एक संवाद-९

: तुम्ही लिहिलेली प्रत्येक गझल चांगलीच लिहिली आहे असा तुम्हाला आत्मविश्वास आहे का?
: असा आत्मविश्वास कुठल्याही कवीने बाळगू नये. पण मी माझ्या गझलेचे तारुण्य सतत टिकवले आहे. केवळ नाव झाले म्हणून वाटेल तो कचरा संपादकांच्या किंवा मराठी जनतेच्या हवाली करणाऱ्यांपैकी मी नव्हे. मी माझा उपेक्षापूर्ण कटू भूतकाळ आठवतो आणि म्हणूनच मी अजूनही माझी प्रत्येक गझल एखाद्या उमेदवारी करणाऱ्या होतकरू कवीसारखी अतिशय जपून जिवाच्या कराराने लिहितो. माझ्या गझलेला कुणी चांगले म्हटले तर मी अस्वस्थ होतो. ही माझी प्रशस्ती नव्हे, तर माझी प्रत्येक गझल ही 'मास्टरपीस'च  असली पाहिजे, अशी माझी लिहिण्याची जिद्द असते. पन्नाशी ओलांडल्यानंतर आता पदरात पडलेले यश मला सदैव भानावर ठेवते, सावध ठेवते. काही काळापुरते केलेले चांगले लेखन म्हणजे आयुष्याचे सार्थक नव्हे. भूतकालीन चांगल्या लेखनाचा कलप लावून  मी माझी कविता तरुण ठेवत नसतो.

: उर्दू गझलेच्या तुलनेने अमुक एक गोष्ट मराठी गझलेत आपल्याला साधली नाही, अशी तुम्हाला कधी खंत वाटली का?
: मुळीच नाही. प्रत्येक भाषेचा स्वभाव आणि प्रत्येक शायराचे व्यक्तिमत्व भिन्न भिन्न असते. गालिब, मोमिन, दाग ह्याना जे उर्दूत साधले ते कदाचित मला मराठीत साधता आले नसेल. पण मला जे मराठीत साधले ते कदाचित त्यांना उर्दूत साधता आले नसेल.

: तुम्ही एवढ्या गझला लिहिल्या, अनेक गझलकार शिकवून तयार केले, दर्जेदार प्रकाशनांनी तुमचे काव्यसंग्रह काढले, संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी गझलगायन केले, अनेक मानसन्मान मिळविले या यशाबद्दल तुमची प्रतिक्रिया कशी आहे?
: माणसाचे खरे आयुष्य विलक्षण भयानक असते. आकाशातील सगळाच पाऊस अंगावर कोसळावा तसे आयुष्य कोसळले, पण नियती तुम्हाला जे आयुष्य देते त्याचा तुम्ही काय अन्वय लावता, हेही महत्त्वाचे. आयुष्यात पैसा आणि वय याचे महत्त्व अपार आहे. पण त्याहून माणसात जे जगायचे स्पिरिट असते ते अधिक महत्त्वाचे. खूप उपेक्षा मिळाली आणि खूप प्रसिद्धीही मिळाली. आता चार-दोन वर्षात कुठे काही लिहिलेच नाही, तर दुःख कशाला मानायचे आणि पन्नास गझला येत्या दिवाळी अंकात छापून आल्या तर आनंद कशाला मानायचा? आता कोणत्याही यशाला एन्जॉय करण्याची ताकद राहिली आहे काय? लोकांचा सत्कार स्वीकारायला धनवटे रंगमंदिरापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे इच्छा नाही. शक्ती नाही असे नाही.
अता जरी हे उदास आनंद सोबतीला
पुन्हा पुन्हा आठवे मला काळ काटलेला
अता किती खोल खोल ही अंतरे तपासू
झरा झरा झुळझुळून केव्हाच आटलेला

महाराष्ट्र साहित्य पत्रिका
दिवाळी अंक/१९८६