सोशीक

संपली जवळीक ना !
तूसुद्धा अगतीक ना !


आत लाव्हा घुसळतो
वरुन सारे ठीक ना !


फावले त्यांचे कसे ?
भेकडांचे पीक ना !


काय दुःखाला हवे ?
आसवांची भीक ना !


भाव आहे चांगला
वेदनेला वीक ना !


कान का किटले असे ?
तेच ते बौद्धीक ना !


रांग नाही दर्शना,
हरपला लौकीक ना !


जिंकल्या दैवासही
दाद द्याया शीक ना !


जीवना माझ्यापरी,
हो जरा "सोशीक" ना !


--  अभिजीत दाते

गझल: 

प्रतिसाद

काय दुःखाला हवे ?
आसवांची भीक ना !
छान... उत्तम शेर !

हा शेर फार आवडला! "सोशीक" शेरही छान आहे!!