विनय का सोडलाहे मोगर्‍याने?- हझल

मला माहीत आहे गाल त्यांचा यार आहे
तरी केसांस घे मागे इथे अंधार आहे


अरे वा! हे कवी आधी कसे नाहीत दिसले?
विकावे काव्य येथे चोरटा बाजार आहे


मनाला पाहता ती बोलली मुरडून नाके
"म्हणे नक्कोच! मोठा फार हा  आकार आहे"


पुढे केले जरा ओठांस मी, ती लांब झाली
नको मोडू व्रताला ती म्हणे गुरुवार आहे


"चला नशिबास काढू,या  इथे मंदीर काढू"
पुजारी बोलतो पत्नीस, "बेडा पार आहे" 


कुणाला लाज नाही  सांगण्याची खाज ज्याला
बिचारा वेळवेळी खात गेला मार आहे


विनय का सोडलाहे मोगर्‍याने जाणले मी
तया देठास कोणाचातरी आधार आहे


 





 


 


 


 


 


 


 




 

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

मोगर्‍याचा शेर छान टाकलाय. देठाला कुणाचातरी आधार आहे.
पण ही हझल कशी? हसू कुठे येते? म्हणजे भन्नाट विनोदी नाट्य म्हणुन जावे तर गेल्यावर ( पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठीचे विनोद ) अशी पाटी दिसल्यासार्...असो मी गप्प आहे.
 

हझलमधे खदाखदा किंवा गडगडाटी हसू आले पाहिजे असे नाही. परंतू हसू आले पाहिजे. ही अट या हझलेत साधारण २५% भागलेली दिसते.
गुरुवार शेर वेगळाच आहे. प्रियकराने चुंबन घेतल्यावर उपास मोडेल असा काहीतरी प्रेयसीचा समज असावा. किंवा उपासच चुंबनांचा असावा असे काहीतरी वाटते. असे उपास व्हायला लागले तर मोठीच पंचाईत होण्याचा संभव आहे, काही जणांची! हा शेर स्वातंत्र्यपूर्वकाळासाठी समर्पक वाटतो. कारण हल्ली एन डी ए रोडवर रात्री बरीच युगुले न केलेले उपास सोडताना दिसतात. आम्ही रेस्टॉरंटमधे आमचा उपास सोडायला जातो तेव्हा दिसते. त्याची समीक्षा करावी असा एक विचार बर्‍याच वेळा मनात येतो.
मनाचा आकार मोठ्ठा असला तर ते नाकाराण्याचे कारण काय ते समजत नाही. बहुधा फार मोठे मन असल्यामुळे प्रेयसीला त्यात आणखीही काही जण मावतील अशी रास्त शंका आली असावी.
मंदीर हा व्यवसाय झाला आहे हे चांगले सांगीतले आहे. शिक्षणक्षेत्राबद्दल पण काहीतरी रचायला पाहिजे होते. नशीब समीक्षेबद्दल काही लिहिले नाही.
कवी प्रेयसीला घेऊन कुठे बसला असावा याचा अंदाज येत नाही. कारण गाल केसांचे यार आहेत हे माहीत असूनही तो तिला केस मागे घ्यायला सांगतो का तर उजेड यावा म्हणून. बहुतेक चित्रपटगृह असावे.
कवीला अचानक कुणीतरी चोरटा कवी दिसलाअसल्यासारखे वाटते. तो हे काव्य विकून उदरनिर्वाह करू इच्छिताना दिसतो.
कुणाला लाज नाही हे सांगणारा स्वतःच मार खातो याचा अर्थ असा असावा की सगळे जगच जर निर्लज्ज आहे तर जो असे म्हणेल की अमुक अमुक निर्लज्ज आहे त्यालाच मार पडेल.
मोगर्‍याचा जो शेर आहे तो फार मर्यादीत स्वरूपाचा वाटतो. म्हणजे तिने केसांत मोगरा घातल्याने त्या जीवावर मोगरा उद्दामपणा करत आहे असे काहीतरी. पण यात विनोदही नाही किंवा नवीन असा काही अर्थही नाही. कुणाला काही भिन्न अर्थ वाटला तर प्रतिसादातून कळवावेत.
एकंदर हझल बरी. १०० पैकी ३६.
 
 

विनय का सोडलाहे मोगर्‍याने जाणले मी
तया देठास कोणाचातरी आधार आहे
कलोअ चूभूद्याघ्या

गझला पाडू नयेत असे प्रामाणिक मत नोंदवावेसे वाटते. दररोज एक गझल लिहायलाच हवी असे काही नाही.

आदरणीय गंभीर समीक्षक,
एक मान्य करावे लागेल की माझ्या हझलेपेक्षा आपली समीक्षा जास्त वाचनीय झाली आहे.
धन्यवाद.