यादगार

भांडून या मनाशी डोळ्यात धार येते
राहून राहुनी ही साली बहार येते


स्वप्नात जोर दावे झोपेमधे न मावे
सत्यात तीच इच्छा होऊन ठार येते


शब्दास नाव ठेवा "हा बोथटात मोडे'
काढून फेकलाकी त्यालाच धार येते


माझ्या मनास घाली मी सारख्याच घिरट्या
अंदाज ना तयाचे कोठून दार येते


जाहीर सांग येथे तंत्रास भेट देणे
आम्हास येत नाही की 'यादगार' येते?


एकेक ओळ माझी वाचावयास गर्दी
की शोधण्यास जैसी सापास घार येते


दु:खास माळणे मी सोडून देत आहे
की दु:ख या जगाच्या डोळ्यात फार येते


आजन्म पाहतो मी सौख्यास धीर नाही
येते, पसार होते, होते पसार, येते


गर्दीत शायरांच्या तारीफ ऐक माझी
मागून नांव येते आधी फरार येते


 


 



 


 

गझल: 

प्रतिसाद

आपण ही गझल फार घाई घाईत लिहीलेली दिसतेय..

हा हा हा हा! गझल संग्रह कसा काय प्रकाशित होइल? गझल करुच शकत नाही मी. आपण ऐकले आहे ते वेगळे ऐकले असावे. काव्य संग्रह प्रकाशित झाला आहे. असो.
आपण सुचवलेले बदल मी बघितले. तबीयत खुष झाली. असे मला कधी करता येईल कोण जाणे. नम्रपणे सांगतो की मी आपण दर्शवलेल्या गा गा ल गा ल गा गा प्रमाणे मी करायला गेलो.
बाय द वे काव्यसंग्रह प्रकाशित होण्यात हल्ली काही अविश्वसनीय नसावे.
पण परत सांगतो, आपले बदल सुंदर आहेत.
 झोपेत चेव  चढतो ,  स्वप्ना मधे न मावे
  सत्यात तीच इच्छा अगदी सुमार येते
इथे 'आर' च्या आधी मी जी 'अ' ही 'अलामत' वापरली आहे ती दिसत नाही. इथे उ दिसते. क्वचित ह्रस्व 'उ' चालतो म्हणुन असावी बहुतेक.
 
या सुधारणा अप्रतिम. प्रयत्न करेन.
एकेक चूक माझी काढावयास टपले
जैसी शिकार करण्या वरतून घार येते
दु:खास माळणे मी सोडून देत आहे
हे दु:खही जगाच्या डोळ्यात फार येते

  आहे लपाछपीचा  हा खेळ या सुखाचा    
  येते... पसार होते... होते पसार... येते...

एकेक ओळ माझी वाचावयास गर्दी
की शोधण्यास जैसी सापास घार येते
आजन्म पाहतो मी सौख्यास धीर नाही
येते, पसार होते, होते पसार, येते
वरील दोनही शेर आवडले. येते, पसार होते, होते पसार, येते हे मस्त.
एकेक चूक माझी काढावयास टपले
जैसी शिकार करण्या वरतून घार येते
आहे लपाछपीचा  हा खेळ या सुखाचा   
हे भावगीतसाठी चालेल.
भूषण यांनी लिहिल्याप्रमाणे एकेक ओळ माझी वाचावयास गर्दी  हे आणि की शोधण्यास जैसी सापास घार येते  हे म्हणजे पहिल्या ओळीत शाबासकी आणि दुस-यात धपाटा मारल्यासारखे वाटते. मला वाटते भूषण यांना धक्का-तंत्र वापरायचे आहे. मात्र यादगार यांनी लिहिल्याप्रमाणे येते... पसार होते... होते पसार... येते... हे एक वेगळा पॉज देवून जाते. स्वल्पविरामाऐवजी .... हे ही चांगलेच वाटते. अर्थात, मला जे वाटले ते लिहिले आहे. शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.

