एक संवाद-७

: या सगळ्यात तुमचा वेळ जात आहे. तुमची सर्जनशीलता नष्ट होत आहे, तुमचे नुकसान होत आहे असे तुम्हाला वाटत नाही का?
: नाही नाही, मुळीच नाही.तुम्हाला सांगतो, हा माझा काव्यप्रवास म्हणजे आयुष्याशी दिलेली एक लढत आहे. एक काळ होता की, कवी म्हणून जिवंत राहणे आणि लिहीत राहणे मला क्रमप्राप्त होते आणि एक गझलकार म्हणून स्थान मिळविणे. अर्थात यासाठी मी दुसरे काहीच केले नाही फक्त लिहीत राहिलो. अधिक जिद्दीने. पुढचे सर्व यदृच्छेने घडत गेले. साहित्यक्षेत्रातल्या 'उच्चकुलोत्पन्नांनी' माझी उपेक्षा केली. मला रेकग्नाइज केले नाही. पण तीस-बत्तीस वर्षे गझल लिहिणाऱ्या माणसाला तुम्ही किती दिवस टाळणार! त्यांनी मला विचारले नाही, मी त्यांचा विचार केला नाही. पण मराठी माणसांनी, जनतेने मला रेकग्नाइज केले. पण एक खरे की जे माझ्याबाबतीत घडले ते इतरांच्या बाबतीत घडू देणार नाही.
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
मी मात्र थांबून पाहतो, मागे किती जण राहिले?
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?


: याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून कविसंमेलनांसारखी स्वतंत्र गझल-संमेलने का भरवीत नाही तुम्ही?
: ती आम्हाला मुळीच भरवायची नाही. मी सर्वांना सांगत असतो, गझल संमेलने भरवायची नाहीत आणि कुणी भरवलीच तर त्यात भाग घ्यायचा नाही. कारण आपण सर्व गझल लिहिणारे 'कवी' आहोत. आम्ही अशी संमेलने भरवली तर आमची वेगळी जात पाडतील ते. आणि तशी गरज वाटत नाही मला. गझलकार गाजतो. सगळीकडे अगदी हटकून बाजी मारतात आमचे लोक कविसंमेलनात. मात्र गझल चांगली हवी. नुसता सांगाडा नको.


: तुम्ही या होतकरू गझलकारांना कोणता उपदेश द्याल?
: शब्दांच्या आत जे असते, त्याच्याशी कवीचे कोणते नाते असते ह्यावर गझलेचे भवितव्य अवलंबून असते. केवळ शब्दबंबाळपणा कवीला तारत नसतो आणि तटस्थ माणूस फार तर शब्दशिल्पी बनू शकेल. जे काही सांगितले जाते त्यात कवी स्वतः बुडालेला असला तरच शब्दांनी कवितापण येते आणि जो माणूस इतरांवर प्रेम करत नाही, जो फक्त स्वतःला केंद्रबिंदू मानतो, तो माणूस कवी म्हणून शिल्लक राहू शकत नाही, हे नव्या गझलकारांनी लक्षात घ्यावे. पण शेवटी ज्याने त्याने आपापले फैसले करायचे असतात.


:  'रूपगंधा' मध्ये तुमची वृत्ती बरीचशी हळवी कातर अशी दिसते. 'एल्गार' मधील गझलांत मात्र आपण पुष्कळदा आक्रमक, उग्र झालेले दिसता. हा बदल मधल्या काळातील सामाजिक आणि वैयक्तिक अनुभवांतील बदलांमुळे घडून आला का?
: वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही अनुभवांमुळे हा बदल घडून आला. हा बदल टप्पाटप्प्याने घडून आला असता. पण सर्व कविता उपलब्ध नाहीत.  काही मी वैतागलेल्या मनस्थितीत जाळून टाकल्या.
उदास चेहरों में रो रो के दिन गुजार दिया
ढली जो शाम तो फिर अपने घर गये चुपचाप
हमारी जान पे भारी था गम का अफसाना
सुनी न बात किसीने तो मर गये चुपचाप
माणसाचे उमलत्या तारुण्यातले स्वप्नरंजन पुढे पुढे कमी होत जाणार. त्यात आयुष्यात घडलेल्या एकाहून एक कटू घटना. उपेक्षा नाहीतर टिंगलटवाळी. स्वाभाविकच याचा परिणाम कवितेवर होणार.  दुनियाने जो मुझे दिया है वही मैं वापस कर रहा हूं. कटुता मिळाली म्हणून कटुता आणि प्रेम मिळाले म्हणून प्रेम. पण जिनको जो देना चाहिये वही दे रहा हूं. मी हळवेपणाचे टेंडर भरलेले नाही, रिस्पेक्ट करण्याचे टेंडर भरलेले नाही आणि प्रेम करण्याचेही टेंडर भरलेले नाही.


: तुमच्या गझलेत प्रसाद आहे. पण अतिप्रासादिकता गझलेचे सौंदर्य नष्ट करते असे आपणास वाटत नाही का?
:
आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा
कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा.
 आशययुक्त प्रसाद हेच सौंदर्य! दुर्बोधता ही नेहमीच वाईट असते. एखाद्या शेरात रसिक गुंतत जाणे व त्यातून अर्थाचे अनेकविध पापुद्रे निघत जाणे ही गोष्ट वेगळी.  ती नवनवोन्मेषशालिनी असली पाहिजे पण तिचा कुणालाच काही अर्थ लागत नसेल तर ती कविता टिकत नाही. स्वतःची आणि रसिकांची फसवणूक करणारी कविता कालांतराने खतम होते. जी कविता लोकांच्या हृदयाचा ठाव घेत नाही, जी आपली वाटत नाही, तिचा उपयोग तरी काय? कविता ही शेवटी संवाद साधण्यासाठीच आहे. जसे आपण बोलतो व दुसऱ्याला ते कळते, तशीच कवितासुद्धा म्हटल्यावर दुसऱ्याला कळलीच पाहिजे. यालाच उर्दूत 'तगज्जुल' असे म्हणतात.


: पण उर्दू गझलसम्राट गालिब तर बराच दुर्बोध लिहीत असे!
: याचे कारण गालिबचे फॅमिली बॅकग्राउंड इतर उर्दू कवींपेक्षा वेगळे होते आणि तो मुळात फारसीत काव्य करणारा तुर्क होता.


: तुम्हाला स्वतःच्या आवडणाऱ्या गझला कोणत्या? त्या आपल्याला कशा सुचल्या? त्या गझलांचे बीज मनात कसे पडले? त्या बीजाचा प्रवास कसा झाला? याबद्दल काही सांगू शकाल का? एकूण त्या निर्मितीची प्रक्रिया कशी घडते?
: आवडत्या गझला सांगणे कठीण आहे. कधी ही आवडते, कधी ती. या गझला कशा सुचल्या हेही सांगणे अवघड आहे. असा आयुष्याचा अनुभव हृदयामध्ये ठासून भरला आहे तो केव्हा, कसा काव्यरूप होईल हे सांगता येणार नाही. आता पूर्वीच्या गझलांची निर्मितिप्रक्रिया शोधणे म्हणजे खोटेपणाला जन्म देण्यासारखे होईल. ही प्रक्रिया अतिशय गूढ आहे आणि जगणे आणि लिहिणे या संदर्भातील सीमारेषा माझ्या संदर्भात धूसर आहेत इतकेच मला सांगता येईल.