व्या शतकात गझल साहित्यरूपात अवतरू लागली. या काळात जनतेची भाषा, गझलची भाषा आणि गझलची संरचना याही गोष्टींच्या जडणघडणीची प्रक्रिया सुरू होती. भारतात गझलचं रूप व तिची भाषा स्पष्ट व्हायला सुरुवातीची बरीच दशकं खर्ची पडली. या कामासाठी हजारो गझलकार कवी व अशा कवींच्या अनेक पिढय़ा राबलेल्या आहेत. आज गझलचे जे सर्वव्यापी विशाल अस्तित्व दिसतंय ते याच गझलनिष्ठेची फलश्रुती आहे.

मराठीत ही प्रक्रिया माधव ज्यूलियन यांचा संग्रह "गज्जलांजली" हा १९३३ साली प्रकाशित झाला, इथून सुरू झाली असं समजूया. पण तिच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय आणि अस्तित्वाला जीवन मिळवून दिलं ते एकटय़ा सुरेश भटांनी!

इथे सवाल फक्त उचल लेखणी आणि खरडून टाक ‘गज्जल’ एवढा नव्हता. इथे अनेक जटिल प्रश्न आ वासून उभे होते. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गझल म्हणायचं कशाला? मराठी भाषेत तिचं रूप कसं असायला हवं? तिची भाषा कशी असायला हवी? आधीच समृद्ध कवितेचं भांडार असलेल्या मराठी भाषेत ती काय सांगणार? अशा स्थितीत गझलही लिहायची आणि हे प्रश्नही सोडवायचे, असा दुहेरी संघर्ष भटांना करायचा होता.

सुरेश भट या संघर्षांला सामोरे गेले, निकराने लढले आणि नुसते यशस्वीच नाही, तर दिग्विजयी ठरले. अनेक गझलकार कवींचं काम एकटय़ा सुरेश भटांनी करून दाखवलं. मग अस्सल मराठी गझलनिर्मितीचं श्रेय भटांना ते त्यांच्या हक्काने मिळत असेल तर त्यात वावगं काय?

भटपूर्व काळात गझलच्या वाटेला गेलेल्या कवींना गझलच्या जादुई मंत्रशक्तीचा, तिच्या नक्षीदार सौंदर्याचा थांगपत्ताच लागला नाही. याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतानाही कुणी दिसत नाही. असंख्य वृत्ते व विविध आकृतिबंध प्रचलित असताना भावकविता व भावगीतांसाठी गझलचा आकृतिबंध अकारण खर्ची घातला गेला. गझलच्या आकृतिबंधात भावकविता भरण्याचा प्रघात पडला. गझलेसाठी म्हणून काही विशिष्ट वृत्ते असतात, अशा वृत्तांमध्ये शब्दांची काटेकोर जुळवणी केलेली रचना म्हणजे गझल असा एक समज दृढ होऊन बसला होता. हा अपसमज आणि ही कोंडी कुणीच फोडताना दिसत नाही. भावकवितेची वृत्ती व गझलचा आकृतिबंध या दोन स्वतंत्र रूपांची गुंतागुंत केली गेली. या गुंतागुंतीतून एक विरूप संभ्रम निर्माण झाला. या विरूप संभ्रमामुळे गझलच्या मूलभूत स्वरूपाचं आकलन कधी दृष्टिपथात आलं नाही. ही दृष्टी पुढे चाकोरीबद्ध झाल्यानंतर मराठी गझलविचार खुरटून गेला आणि पुढे मग तो निर्जीव होऊन पडला.
या विरूप संभ्रमात सुरेश भटही थोडेसे अडकल्याचे दिसतात. पण याची त्यांना त्याच वेळी जाणीवही झाली असणार. त्यांनी तितक्याच त्वरेने आणि कौशल्याने या संभ्रमाच्या भोवऱ्यातून आपली सुटका करून घेतलेली दिसते. "रंग माझा वेगळा"या संग्रहातील गझलांची संरचना पाहिल्यास भट गझलेच्या उन्नत श्रेणीच्या दिशेने फार झपाटय़ाने वाटचाल करताना दिसतात. उदाहरणार्थ, त्यांची "गुंतुनी गुंत्यात साऱ्या.." ही गझल पाहता येईल.