श्री यादगार,
माझी काहीतरी चुकीची समजूत झाली असावी बहुतेक. मी ती बाराखडी वाचली होती. आपण सांगीतल्यावर परत वाचली. त्यातील हा मुद्दा खाली देत आहे.
कै. भट यांचे म्हणणे खालील प्रमाणे:
याच गझलेतील अजून एक शेर पहा.
आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा
माझाच भास माझ्या अंगावरून गेला
वरील शेरात यमक म्हणून "अंगावरून" हा शब्द आलेला आहे. या यमकात शेवटी "रून" ही दोन अक्षरे अटळपणे आलेली आहेत. परंतु त्याचवेळी "रून" या शेवटच्या दोन अक्षरांआधी असलेल्या 'व'  या अक्षरांतील 'अ' हा स्वर सांभाळला गेला आहे. म्हणजे "रून" ही शेवटची दोन अक्षरे कायम आणि त्याआधी येणाऱ्या "व" या अक्षरात "अ" ही अलामत कायम.

अलामतीची कल्पना देण्यासाठी मी याच गझलेतील अजून एक शेर येथे देतो-
कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-
"बाहेर एक कैदी तारा धरून गेला!"

--
माझा मुद्दा असा आहे:
माझी अशी समजूत झाली की 'रून' हा काफिया आहे, 'गेला' ही रदीफ आहे आणि 'अंगावरून' मधल्या 'व' मधील 'अ' ही अलामत आहे. जशी 'धरून' मधल्या 'ध' मधे आहे तशी.
ही समजूत योग्य आहे की चुकीची हे कृपया सांगावेत. मला तसे वाटल्यामुळे मी माझ्या कवितेत प्रत्येक 'आर' च्या आधी ' अ' ही अलामात घेण्याचा प्रयत्न केला.
जसे: डोळ्या 'त' धार, साली 'ब' हार, होते 'प' सार, होऊ 'न' ठार
हे बरोबर आहे की चुकीचे आहे ते कृपया सांगावेत. आपल्या सल्ल्यामधुन मला असे वाटले की आपण म्हणत आहात की 'आर' ही अलामत आहे. म्हणुन विचारत आहे.

श्री यादगार,
धन्यवाद. पण मला तीन प्रश्न विचारायचे आहेत.
१. जर 'आर' ही अलामत असेल तर काफिया कोणता?
२. कै भटांच्या वरील लेखात असे म्हंटले आहे की काफियाच्या 'आधीच्या' अक्षरात येणारा उच्चार म्हणजे अलामत. मग ' आर' अलामत कशी?
तिसरा प्रश्नः
हे का कुणी फुलांना सांगायला हवे 
त्यांनी कसे रुतूंशी वागायला हवे
या वादळात माझ्या पुसल्या जरी दिशा
तारू तुझे किनारी लागायला हवे
यात जे दोन काफिये आहेत, ते बघून असे वाटते की ते घेण्यासाठी हे शेर रचले आहेत. हे कोण कुणाला कुठल्या परिस्थितीसंबंधात सांगत आहे? कोणचे वादळ, दिशा पुसणे म्हणजे काय? अन तुझे तारू म्हणजे कुणाचे?
मी पहिल्यापासून अशी शंका विचारत होतो की मात्रा, वृत्त यामुळे आशय क्लीअर न होणे हे काही ठिकाणी दिसते.
उभा जन्म माझा जरी वांझ गेला
तरी स्वप्न आहे नव्याने गरोदर
हे कसे क्लीअर होते.
यावर कृपया आपले मत सांगावेत.
                         

       
 

बाळ अजय,

"आहे लपाछपीचा हा खेळ या सुखाचा"
हे भावगीतसाठी चालेल असं जर का तुला वाटत असेल तर मग तूच सुचव पाहू योग्य ती ओळ.
अट इतकीच आहे की गझलेचं वृत्त तेच ठेवायचं , आशयाशी छेड्खानी करायची नाही आणि
* येते, पसार होते, होते पसार, येते * हा मिसरा तसाच ठेवायचा.
तुला जे काय करायचं आहे - ते फक्त तुला वाटणारी उपरोक्त भावगीताची ओळ गझलेला शोभेल अशी बनवण्यासाठीच करायचं.
तू कर होsss बाळा मी तुला शाबासकी देईन, कधी भेटलास तर श्रीखंडाची वडी सुध्दा देईन.

माझं दुसरंही एक काम करशील का बाळा ? बाळा, या रचनेचा आशय तोच ठेवून (आशयाशी छेड्खानी करायची नाही )तोच काफिया, रदीफ वापरून याच वृत्त्तामधे भूषण बाळाच्या या रचनेत सुधारणा कर. यादगार बाळाने त्याच्या सुधारित रचनेला गझलेच्या रांगेत शेवटी उभं केलं आहे मला ते बरोबर वाटलं नाही. तू आणशील का तुझी सुधारित रचना पहिल्या क्रमांकावर ? बाळा अजय, जर तू असं करून दाखवलंस तर मी तुला अजून एक श्रीखंडाची वडी देईन होsss

तुझे प्रेमळ आजोबा.

