कळेना

मुलांना कसे वाढवावे कळेना
नव्याने कसे मी घडावे कळेना

जमाना असा, सर्व चालून जाते
स्वत:ला कसे पारखावे - कळेना

किती माहिती ही, किती तज्ञ सल्ले
कसे नेमके पाखडावे - कळेना

विजेसारखा आज उत्साह आला!
तरी मी पुन्हा का गळावे - कळेना

विचारी नभा चिंब ही चंद्रमौळी
"कुठे केवढे कोसळावे कळेना?"

पुन्हा वाचले, खोडले शेर सारे
कशाला असे गुरफटावे - कळेना

कडू, तुरट, खारट - असे जगत जाता
कसे शेवटी गोड व्हावे - कळेना

गझल: 

प्रतिसाद

जमाना असा, सर्व चालून जाते
स्वत:ला कसे पारखावे - कळेना
वा, क्या बात है. फारच आवडला.
पुन्हा वाचले, खोडले शेर सारे
कशाला असे गुरफटावे - कळेना
सुंदर..
चंद्रमौळी मला थोडा धूसर वाटला. कडू गोड शेरही चांगला. सगळीच गझल आवडली.
 

छान गझल !
पण चित्तरंजनने म्हटल्याप्रमाणे 'चंद्रमौळी'तून अर्थ स्पष्ट हो त नाही.
मला खरं तर पहिलाच शेर फार आवडला. अभिनंदन!
संतोष कुलकर्णी

चित्त आणि संतोष, प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
चंद्रमौळी - पुरा-पावसाने पार हैराण झालेली एक गरीब झोपडी शेवटी आकाशाला विचारते की तुला कुठे आणि केवढे कोसळावे ते कळत नाही का? अर्थात.. तुम्ही दोघानीही म्हटल्याप्रमाणे शेर अजून नीट स्पष्ट आणि सहज यायला हवा होता..
-- पुलस्ति.

छान गझल...
विचारी नभा चिंब ही चंद्रमौळी
"कुठे केवढे कोसळावे कळेना?"
हा शेर विशेष आवडला...
त्याचं कारणही तसंच आहे. गेल्या आठवड्यात मला एक गझल सुचली...तीमधील एक ओळ वरील शेरातील दुसऱ्या ओळीशी विलक्षण मिळती-जुळती आहे...(पावसाने कोठे बरसावे, यासंदर्भातील). माणूस विचार किती एकसारखा करत असतो आणि तरीही त्याची अभिव्यक्ती किती वेगवेगळी असते, याचं आश्चर्य़ वाटलं. (...आणि म्हणूनच वेगवेगळ्या साहित्यिकांचं लेखन वाचण्यात मौज असते)
`पुढे मी गेलो`एेवजी  या आठवड्यात  तीच गझल मी येथे सादर करणार होतो...पण काही शेर अपूर्ण होते...शिवाय वर उल्लेख केलेल्या  शेरातील कणभर हा शब्दही माझ्या मनाला पटत नव्हता, म्हणून सादर करू शकलो नाही....आता मतला आणि तो शेर येथे देत आहे...
तो राग प्रियेचा बनून बरसत आहे !
थांबे न जराही...अजून बरसत आहे !
कोठे बरसावे कळे न कणभर याला...
कोणी  न तिथे, हे कळून, बरसत आहे !

....................
पुलस्ती, तुमचे पुढील शेरही फार आवडले...
पुन्हा वाचले, खोडले शेर सारे
कशाला असे गुरफटावे - कळेना

कडू, तुरट, खारट - असे जगत जाता
कसे शेवटी गोड व्हावे - कळेना
शुभेच्छा...!