या विरूप संभ्रमाचा चक्रव्यूह भेदणारे सुरेश भट हे एकमेव कवी ठरतात. अन्य कवींना हा विरूप संभ्रम पूर्णपणे कळला असावा असं मान्य केलं तरी त्याचा भेद करून त्यांना अस्सल गझल काही साध्य करता आली नाही, ही बाब निर्विवाद सत्य म्हणून बाकी उरते.

गझल म्हणजे काय? गझलच्या प्रकृतीचा ठळक गुण सांगायचा झाला तर असं म्हणता येईल, ‘विलक्षण शब्दात, विलक्षण शैलीत केलेलं विलक्षण भाष्य म्हणजे गझल.’ विलक्षणत्वाला पर्याय नाही, सवलत नाही.
कसं असतं हे विलक्षण भाष्य?

गझलच्या संरचनेतील द्विपदी म्हणजेच शेर हे गझलचं अत्यंत मूलभूत असं प्राणतत्त्व. शेर हा दोन ओळींचा असतो. या दोन ओळीतच एक स्वतंत्र, सार्वभौम कविता असते.
या शेराचं स्वरूप धनुष्यबाणाच्या रूपात स्पष्ट करता येईल. शेराची दुसरी ओळ म्हणजे धनुष्य, प्रत्यंचा ही शेराची दुसरी ओळ आणि या दोघांच्या तणावातून फेकलेला सुसाट मर्माचा गतिमान वेध म्हणजे शेर आणि अशा शेरांची संरचना म्हणजे गझल.
महाकवी मिर्झा गालिबने हरगोपाल तफ्ता या मित्राला लिहिलेल्या एका पत्रात गझलेतील यमकांविषयी ऊहापोह केलाय. त्यात गालिब म्हणालाय की, "शायरी यानी आफरीनी है, काफिया पैमाई नहीं है."अर्थात गझल म्हणजे आशयाचं विलक्षणत्व, नुसती यमकेगिरी नव्हे.

सुरेश भटांनी नेमकं हेच काम केलं. शेर हे गझलचं मूलभूत प्राणतत्त्व आहे, हे त्यांनीच अचूक ओळखलं. सार्वभौम कविता धारण करणारा शेर कसा असतो, याची अत्यंत प्रत्ययकारी मांडणी त्यांनी आपल्या गझलांत करून दाखविली. मराठी गझलेतल्या शेराचं ‘शिल्प’ कसं असायला हवं, ते त्यांनी घडवून दाखवलं. भटांची ही कामगिरी किती थोर आहे याची जाणीव व्हायला कदाचित अजून काही दशकं जावी लागतील.
भटांनी यमकेगिरीला अजिबात थारा दिला नाही. तंत्र व व्याकरणाला आवश्यक चौकटीच्या बाहेर तसूभरही पडू दिलं नाही. आपल्या गझलांतून त्यांनी उभं केलं ते केवळ आशयाचं सौंदर्य. भटांनी तंत्रशुद्ध नाही, तर तंत्राच्या जाचातून आणि काचातून सर्वथा मुक्त असलेली "मंत्रश्रीमंत"गझल लिहिली. भटांनी तंत्रशुद्ध गझल आणली, असं जे म्हणतात, ते त्यांचा घोर अवमान करीत आहेत. त्यांना भट आणि गझल या दोन्ही गोष्टी साफ कळलेल्या नाहीत.