श्री यादगार,
प्लीज माझी शंका कृपया अजून एकदा विचारात घ्या.
भटांनी त्यांच्या शेरांमधे 'रून' मधल्या 'न' चा उल्लेख अलामत समजावण्यासाठी न करता 'रून' च्या आधी असलेल्या 'व' मधील 'अ' या उच्चाराचा उल्लेख अलामत समजावण्यासाठी केला आहे.
याचा अर्थ असा वाटतो की वापरून, धरून, करून मधे प, ध, क हे अलामत सांभाळतात.
आपण माझ्या शेरावर रचलेल्या एका शेरामधे (माझ्या शेरांमधे बहार, पसार या प्रमाणे ब, प असे अलामत सांभाळणारे स्वर आहेत ) 'सुमार' हा शब्द वापरला आहेत. माझ्यामते सुमार मधील 'मार' मुळे काफिया जरी येत असला तरी 'सु' मुळे अलामत येत नाही. अर्थात यावरही भटांचे म्हणणे असे होते की अ च्या ऐवजी क्वचित उ चालतो.
मी लिहीत आहे ते योग्य की अयोग्य हे कृपया कळवावेत.
धन्यवाद.

श्री यादगार,
मी भटांचा तो उतारा पुन्हा वाचला. ते म्हणतात की 'अ' ही अलामत आहे. अरून ही अलामत आहे असे म्हणलेले नाही. सॉरी आपल्याला परत परत त्याच विषयाकडे वळवतोय म्हणुन.
श्री आजोबा,
नमस्कार!
कृपया हे खालील विधान समजावून सांगता का?
"यादगार बाळाने त्याच्या सुधारित रचनेला गझलेच्या रांगेत शेवटी उभं केलं आहे मला ते बरोबर वाटलं नाही"
माझी रचना रांगेतही  येऊ शकत नाही की अगदीच शेवटी नसावी असा अर्थ घेऊ?
साधेपणाने विचारतोय. कृपया आपण हा वादोत्पादक प्रश्न समजू नका.

यादगार,
समजले. धन्यवाद. आपण बराच वेळ खर्च केलात त्याबद्दलही धन्यवाद.
 
 

प्रिय भूषण,
आधीच्या रचनेत व सुधारित रचनेतही आर ही अलामत सर्वत्र कायम आहे
तुमचा जो  गोंधळ होतो आहे तो टाळ्ण्यासाठी कै. भटांनी अलामत ऐवजी स्वरचिन्ह हा शब्द वापरला. साधारण पणे जेव्हा अलामत ही  संपूर्ण संज्ञा  विचारात घेतली जाते तेव्हा त्याचा गृहीत अर्थ  असा आहे की " काफियातील स्वरचिन्ह आणि त्याच्या उजवीकडे काफियाच्या शेवटा पर्यंत येणारी सर्व अक्षरे जशीच्या तशी आली पाहिजेत"
यादगारने वर दिलेल्या विधानांना कोणाचीच हरकत असण्याचे कारण नाही. अशा पद्धतीने चर्चा चालल्यास नवीन कवींनाही गझलेसाठी उत्तेजन मिळेल.

महापंडीतायनम:

ती. आजोबांस अजयचा शि. सा. न. वि. वि.,

पत्रास कारण की, आपला संदेश मिळाला. मात्र उत्तर लिहायला आता वेळ मिळाला. असो.
माझ्या प्रतिसादात मी काही निळ्या अक्षरात भूषण यांच्या ओळी दिल्या आहेत. त्यात बदल करण्याची फार गरज आहे असे वाटत नाही. तसे मी दिलेही आहे. पण कदाचित आपल्या वयापरत्वे रंग आपणांस नीट दिसले नसतील किंवा जुन्याच कृष्ण-धवल संचावर पाहिले असेल. पुन्हा पहा. डोळ्यांची नीट काळजी घ्या. आता उतारवयात तोंडाला कोरड पडते. तेंव्हा मी दिलेल्या श्रीखंडाच्या वड्या अधून मधून चघळत जा. असो.

