...पुढे मी गेलो !


...पुढे मी गेलो !


हे रान जरी घनदाट...पुढे मी गेलो !
काढून स्वतःची वाट...पुढे मी गेलो !


पायात जरी दररोज निराळी बेडी...
सोडून मला मोकाट..पुढे मी गेलो !


चौफेर पहारे, गस्त नि नाकेबंदी....
त्यातूनच बिनबोभाट पुढे मी गेलो !


फिरणार  तसा नव्हतोच कधी माघारी...
होऊन पुरी घबराट...पुढे मी गेलो !


आता न तुझ्या हातात मला थांबवणे
तू लाव कितीही नाट...पुढे मी गेलो !!


मंजूर मला नव्हतेच किनारा होणे...
होऊन तुफानी लाट...पुढे मी गेलो !


कल्लोळ नको, आकांत नको मज माझा...
सोडून इथे गोंगाट...पुढे मी गेलो !


क्षण चार विसावा गार मिळाला नाही...
नव्हताच नदीला घाट...पुढे मी गेलो !


आरास खुणावत होती मज काट्यांची
टाळून फुलांचा थाट...पुढे मी गेलो !


वगळून मला केलीस तुझी तू यादी...
मारून तुझ्यावर काट...पुढे मी गेलो !!


- प्रदीप कुलकर्णी


 


 



 


गझल: 

प्रतिसाद

सुंदर गझल!
आरास खुणावत होती मज काट्यांची
टाळून फुलांचा थाट...पुढे मी गेलो !
वगळून मला केलीस तुझी तू यादी...
मारून तुझ्यावर काट...पुढे मी गेलो !!

हे शेर आणि मतला फार सुंदर झाले आहेत.
 

मंजूर मला नव्हतेच किनारा होणे...
होऊन तुफानी लाट...पुढे मी गेलो !


कल्लोळ नको, आकांत नको मज माझा...
सोडून इथे गोंगाट...पुढे मी गेलो !


क्षण चार विसावा गार मिळाला नाही...
नव्हताच नदीला घाट...पुढे मी गेलो !


आरास खुणावत होती मज काट्यांची
टाळून फुलांचा थाट...पुढे मी गेलो !


वगळून मला केलीस तुझी तू यादी...
मारून तुझ्यावर काट...पुढे मी गेलो !!

हे सगळे शेर फार आवडले..
             -मानस६

गझल फार फार आवडली! सर्वच शेर जमून आलेत!! तुमच्या गझला वाचून मला न चुकता बोरकरांच्या कविता आठवतात - नादमाधुर्य, शब्द आणि विचार दोन्हींमधले सौष्ठव आणि सौंदर्य -- वा! अनोखा अनुभव देऊन जातात तुमच्या गझला!!
-- पुलस्ति.

अख्खी गझलच फारफार आवडली. शेवटचा शेर अफलातून आहे.
वगळून मला केलीस तुझी तू यादी...
मारून तुझ्यावर काट...पुढे मी गेलो !!

मक्ता खूप आवडला.

बहुत खूब!
लाट आवडली...थाटही आवडला...!
नाट हा शब्द अगदीच बोलीभाषेतला.. खर्‍या मराठी वळ्णाचा..हिंदी, उर्दूतही वापरतात. बोली भाषेतला असल्यामुळे शेर 'बोलल्या'प्रमाने वाटला. आवडला. बहोत अच्छे!
संतोष

फिरणार तसा नव्ह्तोच कधी माघारी...
होवून पुरी घबराट..
..कशासाठी ते कळले नाही. कृपया खुलासा कराल का? मला तो शेर अजून स्पष्ट असावा असे वाटते. त्या दोन ओळींमधला संबंध जरा अस्पष्ट वाटतो.
संतोष

आयुष्य जगत असताना  (माझ्याच नव्हे तर,  प्रत्येकाच्याच) वाटेत अनेक संकटं, वादळं येत असतात...कधी कधी त्यांची चाहूलही आपल्याला लागलेली असते.  या संकटांशी, वादळांशी  दोन हात तर करावेच लागणार असतात...मनातून तर आपण पार घाबरून गेलेले असतो. पण पुढे जाण्याशिवाय पर्यायच नसतो...जावेच लागते... (घबराट झाली तरी) संकटांना, वादळांना घाबरून मी तसा माघारी कधीच फिरणार नव्हतो, असं मला या शेरातून सांगायचं आहे ...आणि तेच इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे....
शिवाय, 
हे रान जरी घनदाट...पुढे मी गेलो !
काढून स्वतःची वाट...पुढे मी गेलो !
या मतल्यातही  `कशाचे रान` अशी  शंका येऊ शकेल... पण इथेही मला  `आयुष्याचंच रान` असं म्हणायचं आहे...(कितीही मनासारखं असलं तरी !) मनासारखं आयुष्य कुणालाच मिळत नाही...!! किंवा एकसारखं आतून तसं वाटत राहत असतं...तरीही जगावंच लागतं...त्यासाठी  वाट काढावीच लागते...असंच मला या मतल्यातून म्हणायचं आहे. आता मी लिहीत असताना माझ्यापुढं `आयुष्य` होतं...पुण कुणाच्या पुढं `नोकरी `असेल, तिच्यातील अडचणी असतील,  कुणाच्या पुढं `व्यवसाय` असेल, त्याच्यातील आव्हानं असतील,  कुणाच्या पुढं `ग्रीन कार्ड` मिळवण्याची  धडपड असेल, त्या प्रक्रियेतील अडथळे असतील,  कुणाच्या पुढं `प्रेयसीचं मन`ही असेल...ते कसं जिंकायचं असा प्रश्नही असेल....असं काहीही असेल...आणि या साऱ्यांतून जो तो वाट काढतच असतो..म्हणूनच तर  एकच  शेर प्रत्येकाला वेगवेगळा दिसतो...वेगवेगळ्या पद्धतीने भावतो....

पुलस्ती...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर यांच्या  रचनांमधील नादमाधुर्याशी  आपण माझ्या गझलेची तुलना केलीत...मी  संकोचून गेलो...कुठं ती डोंगराएवढी मोठी माणसं...त्यांचं स्तिमित करून टाकणारं  साहित्य...ती  उत्तुंग प्रतिभा, ती विदग्धता....मला फार फार संकोचल्यासारखं झालंं...पण तुमच्या भावनेचा आदरही राखायला हवा...मोकळ्या, खुल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद...
 

प्रदीप,
सुंदर गझल...
मंजूर मला नव्हतेच किनारा होणे...
होऊन तुफानी लाट...पुढे मी गेलो ! वा! वा!
आरास खुणावत होती मज काट्यांची
टाळून फुलांचा थाट...पुढे मी गेलो ! - वा! हा शेर सर्वांत आवडला.

वगळून मला केलीस तुझी तू यादी...
मारून तुझ्यावर काट...पुढे मी गेलो !! .. मस्त.
- कुमार

खुप्च सुन्दर