कुठे होतीस तू जेव्हा दिशा झंकारल्या होत्या ?
कुठे गेलीस तू जेव्हा ऋतू गंधाळुनी गेले ?
कंठशोष
पुलस्ति [11 जुलै 2007]
जगती चिवट अजूनी, का हाच दोष त्यांचा?
जाळून बाल्य करता का रक्तशोष त्यांचा?
का व्यर्थ फडफडावे? चिमटीत गुदमरावे?
सुरवंट रेंगणारे विणतीच कोष त्यांचा!
कळती तुम्हास सार्या खाणाखुणा इशारे
विरतो कड्याकपारी का कंठशोष त्यांचा?
समजून कोण घेते कोणास आज येथे
माझ्यावरी तरीही आहेच रोष त्यांचा!
सवयीनुसार त्यांनी संकल्प सोडले अन
सवयीनुसार चालू हा मंत्रघोष त्यांचा!
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
प्रतिसाद
समजून कोण घेते कोणास आज येथे
माझ्यावरी तरीही आहेच रोष त्यांचा!
फार छान...
समजून कोण घेते कोणास आज येथे
माझ्यावरी तरीही आहेच रोष त्यांचा!
हा शेर सुंदर आहे.
सुंदर गझल !
शब्दाचे एवढे भान गझलकारच सांभाळू शकतो हे खरे! काफिया असाच हवा. अगदी चपखल अलामतीसकट. षटकोनाचा म्हणजे षटकोनाचाच ष पाहिजे. सवलत नकोच.
मतल्यात ..हा काय दोष त्यांचा ...? असा प्रश्न अधिक स्पष्ट होईल. दुसरा शेर थोडा आणि तिसरा जरा जास्त धूसर वाटतो. बाकी शेर सुंदरच ! एकूण गझल सुंदरच. अभिनंदन!
संतोष कुलकर्णी
तुमच्या सूचनांवर विचार करून दोन शेरांमधे हे बदल केलेत.. बघा ठीक वाटताहेत का.
जगती चिवट अजूनी, हा काय दोष त्यांचा?
जाळून बाल्य करता का रक्तशोष त्यांचा?
कळती तुम्हास सार्या खाणाखुणा इशारे
ऐकू कसा न येई मग कंठशोष त्यांचा?
हाच शेर आवडला. संतोष कुलकर्णी ह्यांच्या मताशी सहमत आहे. दुरुस्त्याही छान आहेत.
गजल आवडली. शेवटचा शेर विशेष.
पुलस्ति,
सुंदर गझल.. वा!
सुरवंट रेंगणारे विणतीच कोष त्यांचा! ... वा! किती वेगळी कल्पना!
सवयीनुसार त्यांनी संकल्प सोडले अन
सवयीनुसार चालू हा मंत्रघोष त्यांचा! - वा! मक्ता सर्वांत आवडला.
-कुमार