आजीला नमस्कार सांगा.
कळावे. लोभ असावा. ही विनंती.

आपला
अजय अनन्त जोशी

अजय बाळा,
शुक्र, 09/05/2008 - 07:24 — अजय अनन्त जोशी

मला वाटते...
http://www.sureshbhat.in/node/854#comment-3339

अरे लबाडा, तू आता खोटंही बोलू लागलास हे बरं नाही हंssss तू फक्त ओळी केल्यास निळ्या निळ्या आणि निळ्या ओळी बदलायची गरज नाही असं स्पष्ट्पणे कुठ दिलं आहेस ? दाखव बघू.
मला आता ४ डोळे आहे बरं का ? दोन चश्म्याचे आणि दोन माझे म्हणून वाचायला अजिबात त्रास होत नाही. *आता मला फसवायला तुझा तो जुना प्रतिसाद संपादित करून खट्याळपणा आणि लबाडी करू नकोस बरं का ? देव (सर्व्हर)बघत असतो सग्गळं काही.

आणि होsssss बरं आठवलं ... मी दिलेल्या श्रीखंडाच्या वड्या गोळा करून परत मला आणून देऊ नकोस. त्या खास *लहान मुलांसाठीच*असतात. कवळीला कुठून पडणार कोरड ? शिवाय मधूमेहात गोड खायचं नाही. म्हणूनच इतरांना खास करून लहान मुलांना गोड खाताना बघून मनात गोड वाटून घ्यायचं.

एक शेर आठवला. बहुतेक नीदा फाज़ली आहे याचा शायर

घर से मस्जिद है बहोत दूर, चलो यू कर ले
किसी रोते हुवे बच्चे को हसाया जाये

तुला वाटणार्‍या उपरोक्त भावगीताची तू गझल कधी करणार आहेस ? त्याची वाट बघतोय.
बाळा, उतार वयात फार वाट बघायला लावू नकोस मला.

- तुझे उत्सुक आजोबा

निळ्या निळ्या आणि निळ्या ओळी बदलायची गरज नाही असं स्पष्ट्पणे कुठ दिलं आहेस ? दाखव बघू.
****वरील दोनही शेर आवडले. येते, पसार होते, होते पसार, येते हे मस्त.
इथे फक्त दृष्टीची नाही तर दृष्टीकोनाची आवश्यकता आहे.
*आता मला फसवायला तुझा तो जुना प्रतिसाद संपादित करून खट्याळपणा आणि लबाडी करू नकोस बरं का ?
आजोबा, आम्ही लहान असलो तरी तुमची ही सवय नाही बरं आम्हाला...
वयाचा मोठेपणा दा़खविताना मनाचाही दाखवा.

बाळा अजय,

तुझं बारसं जेवलोय मी .मला सगळं स्पष्ट लागतं बरंsss का बाळा. माझ्या समोर सबबी चालत नाहीत हंssss. मी जे टाईप केलेले दिसत आहे त्यालाच "आहे" म्हणतो. आत पळ काढायला उगीच दृष्टी कोनाचा फाटा फोडू नकोस.

बाळा, तू जे "सवयीचं " म्हणालास ना ? ते देखील उगीच पुन्हा काही तरी बोलायचं म्हणून बोल्लास.
विचार करून बोलावं, बोलून नंतर विचारात पडू नाई - असं साने गुरूजी म्हणत. पण या पुढे लक्षात ठेव हंssss कारण ....मी या संकेत स्थळावर तुझ्या सारखा नोंदणी कृत सदस्य नाही. त्या मुळे मी एकदा दिलेल्या माझ्या प्रतिसादात कधीच फेरफार करू शकत नाही. बाळा तुला मात्र ते शक्य आहे बरंssss. जर माझ्या वर विश्वास नसेल तर संपादक किंवा विश्वस्तांना निरोपाद्वारे विचार.