आपली जीवनानुभूती, भाषा आणि गझल यांच्याशी भट आयुष्यभर प्रामाणिक आणि निष्ठावान राहिले.
"रंग माझा वेगळा" या संग्रहातील तेवीस गझलांचं अवलोकन केलं असता यानंतर भट बुलंद झेप घेतील अशी दाट शक्यता स्पष्ट दिसते आणि घडलंही तसंच. यानंतर आला तो "एल्गार" हा गझलसंग्रह. गझलच्या सौंदर्याने ओतप्रत भरलेल्या गझला या संग्रहात एकत्रित झाल्या आहेत. या गझलांतून जीवनानुभूतीचे तीव्र स्फोट होताना जाणवतात. नव्हे, आपल्या जाणिवांनाही ते हादरे देतात. ही विस्फोटकता ध्यानात घेतली तर "एल्गार" संग्रह मराठी कवितेतला फेनॉमिनल संग्रह वाटतो. या गझला म्हणजे मराठी कवितेतलं एक जबरदस्त हॅपनिंग वाटतं. आणि गझलच्या आनुषंगाने सांगायचं झालं तर हा संग्रह मराठी गझल विश्वातला "बिग बँग" वाटतो.

भटांच्या गझलेच्या महत्तेचं एकच उदाहरण सांगायचं झाल्यास, "फुलावया लागलीस तेव्हा.." या गझलेचं देता येईल. आपल्या आस्वादाच्या कक्षांना पुरून उरणारी ही गझल आहे. मराठी भाषेचं सौष्ठव आणि गझलचे तेजस्वी सौंदर्य यांचा अफलातून मिलाफ असलेल्या भटांच्या अनेक गझलांपैकी ही एक अव्वल गझल आहे.

काळ्याकभिन्न कातळाची छाती फोडून एखादा धबधबा कोसळावा तशा या संग्रहातल्या गझलांचा आविष्कार आहे. गझलेत अशी कुठली जादू असते- जी आपल्याला अंतरबाह्य़ झपाटून टाकते, याचा बोध या गझलांतून व्हायला लागतो. या गझलांमधला एकेक शेर म्हणजे संवेदनांचं प्रत्ययकारी असं शिल्पच. संवेदना आणि अनुभूतीची त्याचीच ही प्रदीप्त किरणे आहेत. अशा या गझला भटांना काय केवळ तंत्र आणि व्याकरण माहीत होतं एवढय़ा फडतूस भांडवलावर निर्माण करणं शक्य झालं?

पन्नासेक वर्षांच्या आपल्या काव्यलेखनाच्या प्रवासात सुरेश भट गझलच्या तीव्र ध्यासाने झपाटलेले होते. गझल त्यांच्यासाठी पर्यटन स्थळ नव्हतं, ते त्यांचं ध्यासपीठ होतं. त्यापासून ते कधी ढळले नाहीत. मराठी भाषेच्या मातीत त्यांनी गझलेची भव्य शिल्पे उभी केली. मात्र, त्यांच्या या भव्यदिव्य निर्मितीकडे त्यांच्या हयातीत तर तुच्छतेने पाहिलं गेलं. पण आज ते हयात नसताना तशीच तुच्छता व कृतघ्नतेने बघण्याची प्रवृत्ती बळावताना दिसतेय, हे कशाचं लक्षण आहे?

--चंद्रशेखर सानेकर

(दै. लोकसत्ताच्या दिनांक १५ एप्रिल २०१२ च्या लोकरंग पुरवणीतून साभार)

प्रतिसाद

कविवर्य सुरेश भट यांना विनम्र अभिवादन.

jabardast lekh aahe

Vinamra Abhivaadan

अतिशय संयत, नेमकेपणा असलेला आणि विषयाचा तितकाच रोखठोक परामर्श घेतलेला लेख.

खूपच आवडला, धन्यवाद!

गझलसम्राट सुरेश भट यांना विनम्र अभिवादन.

विलक्षण शब्दात, विलक्षण शैलीत केलेलं विलक्षण भाष्य म्हणजे गझल.

फ़ारच सुंदर लेख.