ती. आजोबा,
मी असे लिहिलेले आहे.(माझ्याच लिखाणात मी बदल करीत नाही.)
"भूषण यांनी लिहिल्याप्रमाणे एकेक ओळ माझी वाचावयास गर्दी  हे आणि की शोधण्यास जैसी सापास घार येते  हे म्हणजे पहिल्या ओळीत शाबासकी आणि दुस-यात धपाटा मारल्यासारखे वाटते. मला वाटते भूषण यांना धक्का-तंत्र वापरायचे आहे."
पुन्हा वाचा....मला वाटते भूषण यांना धक्का-तंत्र वापरायचे आहे.
आता,
१) आहे लपाछपीचा  हा खेळ या सुखाचा
   येते... पसार होते... होते पसार... येते...
माझ्या मते लपाछपीचा  हा खेळ  आणि येते... पसार होते... होते पसार... येते...  ही एकाच भावनेची दोन प्रकारे केलेली अभिव्यक्ती आहे. म्हणून मला आजन्म पाहतो मी सौख्यास धीर नाही यात बदल करावा असे नाही वाटले.
२) एकेक ओळ माझी वाचावयास गर्दी 
    की शोधण्यास जैसी सापास घार येते 
यातही पहिली ओळ वाचताना त्या 'मी' साठी प्रसिद्धीचा भास होतो. दुसरी ओळ वाचताना खरा अर्थ कळतो.
अर्थात, मला जे वाटले ते मी लिहिले. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.

धम्माल!!!
भूषण काका,
काही शेर समजले नाही, पण प्रतिसाद वाचुन धम्माल आली!!.मोठी  माणसे पण अशी बोलतात..आम्हांला प्रथमच समजले..
की दु:ख या जगाच्या डोळ्यात फार येते..वा!!

बाळ चांदणी,
आपल्याला एक विस्तृत स्वरुपाचा प्रतिसाद देत आहे.
या गझलेवरील मजेशीर प्रतिसादामधून आपल्याला काय काय लाभू शकते त्याची एक यादी मी आपल्यासाठी खाली देत आहे. त्यापुर्वी थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक आहे.
जेव्हा मला गझल तांत्रिकदृष्ट्यासुद्धा कशी असते ते माहीत नव्हते तेव्हा झालेल्या या गोष्टी आहेत. माझ्या प्रत्येक रचनेत चुका असायच्या. येथील एक श्रेष्ठ गझलकार श्री यादगार मला माझ्या सुधारणेसाठी म्हणुन माझ्या चुका सांगायचे. सुधारणांची अपेक्षा लक्षात न घेऊन मी नुसताच रागाने काहीतरी प्रतिसाद द्यायचो किंवा एखादी तिरकस गझल करायचो.  परंतू मला जो फायदा झाला तो याच सर्व लोकांमुळे व याच साईटमुळे. अर्थात, आजही मी काही विशेष गझल करत नाही हे खरे आहे, पण निदान कुणी फंडामेंटल स्वरुपाच्या चुका तरी दाखवत नाही. आणखीन एक व्यक्तिमत्व होते ६४ बिट्स! ते घनघोर चर्चा करायचे. पण ती आम्हाला नवोदीतांना फायद्याची असायची. सर्वात रंजक व्यक्तिमत्व जर कुठले असेल तर 'आजोबा' ! ते येण्याची नोंद करण्याची वगैरे तसदी घ्यायचे नाहीत. लांबुनच तडाखे हाणायचे. पण त्यांची शैली अत्यंत मजेशीर अन मुद्दे अर्थातच सुयोग्य असायचे.
वरील प्रतिसादांमधे मी एक नगण्य माणूस आहे. इतरांमधेच चर्चा झालेली आहे. पण पहा, याच चर्चेमधून काय काय निघाले.
१. कोणची ओळ भावगीताची आहे वा गझलेची आहे याचा थोडा अंदाज आला.
२. अलामतीच्या बाबतीत माझ्या शंकांचे निरसन झाले.
३. एखाद्या शेराच्या अर्थावर विविध मते मांडण्यात आली.
४. काही प्रतिसाद आपल्याला दिसणार नाहीत, परंतू त्यात मला सफाईदार शब्दरचना कशी होऊ शकेल हे सांगण्यात आले होते.
५. संभाषण कौशल्य कसे असावे याचे प्रदर्शन झाले.
हे सर्व या साईटमुळे झाले.
आपण ज्यांना मोठी माणसे म्हणत आहात ती  माणसे जी चर्चा करतात वा वाद घालतात ती मुळात अत्यंत मुद्देसूद चर्चा करतात हे आपल्याही लक्षात आलेच असेल.
तेव्हा माझी अशी मैत्रीपूर्ण सूचना की आपण जास्तीत जास्त गझला करून त्यातून 'गझलकार' म्हणुन स्वतःची सुधारना करून घ्यावीत.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद व शुभेच्छा!